खेड 

मुंबई-गोवा महामार्ग राज्य मार्ग बनवण्याचे दृष्टीने केंद्र सरकारने उचललेली ठोस पावले आणि त्यानंतर महामार्गाचे युद्ध पातळीवर सुरु करण्यात आलेले काम जवळजवळ वेगाने सुरु आहे. मात्र या कामात महामार्गावरुन गाववाडय़ा त्याचबरोबर महाविद्यालये, हॉस्पिटल या सारख्या ठिकाणी जाण्यासाठी पर्यायी रस्त्यांची निर्मिती किंबहुना अद्यापि व्यवस्थाच नसल्याने आगामी काळात चार पदरी अवाढव्य महामार्ग ओलांडायचा तरी कसा? हाच मुख्य प्रश्न समोर असणार असून पर्यायी रस्त्याअभावी अपघाताचा धोका कायम राहणार आहे. कशेडी ते परशुराम घाट असा सुमारे ४४ कि.मी मार्गावरील चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. काही ठिकाणी सिमेंट चे रस्ते तयार होऊन या मार्गावरून वाहने वेगाने धावू लागली आहेत. तर एका लेनचे काम प्रगतीपथावर असून आगामी काही महिन्यात ते देखील मार्गी लागणार आहे.

मात्र सुरु असलेल्या या कामामध्ये चौपदरीकरणात गाववाडय़ांकडे जाण्यासाठी असलेले रस्ते कायमचे बंद झाल्याने महामार्गावर नागरिकांना गाडीची वाट पाहावी लागते. मात्र सद्यस्थितीत ही बाब धोक्याची असून ज्या ठिकाणी लोकवस्ती बाजारपेठ, अथवा रुग्णालय, महाविद्यालये, शाळा आहेत अशा ठिकाणी मात्र पर्यायी रस्ताच नसल्याने चार पदरी रस्ता ओलांडून जायचे तरी कसे? हा प्रश्न मात्र आजच्या घडीला कायम राहिला आहे. मार्गावरून वेगाने धावणारी वाहने आणि त्यात पर्यायी रस्ता नसल्याने जीव मुठीत धरून ओलांडावा लागणारा रस्ता यामुळे भीषण अपघताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कोणताही विकास करावयाचे म्हटले तर सर्वसामान्य जनतेचे हित पाहून त्यांना भेडसावणा-या समस्या लक्षात घेऊन त्या प्राधान्यक्रमाने सोडवण्याची गरज असते मात्र केवळ वाहतूक वेगाने व्हावी हाच एकमेव दृष्टीकोण समोर ठेवून केलेले विकासकाम सर्वसामान्य नागरिकाला मात्र मारक ठरू शकते याचा विचार संबधित यंत्रणेने केलेला नसल्याने महामार्गालगत राहणा-या नागरिकांचे काय असा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे.

कशेडी ते परशुराम घाट या ४४ कि.मी अंतरामध्ये अनेक गावे वाडय़ा वस्ती आहेत. मात्र चौपदरीकरणात या गावाकडे जाणारे रस्ते संपादीत करण्यात आले आहेत. त्यामुळे धोक्याची टांगती तलवार महामार्गालगत राहणा-या नागरिकांवर कायमच आहे. या चौपदरीकरणाच्या अखत्यारीत पर्यायी रस्ते , उड्डाण पूल यासारख्या गोष्टींचा समावेश असणे गरजेचे होते मात्र त्यावर उपाय योजना नसल्याचे सध्या तरी चित्र आहे. गाववाडय़ां बरोबर मुख्य रस्त्यावर तशी उपाययोजना गरजेचे आहे मात्र त्याच्या अभाव राहिल्यास अपघाताच्या दृष्टीने सुरक्षित बनवण्यासाठी करण्यात येणारे चौपदरीकरण मात्र अपघाताचे केंद्र ठरू शकते. याचे अनेक उदाहरणे महामार्गावर कायम आहेत.

कळंबणी उपजिल्हा रुग्णालय सारख्या ठिकाणी जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा अभाव असून अगदी चिंचोळ्या जागेतून वेगाने जाणा-या वाहने गेल्यानंतर च जावे लागते ही परिस्थिती कायम आहे. तर आता भरणे नाका येथे देखील चौपदरीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. मात्र या ठिकाणाहून ३२ गावाकडे जाणारा रस्ता देखील पर्यायी पूल अथवा रस्त्याच्या प्रतीक्षेत राहणार आहे. खेडहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक खेड भरणे मार्गावरून सुरु असते त्यात नवीन जगबुडी पुलावरून येणारी वाहतूक यामुळे भरणेनाका येथे मोठय़ा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे अ।शा ठिकाणी अपघाताचा धोका देखील वाढणार आहे.

काही दिवसापूर्वी लोटे येथील व्यापारी वर्ग एकत्र येत मिनी बाजार पेठ असलेल्या ठिकाणी उड्डाण पूल व्हावा अशी मागणी गेल्या ३ वर्षापासून लावून धरली आहे व त्याबाबत नुकतीच भूमिका देखील त्यांनी मांडली असल्याने संभाव्य धोका ओळखून व असलेली गरज यामुळे सर्वत्र नागरिकांनी अशीच भूमिका घेणे गरजेचे आहे. आगामी दिवसात चौपदरीकरणाचे काम वेगाने मार्गी लागणार आहे. मात्र गाव वाडय़ा, वस्ती , तांडे , हॉस्पिटल, शाळा महाविद्यालये , प्रमुख अंतर्गत रस्ते याकडे पर्यायी रस्ते अथवा पुलांची मागणी न झाल्यास अपघाता सारख्या अप्रिय घटनांना मात्र सर्वांनाच सामोरे जावे लागणार आहे.

अवश्य वाचा