चिपळूण 

येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी उभारण्यात आलेल्या विज्ञाननिष्ठ वीरपुरुष स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या ‘काव्यशब्दशिल्प’चा अनावरण सोहोळा येत्या रविवारी (दिनांक १३) सायंकाळी ५.३० वाजता संपन्न होणार असून यावेळी समाज सुधारक सावरकर या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. 

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे स्वातंत्र्य समरातील एक धगधगते अग्निकुंड. घरादारावर तुळशीपत्र ठेवून स्वतंत्रता भगवतीसाठी तनमनधन वेचणारा महापुरुष. जातीभेद निर्मुलनासाठी अग्रेसर असणारा महानायक. समतेची ध्वजा घेऊन धर्ममार्तंडांना आव्हान देणाऱ्या या विज्ञाननिष्ठ वीरपुरूषाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे हे ‘काव्यशब्दशिल्प’ आहे. या कार्यक्रमाला रत्नागिरीच्या पतितपावन मंदिर संस्थानचे अध्यक्ष अॅड. बाबासाहेब परुळेकर, विश्वस्त उन्मेश शिंदे, समाजभान असलेले उद्योजक सुरेशदादा बेहेरे उपस्थित राहणार आहेत. यावेळी धामणी-संगमेश्वरचे नामवंत वक्ते आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्याचे व्यासंगी अभ्यासक श्रीनिवास पेंडसे यांचे समाज सुधारक सावरकर या विषयावरील व्याख्यान होईल.

या महत्वपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष अरुण इंगवले, कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे, उपाध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कोषाध्यक्ष सुनील खेडेकर यांनी केले आहे.   

अवश्य वाचा