पाली/बेणसे

   सत्ता असो किंवा नसो विकासकामे करण्यास आम्ही सक्षम असल्याचे प्रतिपादन खा. सुनिल तटकरे यांनी केले. 

श्रीवर्धन म्हसळा मतदार संघाचा विकास हाच आमचा श्वास व ध्यास असल्याचे खा. सुनिल तटकरे म्हणाले. महाड पोलादपूर मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले यांनी सत्तेत असताना जेवढी कामे केली नाहीत तेवढी कामे आम्ही सत्तेत नसताना केली असे तटकरे यांनी यावेळी ठासून सांगितले. श्रीवर्धन मतदार संघाच्या महाआघाडीच्या उच्चशिक्षित उमेदवार आदिती तटकरे यांची प्रचारसभा तसेच खा. सुनिल तटकरे यांचा सत्कार असा संयुक्तिक कार्यक्रम मुंबईतील साहित्य संघ मंदिर गिरगाव येथे पार पडला. मतदारसंघातील म्हसळा तालुक्यातील  नोकरी व व्यवसायानिमित्त मुंबईत वास्तव्यास आलेल्या मतदारांशी खा. तटकरे यांनी संवाद साधला. व मतदानाच्या दिवशी आपल्या गाव, शहर व तालुक्याच्या सर्वागीण व शाश्वत विकासासाठी आदिती तटकरे यांना मतदान करून विजयी करा असे आवाहन खा. तटकरे यांनी केले. श्रीवर्धन व म्हसळा मतदारसंघातील जनता विकासावर प्रेम करते, आणि विकास हाच आमचा धर्म आणि विकासच आमची जात आहे हे येथील जनतेने लोकसभा निवडणुकीत दाखवून दिल्याचे  खा. तटकरे म्हणाले. श्रीवर्धन व म्हसळा मतदारसंघातील प्रत्येक गाव आणि वाडी माझ्या हृदयात आहे. विरोधकांना माझे आव्हान आहे की त्यांनी मी सांगितलेले  गाव दाखऊन द्यावे, ते त्यांना जमण्यासारखे नाही, अशी टीका  खा. तटकरे म्हणाले. प्रस्तापित पक्षांकडून आजवर  भावनिक व धार्मिक मुद्द्यावर जनतेची फसवणूक करण्यात आली मात्र आता सुज्ञ जनतेने विकासाला प्राधान्य देत विकासाला चालना देण्यासाठी त्यांना त्यांची जागा दाखवुन दिली व आम्हाला संधी दिली.  काम कोणतेही व कितीही कठीण असले तरी आम्ही ते करण्यास समर्थ आहोत याची जाणीव जनतेला आहे, म्हणून जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, स्वार्थापोटी पक्ष सोडून बाजूला जाणाऱ्या व्यक्तींना जाऊद्या, एखादी व्यक्ती बाजूला गेल्याने विचार बाजूला जात नाही,  पक्षाचा जनता पक्षाच्या विचाराशी बांधील आहे.  असे तटकरे म्हणाले. खा. तटकरे म्हणाले की राज्य व देशात भाजप प्रणित सरकार असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीत अत्यंत पोषक वातावरण आहे. मोदी नावाच्या त्सुनामी लाटेत देखील छ. शिवाजी महाराज व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने शौर्याने पावन झालेल्या भूमीत  माझ्यासारखा कार्यकर्ता निवडून आला याचा सार्थ अभिमान वाटतो. सलग ३० वर्षाहून अधिक काळ रायगड जिल्ह्याच्या विकासात्मक वाटचालीत जे योगदान दिले त्याचेच फळ लोकसभा निवडणुकीत मिळाले असल्याचे समाधान वाटते. पक्षाने ज्यांना मान, सन्मान, प्रतिष्ठा मिळवून दिली आज ते पक्ष सोडून जात आहेत, तळागळातील कार्यकर्ते हे पक्षाच्या विचारधारेशी बांधील आहेत. ते आजही पक्षासोबतच आहेत त्यामुळे आगामी निवडणुकात महाआघाडी बाजी मारेल असा भरभक्कम विश्वास खा. सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. याबरोबरच पक्षात नव्याने सामील होत असणाऱ्या युवा वर्गामुळे पक्षसंघटना अधिक बळकट होत आहे. श्रीवर्धन व म्हसळा माझा हक्काचा मतदार संघ आहे. आजवर दोनदा माझ्याविरोधात निवडणूक लढविता ना पराभूत झालेले उमेदवार आता माझ्या मुलीच्या विरोधात उध्दव ठाकरेंचे आदेश मानून उभे राहिले आहेत त्यांची आम्हाला चिंता नाही, कारण जनता विकासाला प्राधान्य देऊन आदितिना निवडून देणार असा विश्वास असल्याचे तटकरे म्हणाले. समाजातील प्रत्येक समाजघटकाला सर्वधर्मसमभाव जोपासत प्रतिनिधित्व करण्याची संधी पक्षाने उपलब्ध करून दिली असल्याचे तटकरे म्हणाले. यावेळी उपस्थित मतदारसंघातील मुंबईवासियांनी आदिती तटकरे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा एकमुखी निर्धार व्यक्त केला. 

      यावेळी आमदार अनिकेत तटकरे, प्रदेश उपाध्यक्ष दाजी विचारे,प्रदेश सरचिटणीस अली कौचाली, मुंबई कमिटी कार्याध्यक्ष जयंत चिवडे,आदींनी विचार मांडले.या कार्यक्रमास मुंबई कमिटी अध्यक्ष महेश शिर्के, जिल्हा परिषद सदस्य बबन मनवे, उपसभापती संदीप चाचले, सदस्य मधुकर गायकर, उपाध्यक्ष रवींद्र तटकरे, सचिव सुनील महाडिक, वरवठणे गण अध्यक्ष सतीश शिगवण, अनिल बसवत, शांताराम गायकर, वैशाली सावंत,सरपंच अंकुश खडस, संतोष पाखड, रामदास रिकामे, लहू म्हात्रे, नथुराम निवाते, श्री नलावडे, महेंद्र पेंढारी, राजेंद्र विचारे  आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

अवश्य वाचा