खेड 

महामार्गावरून धावणाऱया वाहनचालकांसह परिसरातील जनतेची ‘रक्षणकर्ती’ बनलेल्या भरणेतील ब्रिटीशकालीन पोलीस चौकीची ओळख पुसली गेली आहे. चौपदरीकरणामुळे चौकीवर रविवारी सायंकाळच्या सुमारास बुलडोझर फिरवण्यात आला. ही चौकी जनतेसह असंख्य वाहनचालकांची वर्षानुवर्षांची साक्षीदार होती. याच चौकीलगतग्प्प्  वर्षानुवर्षाचा रिक्षा थांबाही जमीनदोस्त झाला असून रिक्षा व्यावसायिकांनी नव्या जागेचा शोध सुरू केला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरून दिवस-रात्र धावणाऱया वाहनांवर देखरेख ठेऊन जनतेच्या रक्षणार्थ भरणे येथे ब्रिटिशांच्या काळात पोलीस चौकी उभी राहिली. भरणे परिसर वाहनांच्या रेलचेलीने सतत गजबजलेला असतो. मुंबईहून गोव्याकडे व गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱया वाहनचालकांच्या क्षणभर विश्रांतीसाठी भरणे हे मध्यवर्ती ठिकाण याचमुळे शेकडो वाहने याठिकाणी थबकतात. याशिवाय परिसरातून बाजाररहाटीसाठी येणाऱयांची संख्यादेखील सर्वाधिक असते. याचमुळे भरणे परिसर सतत रहदारीने गजबजलेला असतो.

महामार्गावरून धावणाऱया वाहनांसह जनतेच्या रक्षणासाठी उभारण्यात आलेल्या भरणे येथील पोलीस चौकीत सुरूवातीला शाळा भरायची. त्याकाळी परिसरात शाळेची कुठलीच व्यवस्था नव्हती. याचमुळे या पोलीस चौकीतच धडे गिरवले जायचे. मात्र, परिसराचा वाढता विस्तार अन् लोकसंख्येमुळे शाळेचे रूपांतर पोलीस चौकीत झाले. महामार्गावर कुठेही चोरीची घटना घडल्यास सर्वप्रथम भरणे येथे नाकाबंदी केली जात असे. अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यातही या पोलीस चौकीने महत्त्वाची भूमिका निभावली आहे. खऱयाअर्थाने परिसरातील जनतेची रक्षणकर्तीच बनली होती.

सणांच्या कालावधीसह सुट्टीच्या हंगामात भरणे येथे प्रवाशांची गर्दी उसळते. या पार्श्वभूमीवर पोलीस चौकीत दिवस-रात्र कार्यरत असणाऱया पोलीस कर्मचाऱयांकडून सर्वांवर देखरेख ठेवली जात असे. अनेक घटनांचा उलगडा करण्यात देखील पोलीस चौकीचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. याशिवाय अपघातग्रस्तांना तातडीने मदतकार्य मिळवून देण्यासाठी पोलीस चौकी एकप्रकारे वरदानच ठरत होती. मात्र चौपदरीकरणातून सर्वसामान्य जनतेची रक्षणकर्ती बनलेली ब्रिटीशकालीन पोलीस चौकीही सुटली नाही.

भरणे परिसरातील चौपदरीकरणाच्या कामासाठी सपाटीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. चौपदरीकरणाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याने भरणे पोलीस चौकीवर रविवारी सायंकाळच्या सुमारास बुलडोझर फिरवून सभोवतालचा परिसर जमिनदोस्त करण्यात आला. याच चौकीलगत रिक्षा स्टॅण्डही आहे. असंख्य रिक्षा व्यावसायिकांसाठी हा स्टॅण्ड तारणहार बनला होता. मात्र चौपदरीकरणाच्या कामामुळे रिक्षा थांबाही भुईसपाट झाला असून वर्षानुवर्षे असलेली रिक्षा थांब्याची ओळखही कायमची पुसली आहे. यामुळे याठिकाणी प्रवाशांची असणारी सततची वर्दळ देखील थांबली असून रिक्षा व्यावसायिकांना नव्याठिकाणी रिक्षा थांब्याची उभारणी करावी लागणार आहे.

 

अवश्य वाचा