चिपळूण 

येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, कोकण मराठी साहित्य परिषद शाखा चिपळूण आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चिपळूण यांच्या वतीने येत्या शनिवारी (दिनांक १२) सायंकाळी ५.३० वाजता वाचनालयाच्या उषाताई साठे सभागृहात ‘नमनेश्वर साहित्य दर्शन’ हा टेरव-चिपळूणचे प्रथितयश कवी, लेखक अॅड. यशवंत बाबुराव कदम यांच्या साहित्याचा परिचय करून देणारा कार्यक्रम होणार आहे.

सन १९७५ साली कदम यांनी गुरु सद्गुरू दत्तात्रय शिंदे महाराजांचे जीवन परिचय करून देणारे पुस्तक लिहिले. दिनांक ५ जून २०१० रोजी कदम यांचा ‘जीवनगाणे’ हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर ‘अंतरंग’ काव्यसंग्रह, जयदुर्गे आरतीसंग्रह प्रकाशित झाला. जयदुर्गेच्या ४ आवृत्या निघाल्या. सन २०१२ साली त्यांचा ‘भक्तिरंग’ काव्यसंग्रह प्रकाशित झाला. २०१३ साली ‘बोलविता धनी वेगळाची’ आणि त्यांनी लिहिलेले, वडील कै. बाबुराव अनंत कदम यांचे ‘तांडव’ हे सन १९९३ ला लिहून तयार असलेले चरित्रही प्रकाशित झाले. २०१५ साली श्रीकुलस्वामिनी आई-भवानी वाघजाई देवस्थान, श्रीक्षेत्र टेरव मंदिराचा समग्र इतिहास, २०१६ ला ‘बोलके झाड’ हा पहिला कथासंग्रह, एप्रिल २०१६ ला ‘दसपटीच्या श्री रामवरदायिनीचा इतिहास’ हे त्यांचे संपादित पुस्तक, २०१७ ला ‘आकाशाचे पंख’ हा दुसरा कथासंग्रह तर २०१८ साली ‘अंतरीचा दीप’ ही अभंगगाथा अशी एकूण १८ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. पुढचं पाऊल, मावळतीच्या साक्षीने हे कवितासंग्रह, मुंबईची महालक्ष्मी, संतश्रेष्ठ शंकरदेव यांच्या चरित्राचे मराठी भाषांतर, शब्द्स्फोट हा त्यांचा हिंदी काव्यसंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे.

चिपळूणातील साहित्यिक, प्राध्यापक, लेखक, कवी, कलावंत यांचा या कार्यक्रमात सहभाग असणार आहे. काव्यवाचन, काव्यगायन, गीतगायन, कथाकथन, आत्मनिवेदनपूर्ण कथन, मुलाखत यातून अॅड. यशवंत कदम यांच्या साहित्याचे दर्शन रसिकांना घडणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन कोकण मराठी साहित्य परिषद शाखा चिपळूणच्या कार्याध्यक्ष प्रा. अंजली बर्वे, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चिपळूणचे अध्यक्ष प्रा. संतोष गोणबरे यांनी केले आहे.

अवश्य वाचा