कर्जत 

             रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेस मधून शिवसेनेत प्रवेश केला होता. आज दि.9 ऑक्टोबर त्यांनी आमदार सुरेश लाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्वगृही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करून लाड यांना वाढदिवसाची भेट दिली.

              सुरेश टोकरे जिल्हापरिषद सदस्य होते. बरोबर पाच वर्षांपूर्वी त्यांना आमदार सुरेश लाड यांच्या गळ्यात आग्रहाखातर जिल्हापरिषद अध्यक्ष पदाची माळ पडली. केवळ एक वर्षांसाठी हे पद असताना पुन्हा लाड यांनी आग्रह धरल्याने ते पूर्ण अडीच वर्षे अध्यक्षपदी होते. त्यांनी गेल्यावर्षी 28 फेब्रुवारी 2018 रोजी शिवबंधन बांधून घेऊन शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना त्यावेळी जिल्हाप्रमुख पद देण्यात येणार होते. परंतु दीड वर्ष होऊन सुद्धा काहीच मिळाले नाही. तत्पुर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचे सुद्धा ठरविले होते परंतु कुठे माशी शिंकली हे समजले नाही. त्यातच विधानसभा निवडणुका जाहिर झाल्या त्यांनी शिवसेनेकडून इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखत सुद्धा दिली. मात्र शिवसेनेने महेंद्र थोरवे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या टोकरे यांनी स्वगृही जाण्याचा निर्णय घेतला.

          आज आमदार सुरेश लाड यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून टोकरे यांनी कर्जतच्या राष्ट्रवादी भवन मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष दत्ता मसुरकर, प्रदेश सरचिटणीस हनुमंत पिंगळे, प्रदेश प्रतिनिधी भगवान भोईर, तालुकाध्यक्ष अशोक भोपतराव, शहराध्यक्ष नंदकुमार लाड, माजी नगराध्यक्ष शरद लाड, राजेंद्र निगुडकर,सुनिल लाड, शंकर भुसारी आदींच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

अवश्य वाचा