यंदाच्या कर्जत खालापूर विधानसभा निवडणुकीत दिवसागणिक रंजकता निर्माण होत आहे. खरं तर सुरवात झाली ती शिवसेनेसारख्या पक्ष संघटनेत कधी नव्हे ते पहिल्यांदाच सात ते आठ शिवसैनिक अर्थात इच्छुक उघड उघड आपणांस  उमेदवारीसाठी पात्र समजत होते. राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, शेकाप आणि मित्र पक्ष आघाडी  सुरेश लाड यांच्या पलीकडे जाऊन विचार करत नव्हती. वंचित आघाडी किंवा इतर पक्षांचा निवडणुकीच्या स्पर्धेत सहभाग हा विचाराधीन नव्हता.  निवडणुकीच्या रणधुमाळीत  पुढे पुढे झालं ते भलतंच.   सेनेतल्या इच्छुकांना आपली वळकटी बांधावी लागली आणि त्यांच्यावर अनपेक्षितपणे महेंद्र थोरवे यांच्यासाठी काम करण्याची पाळी आली. त्याच दरम्यान सुरेश लाड यांनी आपण निवडणूक लढवणार नाही अस मनसुबा व्यक्त केल्याने आघाडीत खळबळ उडाली. आघाडीत  मात्र इतर कोणी दावेदार उमेदवारीसाठी पुढे आला नाही. शिवसेनेच्या उमेदवारीचे दमदार दावेदारहनुमान पिंगळे यांनी    महेंद्र थोरवे यांच्या प्रचाराचा भर खांद्यावर घेण्या ऐवजी त्यांनी चक्क शिवबंधन काढून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांत प्रवेश करत,  युती विरोधात थेट बंडाचा झेंडा फडकवला. हनुमान पिंगळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांत  प्रवेश करताच तेच आघाडीचे उमेदवार असणार अशी अटकळ बांधण्यात आली,  मात्र मी उमेदवारीसाठी नव्हे तर, युतीच्या उमेदवाराचा पराभव करण्याच्या इराद्याने विरोधी भूमिका घेतल्याचे त्यांनी जाहीर केले. शेवटी सुरेश लाड यांना पक्षश्रेष्टी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आघाडीची उमेदवारी स्वीकारावी लागली. 

आता युती आणि आघाडी एकमेका विरोधात उभी ठाकली. युतीत सगळं कांही  सुरळीत आहे हे दाखविण्याच्या नादात तिकिटाच्या स्पर्धेत असलेल्या सुनील पाटील यांच्या सारख्या एक दोन नेत्यांसोबत मनोमिलन झाल्याचे दाखले देण्यासाठी फोटोसेशन झाले. मात्र इतर इच्छुकांच्या सोबत सूत जुळल्याचे काही दाखले बघायला मिळाले नसल्याने त्यांची भूमिका संदेहात्मक राहिली. आघाडीत "कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही" असे दर्शवले जाऊ लागले,  शेकाप आघाडीत नाराज आहे आणि  राष्ट्रवादीचे  काही नेते पक्षांतराच्या मूडमध्ये असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. आघाडीच्या मेळाव्यात कर्जत येथे शेकाप हा सर्व ताकदीनिशी सुरेश लाड यांच्यासाठी जीवाचे रान करणार असे शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत  पाटील यांनी जाहीर करून एका शंकेचे निरसन केले.   समाजवादी पक्ष , बी आर एस पी. स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी आणि अन्य पक्षाच्या धुरिणींनी आपले कार्यकर्ते आघाडीच्या विजयासाठी प्रामाणिकपणे कामाला लागले असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आघाडी पक्की असल्याचे दिसून आले. 

आघाडी आणि युती यांच्यात थेट लढत आहे हे स्पष्ट होत असताना,  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर सेनेत प्रवेश करणार असल्याच्या वावड्या उठल्या.  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे खंदे  समर्थक सेनेच्या बंधनात अडकणार अश्या चर्चांना उधाण आले. शेवटी व्हायचे तेच झाले पेण बँक संघर्ष समितीचे  उमेदवार नरेन जाधव यांनी निवडणुकीतून आपली उमेदवारी मागे घेतली आणि पेण बँकेच्या संघर्षात अग्रणी भूमिका राबवणारे दत्तात्रेय  मसुरकर यांच्यावरचे नैतिक बंध खुले झाले. मसूरकरांनी तर थेट पत्रकार परिषद घेऊन आपण अघाडीच्या प्रचारांत उतरणार असल्याचे स्पष्ट करत सेना प्रवेशाच्या अफवांतली हवाच काढून टाकली. त्यांच्या सॊबत त्या पत्रकार परिषदेत त्यांचे सर्व समर्थक आणि कार्यकर्ते उपस्थित होते हे विशेष. 

कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघात आघाडी विरुद्ध युती अशी थेट लढत आणि प्रचार कश्या  स्वरूपाचा असेल  याची सर्वांना  उत्सुकता लागून राहिली आहे.  हा नाराज,  तो आपला, त्याचा आपल्याला छुपा पाठींबा, त्याचे समर्थन असे मुद्दे गौण असणार आहेत.   प्रचाराच्या मंथनातून कोणते कळीचे मुद्दे मतदारांना आपल्या कडे खेचून घेतील याकडे लक्ष लागून राहिले आहे. 

दसरा आणि नवरात्रीच्या धामधुमीत राजकीय हालचाल नको असा इरादा करून थोडी सबुरी स्वीकारलेले सुरेश लाड आणि महेंद्र थोरवे हे खऱ्या अर्थाने प्रचारासाठी बाहेर पडणार असल्याने  वातावरण नव्याने तापण्यास सुरवात होणार आहे. वेगवेगळ्या बातम्या, सोशियल मीडियावरच्या चर्चा,  युट्युब, फेसबुक आणि व्हाट्स ऍपवरचे मेसेज धमाल उडवत आहेत.  सुरेश लाड यांचा उद्या  ९ तारखेला वाढदिवस असल्याने अजून काहीतरी पूरक मुद्दा उपस्थित होणार असे दिसते. वाढदिवसाचे औचित्य साधून या मतदार संघातील निर्णायक भूमिका जमेला  ठेवणारा  बहुजनांचा नेता आघाडीत डेरेदाखल होणार आहे अशी चर्चा आहे. 

बोटावर शाई लावण्यासाठी हाताच्या बोटावर मोजण्या इतके दिवस उरले असतांना काय काय उलथापालथ होणार हे पहावे  लागेल. 

अवश्य वाचा