उरण  

लोकसभा निवडणुकीच्या वेळी शेकापक्षाने आपले आघाडीचे उमेदवार पार्थ दादा पवार यांना जी मतांची आघाडी मिळवून दिली त्याची परतफेड करण्यासाठी माझा राष्ट्रवादी काँग्रेसचा बहाद्दर कार्यकर्ता सज्ज झाला असून विवेक पाटील यांचा किमान सव्वा लाख मतांनी विजय होईल ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांनी उरण येथे केले . राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक आजा आघाडीचे उमेदवार विवेक पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली यावेळी व्यासपीठावर पनवेल तालुका राष्ट्रवादी चे अध्यक्ष दर्शन ठाकूर , उरण तालुका अध्यक्ष मनोजदादा भगत , उरण विधानसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सौ.भावनाताई घाणेकर , संध्याताई ठाकूर , शहर अध्यक्ष गणेश नलावडे , माजी नगरसेवक जैद नूर मुल्ला , आनंदशेठ भिंगारडे आदी मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी बोलताना प्रशांत पाटील यांनी उरण तालुक्याची झालेल्या दयनीय अवस्थेवर नेमके बोट ठेवत विरोधकांवर टीका केली ते म्हणाले की डी पी डी सारख्या धोरणाच्या अंमलबजावणी मुळे मर्क्स मधील 99 कामगारांना पुन्हा कामावर घेण्याबाबत उरणामधील स्वयंघोशीत नेत्याने आंदोलन केले आणि त्या कामगारांना चुकीचा सल्ला देऊन त्यांच्यावर केसेस झाल्या आणि ते कामगार ऐन गणपतीच्या सणात जेलात गेले होते ते पाप कोणाचे असा सवाल करीत भाजपाचे अपक्ष उमेदवार महेश बालदी याच्यावर सडकून टीका केली .केवळ दलाली करून कमावलेल्या पैशांवर कोणी निवडून येण्याच्या वल्गना करीत असेल तर आमचा स्थानिक आगरी , कोळी,  कराडी भूमिपुत्र ते कदापीही होऊन देणार नसल्याचा इशारा देतानाच स्थानिकांच्या कोणत्यांही आंदोलनात जो कधीच नव्हता आणि प्रकल्पग्रस्तानचे लाड आता पुरे झाले असे म्हणणाऱ्या ला उरणचा स्थानिक प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र या निवडणुकीत त्याच भाषेत उत्तर दिल्याशिवाय राहणार नसल्याचे प्रशांत पाटील यांनी सांगून या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता बाकी सर्वापेक्षा दोन पावले पुढे राहत आघाडीचे काम करीत विवेक पाटील यांना विधिमंडळात पाठविल्या शिवाय राहणार नसल्याचे अभिवचन त्यांनी दिले.

              यावेळी बोलताना मा आ. विवेक पाटील यांनी खऱ्या अर्थाने राज्यात यावेळी सत्तापालट होणार असून आपल्या सर्वांचे नेते शरद पवार साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने आणि एकदिलाने काम करू या असे आवाहन केले . ही निवडणूक आपल्या सर्वांच्या अस्तित्वाची लढाई असल्याने कार्यकर्त्यांनी गाफील न राहता कामाला लागा आपला विजय नक्की असल्याचा विश्वास त्यांनी दिला . कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविकातून तालुका अध्यक्ष मनोजदादा भगत यांनी लोकसभा निवडणुकीत शेकापच्या कार्यकर्त्यांनी ज्या प्रमाणे काम केले त्याच्या पेक्षा दुप्पट ताकद लावून आम्ही या निवडणुकीत काम करणार असल्याची ग्वाही दिली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उरणमधील जेष्ठ पत्रकार अजित पाटील यांनी केले.

अवश्य वाचा