अलिबाग

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जिल्ह्यात सुरु असताना गेल्या दसर्‍यापासून परतीच्या पावसाने देखील वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या निवडणूक प्रचारावर पाणी पडू लागले आहे. या पावसामुळे दसर्‍याच्या उत्साहावरही चांगलेच पाणी पडले. अनेक ठिकाणी पावसातच विसर्जन मिरवणूका काढाव्या लागल्या. झोडपत असलेल्या पावसामुळे ऐन ऑक्टोबरमध्ये हिटऐवजी ओलेचिंब होण्याची वेळ रायगडकरांवर आली आहे. दरम्यान, हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार बुधवारसह गुरुवार 10 व शुक्रवार 11 ऑक्टोबर रोजी रायगड आणि ठाणे जिल्ह्यात विजेच्या कडकडाट आणि वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.  
नवरात्रौत्सवाची मंगळवारी उत्साहात सांगता झाली. विसर्जनाच्यावेळी देखील वरुणराजाने जोरदार हजेरी लावली. हा परतीचा पाऊस असल्याने विजांचा कडकडाटही जोरात होत आहे. बुधवारीही सायंकाळनंतर पावसाने हजेरी लावली.हा पाऊस आणखी तीन दिवस पडण्याची शक्यता मध्यवर्ती वेधशाळेने वर्तविली आहे.त्यामुळे उमेदवारांच्या निवडणूक प्रचारात खंड पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उत्तर कोकण विभागात ताशी 1300 वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने सावधगारीचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. तसेच 9 ऑक्टोबर रेाजी वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाची शक्यता रायगडसह ठाणे जिल्ह्यात वर्तविण्यात आली होती. तर 10 ऑक्टोबर रोजी आणि 11 ऑक्टोबर रोजी देखील वादळी वार्‍याचा इशारा देण्या आला आहे.
सध्यातरी प्रमुख उमेदवारांनी मतदारांशी थेट संपर्क साधण्यावर भर दिलेला आहे. शेकापतर्फे आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी जाहीर सभांबरोबरच गावोगावी भेटी देण्याचा धडाका सुरु केला आहे. त्या दौर्‍यांना जिल्ह्यात चांगलाच प्रतिसाद लाभत आहे. अलिबागेतील शेकापचे उमेदवार पंडित पाटील यांनीही मतदारांशी, कार्यकर्त्यांनी संवाद साधण्यावर विशेष भर दिलेला आहे. धैर्यशील पाटील, विवेक पाटील, हरेश केणी या शेकाप उमेदवारांबरोबरच राष्ट्रवादीचे सुरेश लाड, आदिती तटकरे, काँग्रेसचे माणिकराव जगताप हे सुद्धा मतदारांशी संवाद साधत आहेत. अजून तरी कोणत्याही स्टार नेत्यांची सभा रायगड जिल्ह्यात झालेली नाही. कदाचित पुढील आठवड्यात या सभांचा धडाका सुरु होईल, असा अंदाज आहे. तोपर्यंत भर पावसात देखील महाआघाडीचे नेते मतदारांशी संवाद साधत आहेत. सर्वच नेतेमंडळी पाऊस कधी थांबतोय याची प्रतीक्षा करीत आहेत.
विद्यार्थ्यानाही फटका
या पावसाचा फटका विद्यार्थ्यांनाही बसत आहे.अचानकपणे कोसळणार्‍या पावसाने शाळेतून घरी जाताना या सर्वांनाच कसरत करावी लागत आहे.

अवश्य वाचा