चिपळूण ; येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने या वर्षापासून एका नव्या ‘अपरान्त भूषण’ या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. वाचनालयाचे भूतपूर्व अध्यक्ष अप्पासाहेब जाधव यांच्या सामाजिक आणि साहित्यिक कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या स्मरणार्थ वाचनालयातर्फे ‘अपरान्त भूषण पुरस्कार’ देण्यात येणार आहे. कै. अरविंद तथा अप्पासाहेब जाधव यांच्या नावाने वाचनालयाने ‘अपरान्त संशोधन केंद्र’ सुरु केले आहे. अप्पासाहेब जाधव हे वाचनालयाचे आधारस्तंभ होते. त्यांच्याच नेतृत्वाखाली वाचनालयाने सन २०१३ साली ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केले होते. कोकणातील साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, इतिहास संशोधक, पर्यावरण क्षेत्र आदि विषयात लक्षणीय कार्य केलेल्या व्यक्ती अथवा संस्थेला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. रुपये पंचवीस हजार, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असेल. सातत्याने विविधांगी समाजाभिमुख उपक्रम राबविणाऱ्या वाचनालयातर्फे संग्रहालयापाठोपाठ उभारण्यात येत असलेल्या कलादालनाचेही पुढील नोव्हेंबर महिन्यात उद्घाटन होणार आहे. कै. अप्पासाहेब जाधव यांच्या नावाने पुरस्कार जाहीर करताना संस्थेला अतिशय आनंद होतो आहे, अशा शब्दात वाचनालयाचे अध्यक्ष अरुण इंगवले आणि उपाध्यक्ष धनंजय चितळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अवश्य वाचा