उरण 

नवरात्रोत्सवाचा गरबा आज संपणार असला तरी विधानसभेचा राजकीय गरबा मात्र खर्‍या अर्थाने आजपासून सुरू होणार आहे. उरण विधानसभेसाठी युतीत बंडोखोरी झाल्याने शिवसेना, शेकाप व अपक्ष अशी तिरंगी अशी लढत होणार आहे.

शिवसेना -भाजपची युती घोषित झाली आणि अनेक इच्छुकांच्या राजकीय महत्वकांक्षेला सुरुंग लागला. स्वबळावर लढण्याची चाचपणी करण्यासाठी दोन्ही पक्षाच्या नेतृत्वाने प्रत्येक मतदारसंघात एका कार्यकर्त्याला निवडणुकीची तयारी करण्याचे फर्मान सोडले. गेली 2 ते 3 वर्षे त्या कार्यकर्त्यांने प्रतिस्पर्ध्याला टक्कर देण्यासाठी कार्यकर्त्यांची फौज तयार केली. त्यांच्या इच्छेनुसार खर्च केला. मतदारसंघात मेहनत करून आपला गट निर्माण केला. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या सर्व मनसुब्यावर पाणी फेरले आहे. त्यामुळे ज्यांना निवडून येण्याची खात्री आहे अशा उमेदवारांनी बंडोखोरी केली आहे. मात्र या सगळ्यात पक्षधर्म खुंटीला टांगला गेल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे. उरणमध्येही असेच चित्र पहावयास मिळते.

युतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून बंडखोरांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले महेश बालदी यांनी उमेदवारी कायम ठेवीत बंडाचे निशाण फडकवित ते प्रचारात मग्न आहेत. त्यामुळे शिवसेनेचे मनोहरशेठ भोईर यांना अडचणीचे ठरू शकते. 190 उरण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे मनोहरशेठ भोईर, शेकाप आघाडीचे विवेक पाटील आणि अपक्ष महेश बालदी अशी तिरंगी लढत पहायला मिळेल.  आज दसरा मोठ्या उत्साहात साजरा करीत नवरात्रोत्सवाचा गरबा संपला असला तरी आता खर्‍या अर्थाने विधानसभा निवडणुकीचा गरबा रंगणार असल्याची चर्चा मतदारात सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीच्या आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीही भाजपाचे महेश बालदी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार दिल्याने त्यांची बंडखोरी कायम राहिली आहे. परंतु पनवेलमधून शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आपण उमेदवारी मागे घेत असून युती धर्म पाळणार असल्याची प्रतिक्रिया बबनदादा पाटील यांनी दिली.

उरणमध्ये युतीत बंडाळी माजल्याने त्यांची मते विभागून त्याचा फायदा शेकापच्या उमेदवाराला होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उरणमध्ये निवडणूक रिंगणात 8 उमेदवार असले तरी खरी लढत तिघांमध्ये होणार आहे. त्यामुळे या तिरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारतो, हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे. त्यामुळे उरणच्या निकालाकडे राजकीय पक्षांचे व मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.

अवश्य वाचा