नवी दिल्ली, 

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील शारदा दाते यांची वयोश्रेष्ठ प्रतिष्ठित माता राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली असून 3 ऑक्टोबर 2019 ला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्यावतीने उल्लेखनीय योगदानासाठी दरवर्षी वयोश्रेष्ठ प्रतिष्ठीत माता पुरस्कार प्रदान करण्यात येतात. स्वत:च्या असाध्य रोगावर मात करत आपल्या गतीमंद मुलाला इंटरनॅशनल सेलिब्रेटीपर्यंत पोहोचवण्याची किमया करणाऱ्या इंचलकरंजी येथील शारदा दाते यांची यावर्षीच्या वयोश्रेष्ठ प्रतिष्ठीत माता पुरस्कारासाठी निवड झाली आहे. २ लाख ५० हजार रुपये आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

शारदा दाते स्वत: कर्करोगाने ग्रस्त असून त्यांच्या पोटी प्रथमेश हा गतिमंद मुलगा जन्माला आला. असाध्य रोगाच्या अंतर्यातना आणि मुलाच्या बाह्ययातना अशा कठीण समयी डगमगून न जाता शारदा दाते यांनी या दोन्हींचा धिटाईने सामना केला. आपल्या गतिमंद मुलाच्या प्रगतीसाठी त्यांनी जीवाचे रान करत मातृत्वाचा आदर्श निर्माण केला. मुलावर उपचार सुरु असतानाच त्याचे शिक्षणही पूर्ण केले आणि त्याला स्वत:च्या पायावर उभे केले.

इचलकरंजी येथील डि.के.टी.ई. संस्थेच्या टेक्स्टाइल इंजिनिअरींग कॉलेजमध्ये मागील ११ वर्षांपासून प्रथमेश हा ग्रंथपाल सहायक म्हणून कार्यरत आहे. त्याच्या याच कर्तुत्वाचा सन्मान म्हणून प्रथमेशला राष्ट्रीय दिव्यांग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  प्रथमेशच्या आदर्शवत कार्याचे कौतुक म्हणून त्याला स्वानुभव कथनासाठी देश -विदेशातून आमंत्रणही येतात तो आता इंटरनॅशनल सेलिब्रेटी  झाला आहे.    

शारदा दाते या आईच्या कष्टाचेच हे फळ असून गौरवाची बाब म्हणजे या मुलाला घडवत त्याला राष्ट्रीय पुरस्कार विजेता बनविणा-या मातेलाही आता राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शारदा दाते यांनी समाजापुढे घालून दिलेल्या श्रेष्ठ मातेच्या आदर्शामुळेच त्यांची या पुरस्कारासाठी‍ निवड झाली आहे.

येथील विज्ञान भवनात ३ ऑक्टोबर २०१९ रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शारदा दाते यांना  गौरविण्यात येणार आहे.

अवश्य वाचा