सांगोला

सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळात होरपळत असलेल्या सांगोला तालुक्यात गेल्या दोन ते तीन दिवसापासून परतीच्या पावसाने थोड्याफार प्रमाणात हजेरी लावली आहे.   परंतु दोन ते तीन वर्षापासून दुष्काळात असलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना दोन ते तीन दिवसापासून पडत असलेल्या परतीच्या पावसाचा फारसा उपयोग होणार नाही त्यामुळे जोपर्यंत परतीचा पाऊस दमदार व आणखीन उर्वरीत नक्षत्रात हजेरी लावत नाही तोपर्यंत चारा छावण्या बंद करु नयेत. अशी मागणी सर्वसामान्य शेतकऱ्यांमधून होत आहे.

पावसाने दिलेली ओढ व खालावलेली भूजल पातळी यामुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला होता. शासनाने चारा छावण्या सुरु करुन शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा दिला त्यामुळे  तालुक्यातील 146 छावण्यामध्ये तब्बल 1 लाख 13 हजार लहान मोठी जनावरे दाखल झाली होती. त्यानंतर पावसाचे कमी अधिक प्रमाण व इतर कारणामुळे काही शेतकऱ्यांनी आपले जनावरे घरी नेली. परंतु अल्पभुधारक शेतकरी व शेतीच्या पाण्याची सोय नसणाऱ्या शेतकऱ्यांना आपली जनावरे छावणीतच ठेवण्याशिवाय पर्याय नाही.

 परतीच्या पावसाचे आशादायी ढग जरी तालुक्यात थोड्याफार प्रमाणात बरसत असले तरी एवढ्याशा पावसाने शेतात लगेच चारा उगवत नाही. त्यामुळे जोपर्यंत आणखी समाधानकारक पाऊस व चाऱ्याची योग्य सोय होत नाही तोपर्यंत चारा छावण्या सुरु ठेवणे गरजेचे असल्याचे मत शेतकऱ्यांमधून व्यक्त केले जात आहे. सध्या सुरु असलेल्या चारा छावण्यांना आणखी मुदतवाढ द्यावी जेणेकरुन जिरायत शेती व पाण्या संदर्भात फारशी सोय नसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.

सध्या सुरु असलेल्या पावसामुळे चाऱ्याचा प्रश्न तात्काळ व लगेच मिटणार नाही. 30 सप्टेंबरला चारा छावण्या बंद होणार असल्याच्या चर्चेने शेतकरी हवालदिल झाला असून जर 30 सप्टेंबर नंतर पावसाने परत पाठ फिरविली तर परत जनावरे जगवायची कशी असाही मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. परतीच्या पावसाच्या थोड्याफार आगमनामुळे बळीराजा आणखीनच आशादायी बनला आहे. छावणीच्या दावणीपासून सुटका मिळावयाची असल्यास परतीच्या पावसाने दमदारपणे हजेरी लावणे गरजेचे आहे.

 

अवश्य वाचा