श्रीवर्धन :

महाराष्ट्र विधानसभेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुका अगदी तोंडावर आल्याने महाराष्ट्रात सर्वत्र राजकीय युत्या -आघाड्या इ. ची जुळवाजुळव सुरू असून लवकरच विविध राजकीय पक्षांचे मतदार संघनिहाय उमेदवार जाहीर करण्यात येतील. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचा विचार केला असता हा पै. बॅ. ए. आर. अंतुले, कै. रविंद्र राऊत यांचे काळात पुष्कळ वर्षे सलग कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. नंतर तो शिवसेनेने हस्तगत केला. शिवसेनेचे श्री. शाम सावंत तेथील बरेच वर्षे आमदार होते. ते कॉँग्रेसमध्ये गेल्यावर झालेल्या मध्यावधी निवडणु-कींत त्यांचा पराभव होऊन शिवसेनेचे श्री. तुकाराम सुर्वे आमदार झाले. पुढे 2009 च्या सार्वत्रिक निवडणुकीत विद्यमान खासदार श्री. सुनिल तटकरे यांनी श्री. तुकाराम सुर्वे यांचा पराभव केला व पाच वर्षे त्यांनी आमदार म्हणून काम केले. तसेच त्यांना या काळात विविध खात्यांचे मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी आपल्या कामकाजाचा एक वेगळा ठसा या मतदार संघावर उमटविला. तो आजतागायत कायम आहे. आता ते खासदार आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाने सर्वाधिक लीड मिळवून दिला होता. 

मधल्या काळात म्हणजे 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्री. अवधूत तटकरे  यांनी शिवसेनेचे उमेदवार श्री. रवी मुंढे यांचा केवळ 77 मतांनी पराभव करुन ते आमदार म्हणून निवडून आले. त्यावेळी शिवसेनेमधून भा. ज. प. मध्ये गेलेले श्री. कृष्णा कोबनाक हेही एक प्रमुख उमेदवार होते. परंतु गेल्या पाच वर्षांत या मतदारसंघाची राजकीय परिस्थिती फार बदलली आहे. श्री. सुनिल तटकरे हे रायगडचे खासदार म्हणून निवडून आले तर त्यांचे पुत्र श्री. अनिकेत तटकरे हे मधल्या काळात कोकण विभाग स्थानिक स्वराज्य मतदार संघातून विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले. तर त्यांच्या कन्या कु. आदिती तटकरे या जिल्हा परिषद मतदार संघातून निवडून येऊन रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा झाल्या. अशा रीतीने तिघेही लोकनियुक्त प्रतिनिधी असल्याने साहजिकच तिघांचा दांडगा जन संपर्क श्रीवर्धन मतदार संघाशी येत असल्यामुळे श्रीवर्धन विधानसभा मतदार संघामध्ये विविध शासकीय व अन्य योजनांच्या माध्यमातून अनेक विकास कामे झाली व होत आहेत ही वस्तुस्थिती आहे. 

आता येणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे प्रमुख दावेदार आहेत. परंतु प्रामुख्याने गेली पाच वर्षे महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना युतीचे राज्य सरकार असल्याने आम्ही श्रीवर्धन मतदारसंघात अनेक विकास कामे ही आमच्या पालकमंत्री महोदयांचे व भाजपाचे जिल्हा अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पुरी करुन घेतली असून याचे श्रेय मात्र दुसरेच घेत असतात असे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व मतदार संघाचे अध्यक्ष श्री. कृष्णा कोबनाक यांचे म्हणणे असते. तसेच या मतदारसंघात 2009 व 2014 च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत दोन्ही वेळा शिवसेना उमेदवारांचा पराभव झाल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये येथील जागा शिवसेनेऐवजी भा. ज. प. ला मिळावी असेही त्यांचे ठाम म्हणणे असते. याचा अर्थ या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप. यांची स्पर्धा आहे असे दिसते. त्यामुळे येथे अद्यापपर्यंत तरी राजकीय तिढा निर्माण झाला आहे असे दिसते. परंतु ही स्पर्धा एवढ्यावरच थांबत नसून हा मतदारसंघ पूर्वी राष्ट्रीय कॉँग्रेसचा असल्याने ही जागा यावेळी राष्ट्रीय काँग्रेसने लढवावी असाही एक विचार प्रवाह असल्याची वृत्ते प्रसिद्ध होत होती. परंतु आता कॉँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांची आघाडी कायम झाल्याने तो विचार आता संपला आहे. 

आता सध्याच्या राजकारणाचा विचार केला तर श्री. अवधूत तटकरे यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. हे बातमीपत्र लिहीपर्यंत तरी शिवसेना - भाजपा महायुतीचे येथील उमेदवार जाहीर झालेले नाहीत. तसेच या जागेसाठी सर्वश्री रवी मुंढे, राजीव साबळे, अवधूत तटकरे, अनिल नवगणे, समीर शेडगे इ. नेते शिवसेनेकडून इच्छुक असल्याचा अंदाज लोकांकडून ऐकू येतो. अर्थात तो अधिकृत म्हणता येणार नाही. दुसऱ्या बाजूला ही जागा यावेळी भाजप. ला मिळावी असाही विचार प्रवाह असल्याने तसे झाल्यास श्री कृष्णा कोबनाक हे भा. ज. प. कडून प्रमुख दावेदार असतील हे स्पष्ट आहे. त्यामुळे जरी राष्ट्रवादी काँग्रेसकडून कु. आदिती तटकरे यांचे नाव उमेदवार म्हणून हे बातमीपत्र. लिहीपर्यंत तरीअधिकृत जाहीर झाले नसले तरी अन्य नाव जाहीर होण्याची सुतराम शक्यता नाही. मात्र त्यांच्या विरोधात  शिवसेना - भाजपा. महायुतीकडून अद्याप कोणाचेही नाव निश्चित झाले नसल्यामुळेच या बातमीपत्राचे शीर्षक "श्रीवर्धन मतदार संघाला उमेदवाराची प्रतिक्षा" असे दिले आहे. असो, इतके सारे विचारमंथन हे केवळ जर-तरच्या भाषेतील आहे. त्यामुळे राजकीय गणिते जुळेपर्यंत अजून मतदारांना काही काळ थांबावे लागेल हे नक्की. आणि एकदा युती-आघाडीच्या उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा झाली की मग मात्र निवडणुकीच्या निकालाच्या दिवसापर्यंत थांबावे लागेल. 

अवश्य वाचा