दिघी 

श्रीवर्धन तालुक्यासह जिल्ह्यात मंगळवार दि. 24 सप्टेंबर पासून अचानक सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड वासीयांची तारांबळ उडाली. यामुळे भातपिकाला नुकसानीचा तडाखा बसत आहे.

या वर्षी जुलै महिन्यापासून समाधानकारक पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील भातशेती चांगल्या स्थितीत आहे. यामुळे उत्पन्न चांगले मिळेल म्हणून शेतकरी खुश होता. मात्र, गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू झालेला पाऊसाने तालुक्यात भातशेतीची दाणादाण उडाली आहे. पुढील पंधरवड्यात तयार होणारी भातशेती कापणीयोग्य असताना विजांच्या कडकडाटासह जोरदारपणे पडणा-या पावसामुळे उभी पिके धोक्यात आली आहेत. यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे.

सप्टेंबर महिना अर्धाअधिक संपत आला तरी पाऊस थांबण्याची चिन्हे नाहीत. दिवसभरात व सायंकाळच्या सुमारास वर्दी देणारा परतीचा पाऊस सतत पडत असल्याने भातपिकाला नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहे.

श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव तसेच महाड तालुक्यातील चांगल्या पसवलेल्या भातशेतीला परतीच्या पावसाने धोका निर्माण केला आहे. समाधानकारक पावसामुळे भातशेती पसवून लोंबी वर आली आहे. अनेक ठिकाणी शेती कापण्यायोग्य झाली आहे. अशा परिस्थितीत परतीच्या पावसाने पिकलेली भातशेती आडवी करण्यास सुरुवात केली आहे, तर दुसर्‍या बाजूला वन्यप्राण्यांकडून अशा शेतीचे नुकसान केले जात आहे. वानर, डुक्कर शेतीमध्ये घुसून नुकसान करत आहेत. त्यामुळे बळीराजा धास्तावला होताच. त्या जोडीला परतीच्या पावसाने काही ठिकाणची भातशेती धोक्यात आली आहे.

या वर्षी जुलै महिन्यापासून समाधानकारक पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील भातशेती चांगल्या स्थितीत आहे. यामुळे उत्पन्न चांगले मिळेल. सद्या समाधानकारक पावसामुळे भातशेती पसवून लोंबी वर आली आहे. भाताबरोबर असलेले बाजूचे गवत काढण्याचे (बेरणी) काम सुरू आहे . पुढील पंधरवडय़ानंतरही भातशेती कापणीयोग्य होईल. मात्र, सद्या पडणाऱ्या पावसाचा जोर कायम राहिल्यास आम्हा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल. 

 

अवश्य वाचा