चिपळूण 

तालुक्यातील माध्यमिक महिला विद्यालय पाग, न्यू इंग्लिश स्कुल पाग, इंग्लिश मिडियम स्कुल, पाग, महादेवराव शिर्के माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोम, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कापरे (देऊळवाडा) या शाळांमध्ये नुकताच (दिनांक २४) पर्यावरण उपक्रमांतर्गत ‘चंदन बीज वाटप आणि पर्यावरण संवर्धन मार्गदर्शन’ कार्यक्रम संपन्न झाला. हरित मित्र परिवार पुणे, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दिनांक २४ सप्टेंबर रोजी दिवसभर संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला हरित मित्र परिवार पुणेचे संस्थापक-अध्यक्ष ‘वनश्री’ डॉ. महेंद्र घागरे, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्य उपाध्यक्ष विलास महाडिक, सचिव धीरज वाटेकर, कार्यक्रमाच्या संयोजनात महत्वाची भूमिका बजावणारे केंद्रप्रमुख शेषराव गर्जे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना सुमारे चंदन २ लाख चंदन बीज, ८० हजार खैर बीज आणि ४ हजार रक्तचंदन बीज वाटप करण्यात आले. या ‘चंदन बीज वाटप आणि पर्यावरण संवर्धन मार्गदर्शन’ कार्यक्रमामागची भूमिका आणि प्रमुख पाहुणे डॉ. घागरे यांचा परिचय धीरज वाटेकर यांनी करून दिला. इयत्ता चौथी पर्यंत शिक्षण असतानाही हार न मानता जिद्दीने परिस्थितीवर मात करीत राज्य शासनाचा पर्यावरणातील मानाचा ‘वनश्री’ पुरस्कार पटकावणाऱ्या डॉ. घागरे यांच्या कामाचा आढावा त्यांनी घेतला. यासाठी वाटेकर यांनी डॉ. घागरे यांच्या जीवनातील काही उदाहरणेही सांगितली. मनुष्याच्या आजूबाजूचा निसर्ग हे शाश्वत, संतुलित आणि चिरंतन सत्य आहे. परिणामांचा अभ्यास न करता, पर्यायी व्यवस्था न देता गेल्या काही शतकांपासून होत असलेली निसर्गाची लयलूट आज मानवाच्या मूळावर उठली आहे. निसर्गात ‘ढवळाढवळ’ केल्यामुळे आपण आज नैसर्गिक आपत्ती युगाचा सामना करीत आहोत, असे वाटेकर म्हणाले. यंदाच्या सर्वात मोठ्यादिनी २१ जून रोजी चांगले पर्जन्यमान असलेल्या भारताच्या अनेक भागात उष्णता भाजून काढत होती. ऋतू पावसाळा चालू आहे, असे वाटत नव्हते. पूर्वी जूनमध्ये वेळापत्रकानुसार पाऊस यायचा. या बदलाचा विचार करता मनुष्याने जागे होण्याची गरज त्यांनी बोलून दाखविली. शेवटी ‘निसर्ग आहे तसा ठेवा’ हे अद्वैत समजून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

डॉ. घागरे यांनी विद्यार्थ्यांना ‘निसर्गाकडे चला’ असा संदेश दिला. छोट्या छोट्या उदाहरणातून त्यांनी मुलांना निसर्गाचे महत्त्व समजावून सांगितले. झाडे ओळखायला शिका. झाडाच्या भावना ओळखायला शिका. झाडांनी आपल्याला मानसिक, आर्थिक अशी सर्वंकष श्रीमंती दिली आहे, असे ते म्हणाले. दिले जाणारे बीयाणे कुंडीत कसे लावावे ? याचे प्रात्यक्षिकही यावेळी दाखविण्यात येऊन काही विद्यार्थ्यांकडून कार्यक्रमात ते करून घेण्यात आले. कोकणातला निसर्ग हिरवागार आहे. डोंगरात काहीकाही जागा रिकाम्या आहेत. वृक्षारोपण करून त्या भरण्याचे आवाहन त्यांनी केले. आपलं शरीर, मन आपल्याशी जेवढं प्रामाणिक आहे, त्यापेक्षा निसर्ग अधिक प्रामाणिक आहे, असे डॉ. घागरे म्हणाले. पुढील वर्षीच्या जून महिन्यात वृक्षारोपण कार्यक्रमासाठी लागणारी रोपे या बीजातून बनविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात आले. तसेच याशिवाय इतर प्रकारचे देशी बीयाणेही आवशक्यतेनुसार दिले जाईल, असे डॉ. घागरे यांनी यावेळी जाहीर केले. भोमच्या शाळेत अशा प्रकारचा बीज वाटप कार्यक्रम पहिल्यांदा झाल्याबद्दल प्रशालेच्यावतीने मान्यवरांचे आभार मानण्यात आले. विलास महाडिक यांनी शालेय स्तरावर राबविता येऊ शकणाऱ्या पर्यावरणीय उपक्रमांची माहिती दिली. यावेळी त्यांनी भूतानच्या शाळेत पाहिलेला निसर्ग, स्वच्छता याबाबत विद्यार्थ्यांना आठवणी सांगितल्या. केंद्रप्रमुख गर्जे यांनी सध्या दिल्या जाणाऱ्या बीयांचे रोपण करून पुढच्या वर्षी झाडे लावण्यासाठी रोपवाटिका तयार करण्याचे आवाहन केले. कापरे जि.प. शाळेच्या मुलांनी हाताने बनविलेल्या कागदी फुलांनी मान्यवरांचे स्वागत केले. विशेष म्हणजे या फुलांना मुलांनी अत्तर लावलेले होते. या शाळेतील काही मुलांच्या परसात चंदनाची रोपे असल्याचे समजताच त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. शाळेतल्या मुलांना विचारल्यावर बियाणांचा अचूक रंग ओळखल्याबद्दल, प्रश्नांची उत्तरे त्वरित दिल्याबद्दल रोख रक्कम बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक कांबळे, सहाय्यक शिक्षक जी. डी. सोनावणे, वाघमारे (भोम), मुख्याध्यापिका सौ. प्रिया नलावडे, शैलेश सुर्वे, महेंद्र साळुंखे (पाग), शिक्षिका सरिता कादवडकर, जयश्री सकटे, जयश्री लोंढे, शीतल सकपाळ, शिक्षक सचिन वाघे, शरद पवार (कापरे) यांनी विशेष मेहनत घेतली.

अवश्य वाचा