सांगोला

          सांगोला तालुक्यात दुष्काळाने गंभीर रौद्ररुप धारण केले असल्यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस आणखीन गंभीर होत चालल्यामुळे बाजरी पीक गेल्यात जमा आहे त्यापाठोपाठ आता मका पीकही लष्करी आळीने घायाळ झाले असल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणखीनच गंभीर होणार आहे.  मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करुन शेतशिवारातील पीके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात धडपड सुरु आहे; परंतु पाण्याचा तुटवडा व अमेरिकन लष्करी आळीचे आक्रमण अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला दुष्काळाच्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नसल्याने सांगोला तालुक्यातील शेती दिवसेंदिवस आणखीनच उद्‌ध्वस्त होत असल्याचे विदारक चित्र शेतशिवारात व बांधावरही दिसून येत आहे.

                 बहुतांशी शेतकऱ्यांची जनावरे चारा छावणीत ऊसाच्या चिपाड्यावर जगत आहेत. याचा परिणाम जनावरांच्या आरोग्यावर विपरीत होत आहे; परंतु आजपर्यंत शेतकऱ्यांच्या संसाराला साथ देणाऱ्या दुभत्या जनावरांना जगविण्यासाठी शेतकऱ्यांना मका लागवडीकडे लक्ष केंद्रित केले किमान जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटेल. कारण शेतकऱ्यांच्या उत्पन्नात जनावरांचा वाटाही तितकाच मोठा आहे. ही जनावरे जगती तर रोजच्या दैनंदिन खर्चासाठी पैसा उपलब्ध होणार आहे. या हेतूने अनेकांनी आपल्या शेतात भविष्यातील पाण्याचा विचार करता मका लागवड केली. लागवडीनंतर पावसाने तर पाठ फिरवलीच त्यात भरीस भर म्हणून अमेरिक लष्करी आळीने रौद्ररुप धारण करुन अनेक शेतकऱ्यांची अनेक एकर मका फस्त करुन टाकली.

                 उपलब्ध असणाऱ्या पाण्याच्या जीवावर आणि महागडी औषधे फवारणी करुनही अनेक शेतकऱ्यांच्या मका अद्यापही कोपोषीत अवस्थेत असून पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात दमदार पाऊस न झाल्यास संपूर्ण शेतीची अर्थव्यवस्थाच कोमात जाते की काय, अशी हायपर टेन्शन बळीराजाला सतावत आहे. यंदा सांगोला तालुक्यात 3 हजार 557 हेक्टर क्षेत्रावर मका पीकाची लागवड करण्यात आली आहे. यापैकी बहुतांशी शेतकऱ्यांनी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मका लागवड केली; परंतु लष्कळी आळीने मात्र बहुतांशी शेतकऱ्यांच्या शेतातील मका पुर्णपणे उमलून येण्या अगोदरच विळाखा आवळून ना चाऱ्यासाठी ना विक्रीसाठी अशा स्थितीत ठेवली आहे.

                पावसाचा आभाव व छावणीतील शेतकऱ्यांचा व जनावरांचा वाढता मुक्काम लक्षात घेता मका पीक जोमात येणे अत्यावश्यक होते. जेणेकरुन जनावरांना हिरवा चांगला चारा मिळाला असता आणि जनावरांची ऊसाच्या चिपाड्यापासून सुटका झाली असती. जनावरांचे होत असलेले कुपोषण पाहता हिरवा चारा जनावरांना अत्यावश्यक आहे. राज्यकर्ते आणि प्रशासन निवडणूकीच्या धामधुमीत व्यस्त होत असताना मात्र दुष्काळ, पाणी व चाऱ्याचा आभाव, त्याचबरोबर भकास होत असलेली शेती यामुळे बळीराजा घामाघुम होत आहे.

अवश्य वाचा

पोटनिवडणूक मतमोजणी सोमवारी.