खांब-रोहे, दि.२४

      वातावरणात वाढत असेलेल्या उष्णता व त्यातच परतीचा पाऊस अद्याप सक्रिय झाला नसल्याने कधीही कोसळण्याच्या शक्यतेने तयार भातशेतीला कधीही मोठा धोका निर्माण होऊ शकत असल्याने भातशेती ही अद्याप परतीच्या पावसाच्या सावटाखालीच आहे. 

       चालू पावसाळी हंगाम अद्याप संपलेला नाही. मागील आठवड्यापर्यन्त पाऊस चांगलाच धो धो बरसल्याने त्याचा परिणाम खरीप हंगामाला बसल्याने भात,नाचणी व वरी ही पिके धोक्यात आली .त्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला असतानाच वाढती उष्णता म्हणजे परतीच्या पावसाचा धोका हे गणित पक्के असल्याने परतीच्या पावसाचा धोका अद्याप ठळला नसल्याचे जाणकार शेतकरी वर्गाकडून वर्तविले जात आहे. 

       आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे.आणि आपल्या देशातील शेती ही मोसमी पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे कधी ओला दुष्काळ तर कधी सुका दुष्काळ तर कधी शेतीवर येणारी नैसर्गिक संकटे यामुळे शेती ही बेभरवशाची झाली आहे.त्यातच शेतीशी संबंधित घटकांचे वाढते दर पाहता शेती करावी की नाही याच कचाट्यात शेतकरी वर्ग सापडला आहे.दरवर्षी परतीच्या पावसाचा तडाखा शेतीला बसत असल्याने शेती व शेतक-यांचे फार मोठे नुकसान आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपात कोसळणारा परतीचा पाऊस शेती  क्षेत्राचे फार मोठे नुकसान करीत असल्याने परतीच्या पावसाची टांगती तलवार कायम शेतकरीवर्गाच्या डोक्यावर असते.मागील आठ दहा दिवसापूर्वी मोसमी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने तयार भातशेती, नाचणी व वरीची शेती काही ठिकाणी आडवी तर काही ठिकाणी भुईसपाट झाली आहेत. पिके तयार होण्याच्या प्रक्रियेत असतानाच परतीच्या पावसाचा धोका अद्याप टळला नसल्याने सद्यस्थितीत शेतकरीवर्ग हवालदिल झालेला दिसत आहे. दिवसेंदिवस शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे.त्यातच परतीच्या पाऊस अद्याप  सक्रीय झालेला नाही.भातपिके तयार होण्याच्या वेळेस किंवा कापणीच्या हंगामात परतीचा पाऊस चांगलाच कोसळला तर काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणात शेतकरी वर्गासमोर मात्र अंधारच राहणार आहे.

अवश्य वाचा