पनवेल 

          पनवेल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता राबविण्यासाठी विविध राजकीय पदाधिकाऱ्यांना वरिष्ठ पोलीस अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत माहिती देण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती पोलीस उपायुक्त अशोक दुधे, सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे, उप विभागीय अधिकारी दत्तात्रय नवले, पनवेल तहसीलदार अमित सानप, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे सर्व वपोनि, गोपनीय कर्मचारी, शासकीय कर्मचारी तसेच सर्व राजकीय पक्षांचे वरिष्ठ पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 

            यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी दत्तात्रय नवले यांनी माहिती देताना सांगितले की, निवडणुकीबाबत 27 सप्टेंबर रोजी नोटिफिकेशन जाहीर होणार असून 4 ऑक्टोबर रोजी नामनिर्देश पत्र स्वीकारण्याची अंतिम तारीख असणार आहे. यावेळी 5 ऑक्टोबर रोजी नामनिर्देशित पत्राची छाननी होणार आहे. पनवेल विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये एकूण 554464 मतदार आहेत यामध्ये 297272 पुरुष मतदार तर 257374 महिला मतदार आहेत. या मतदार क्षेत्रामध्ये 576 मतदान केंद्र असून सर्व मतदान केंद्र तळमजल्यावर घेण्याचे ठरले आहे. सर्वात अधिक मतदार खारघर केंद्रावर तर सर्वात कमी मतदार हे खैरवाडी केंद्र आहे. यावेळी 4 पथके तैनात करण्यात आली आहेत. यावेळी असणाऱ्या अटींमध्ये उमेदवारांनी सफेद बॅकग्राऊंड असलेला नव्याने काढलेला फोटो बंधनकारक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच उमेदवारांनी केलेला खर्च याची पडताळणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत केली जाणार असल्यामुळे उमेदवारांनी आपला खर्च करताना काळी घ्यावयाची आहे. यावेळी पेड न्यूज बाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक असल्याचेही सांगण्यात आले. 

          यावेळी पोलीस उप आयुक्त यांनी बोलताना सांगितले की, पनवेल विधानसभा निवडणूक निःपक्षपातीपणे होण्यासाठी सर्वच राजकीय पदाधिकाऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. यापूर्वी ज्या ज्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत त्या सर्व पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक कारवाईबाबत आम्ही सुरुवात केली आहे. कोणावरही टीका करताना वैयक्तिक टीका करता येणार नाही, तसेच कोणत्याही धार्मिक स्थळांचा वापर राजकारणामध्ये केला जाणार नाही. उमेदवारांनी जाहिरात फलकबाजी करताना किती लावायचे या पेक्षा कोठे लावायचे आहेत त्याच्या परवानग्या घेणे बंधनकारक असून असे न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येऊ शकते. यावेळी चालत्या वाहनावर लाऊड स्पीकर लावण्यावर पूर्णतः बंदी असणार आहे. सभांमध्येही आवाजाच्या मर्यादेवर अंकुश ठेवण्याचे काम पोलीस प्रशासन करणार आहे. यावेळी मतदान केंद्रांवर नियुक्त कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश करता येणार नाही, त्यासाठी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. यावेळी पोलीस प्रशासनामार्फत कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार असून सर्वच राजकीय पक्षांनी याची नोंद घेण्याची गरज आहे. 

अवश्य वाचा