पाली/बेणसे 

  जागतिक अंधश्रद्धा निर्मूलन दिनी शनिवारी  राजीप शाळा कार्ली च्या विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे धडे गिरविले. लहनग्यांनी पेटता पलेता हातावरून फिरविणे, कापूर खाणे, तांब्यात भूत गडप करणे असे प्रयोग स्वतः करून चमत्कारामागचे रहस्य शोधले.भारतीय घटनेत वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य सांगितले आहे. 1986 मध्ये आलेल्या नव्या शैक्षणिक धोरणात वैज्ञानिक मनोभावाची निर्मिती हा शिक्षणातील महत्त्वाचा गाभाघटक आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन याचा अर्थ कार्यकारणभाव तपासणे. थोडक्यात कार्यकारणभाव प्रभाव म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि कार्यकारणभाव अभाव म्हणजे अंधश्रद्धांची निर्मिती. वैज्ञानिक दृष्टिकोन हा तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे. म्हणून २८ फेब्रुवारी हा विज्ञानदिन म्हणून साजरा होतो. परंतु त्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे दुसरे महत्त्वाचे तेवढेच अंग आहे, ते म्हणजे अंधश्रद्धांचे निर्मूलन. त्यासाठी 21 सप्टेंबर हा अंधश्रद्धा निर्मूलन दिवस म्हणून पाळला जातो. अंधश्रद्धा निर्मूलनाचा दिवस साजरा करणे, याचा अर्थ त्या अंधश्रद्धांना झुगारून देऊन माणसाने स्वतंत्र, स्वाधीन व इहलोकवादी होणे. हीच मानसिकता समाजाला व राष्ट्राला पुढे नेऊ शकेल. असे मोहन भोईर यांनी प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.  मुलांमध्ये अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा आणि भीती असतात. त्यामुळे मग या अंधश्रद्धा आणि भीती अंधश्रद्धा दिनी घालविण्याचे शाळेचे शिक्षक मोहन भोईर यांनी ठरविले. स्वतः महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष असल्याने त्यांनी ताबडतोब विद्यार्थ्यांना विविध चमत्काराचे प्रयोग सादर करून दाखविले. त्याद्वारे विद्यार्थ्यांना चमत्कारामागील रहस्य, कार्यकारणभाव व विज्ञान समजावून सांगितले. काही विद्यार्थ्यांनी स्वयंस्फुरतेने पुढे येऊन चमत्कार करून पाहिले. विविध प्रश्नोत्तराच्या सहाय्याने विद्यार्थ्यांनी अधिक माहिती देखील जाणून घेतली. आणि अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या अंधश्रध्दा दूर होऊन त्यांच्या मनातील भीती देखील नष्ट झाली. 

अवश्य वाचा