वावे

  ठिकठिकाणी पावसाचा जोर कमी जास्त असताना पावसाच्या उत्तर नक्षत्रात पडणारा परतीचा पाऊस देखील कमी जास्त प्रमाणात सर्व ठिकाणी पडत आहे व याच परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या दोन महिन्यांच्या प्रयत्नांना व मेहनतीला यश येताना दिसत असून या परतीच्या पावसात शेतकऱ्यांच्या तांदूळपिकाला चांगल्या प्रकारे बहर आलेला दिसत आहे.

    ऊन, सावली व मध्ये मध्ये पाऊस असा या उत्तर नक्षत्रातील पावसाचा खेळ सुरू असताना या पावसामुळे भातशेतील पुरेसे असे वातावरण निर्माण झाले आहे व यामुळे यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीपासूनच तांदुळाची ही कणसे शेतकऱ्याच्या शेतात अगदी डौलाने उभी राहू लागली आहेत. 

    वावे, बेलोशी, मल्याण, पासून उसर पर्यंत व खानाव बामणगाव, कावीर, ढवर पासून बेलकडे पर्यंत तांदूळशेतीमध्ये विविध प्रकारच्या व विविध जातीच्या तांदुळाची पेरणी केली जाते व यात प्रामुख्याने रुपाली, सुवर्णा, जया, कोमल, जोरदार, चिंटू, सोनल अश्या नावाच्या जातींच्या तांदुळाचे पीक घेतले जाते व या पिकाला योग्य प्रमाणात पाऊस व ऊन लागते व त्याचीच सांगड यावर्षी चांगल्या प्रकारे लागल्यामुळे या तांदूळशेतीत यावर्षी चांगले पीक येईल अशी शेतकऱ्यांना आशा आहे. 

     कोमल,रुपाली,जया अश्या जातींचे पीक लवकर तयार होते त्यामुळे या पिकाची कापणी महिन्याभरात करण्यात येणार असून सुवर्णा, चिंटू, जोरदार अश्या जातींच्या पिकाला तयार होण्यासाठी वेळ लागत असल्यामुळे त्यांची कापणी दिवाळी मध्ये किंवा नोव्हेंबर महिन्याच्या सुरवाती पर्यंत होईल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

   तसेच उत्तर नक्षत्रातील पाऊस योग्य व पुरेपूर पडत असून आता पावसातील शेवटचे शिल्लक राहिलेले हत्ती नक्षत्र देखील असेच योग्य व पुरेसे पडून भातपिकला आलेला हा बहर कायम राहून चांगल्या प्रकारे उगवलेल्या या पिकावर कोणतीही रोगराई न येऊन  शेतकऱ्याच्या या प्रयत्नांना आलेले हे यश असेच कायम राहो अशी आशा आता प्रत्येक शेतकऱ्याला लागली आहे.

अवश्य वाचा