पनवेल

सातत्याने हवामानात होणारा बदल त्याचे दुष्पपरिणाम म्हणून सततची नापिकी, निसर्गाचा लहरीपणा, बँकांची कर्ज, त्यामुळे होणारा कर्जबाजारी शेतकरी संकटात सापडला आहे. परंतु चोपडा तालुक्यातील वाळकी येथील उच्चशिक्षित सचिन पाटील यांनी चक्क मोत्यांची शेती करून इतरांसमोर एक आदर्श निर्माण केल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

छोटीशी गुंतवणूक व इतर दैनंदिन कामे करून ही शेती करता येते. यातून वर्षाकाठी लाखभर उत्पन्न सचिन पाटील मिळवत आहे. मोत्याची शेती ही शाश्‍वत उत्पन्न देणारी असून शेतकर्‍यांनी जोडधंदा म्हणून ही शेती करावी, यासाठी तो जनजागृती करीत आहे. आपला जिल्हा हा मोत्याच्या शेतीचे हब बनविण्याचे त्यांचे स्वप्न त्याच्या अपार मेहनतीने सुरू आहे. यासाठी तो अन्य शेतकर्‍यांनाही मोती बनविण्याचे प्रशिक्षणही देत आहे.

वाळकी या छोट्याशा गावात सचिन हिंमतराव पाटील हे आधुनिक शेतीचे धडे देणारे आदर्श व्यक्तीमत्व राहते. सचिनने चार वर्ष युपीएससीचा अभ्यास केला. पण त्याला समाजासाठी व आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी काही तरी वेगळेच करून दाखवायचे होते. इंटरनेटवरील व्हिडीओ पाहून त्याने मोत्याची शेती कशी करावी याची माहिती मिळविली. सचिनचे गाव तापी नदीच्या काठावर वसलेले असल्याने त्या ठिकाणी त्याला मुबलक प्रमाणात शिंपले मिळाले.

लॅमिलेडिन्स मार्जिनालिस, एल कोरिआनस, पेरेसिआ कोरुगाटा या शिंपल्यापासून चांगल्या दर्जाचा मोती तयार होतो. यासाठी 8 सेमीचा शिंपला चांगला असतो. तो नदीवरुन आणल्यानंतर 2 ते 3 दिवस त्याला गोड्या पाण्यात घरी ठेवावा लागतो. त्यामुळे शिंपल्याला जोडून ठेवणारे स्नायू हे कमकुवत होवून ते शस्त्रक्रियावेळी हाताळणे सोपे होते. शिंपल्याची दोन्ही बाजू शस्त्रक्रिया संच वापरुन हळूच उघडून शिंपल्याच्या गर्भपेशीत गोल मोती ठेवला जातो. तर डिझाईनचे मोती बीज हे शिंपल्याची झडप उघडून दोन्ही बाजूच्या मेटल कॅव्हिटीखाली ठेवावे लागते. एका शिंपल्यात दोन डिझाईनचे, तर एक गोल मोती बीज टाकता येते. शस्त्रक्रियेनंतर शिंपल्याच्या प्रतिकार शक्तीला बाधा पोहोचू नये व मृत शिंपल्याचे व्हायरल इन्फेक्शन इतरांना होवू नये यासाठी अ‍ॅन्टिबायोटिकची गोळी पाण्यात टाकून शिंपल्याला पाच दिवस त्या पाण्यात ठेवावे लागते.

मोती हे मालक नावाच्या शंबुका शिंपल्यामध्ये तयार होते. भारतात दरवर्षी आंतरराष्ट्रीय बाजारातून मोत्याची आयात होते. पण आता भारतात मोत्याची शेती करण्याचे तंत्रज्ञान अवगत झाल्यानंतर मोती सहज उपलब्ध होवू लागला आहे. साधारणतः एक मोती हा 100 रुपयांपासून ते 2500 रुपयांपर्यंत विकला जात आहे. भारतात मोत्याची मोठी बाजारपेठ हैद्राबाद, सुरत, मुंबई, पुणे, दिल्ली येथे आहे. अशा प्रकारचे प्रशिक्षण रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग अन्य भागात कृषी अधिक्षकांनी पुढाकार घेवून तालुकानिहाय शेेतकर्‍यांना दिल्यास वरील जिल्ह्यात त्याचा प्रसार होवू शकतो व या शेतीबरोबरच या जोड धंद्यात शेतकर्‍याची चांगली प्रगती होवू शकते.

अवश्य वाचा

पोटनिवडणूक मतमोजणी सोमवारी.