उरण 

ओएनजीसीच्या उरण प्रकल्पात नाफ्था युनिटला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर प्रकल्प भोवतालच्या सुरक्षा पट्ट्याची तातडीने आखणी करण्याची जोरदार मागणी स्थानिक खासदार श्रीरंग बारणे आणि उरणचे आमदार मनोहरशेठ भोईर यांनी प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बैठकीत केली. स्थानिकांच्या विविध मागण्यांची अंमलबजावणी दोन महिन्यात करण्याच्या सूचना देताना अंमल न झाल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा सज्जड इशारा उपस्थित लोकप्रतिनिधींनी या बैठकीत दिला. प्रकल्प क्षेत्रातील नागाव आणि म्हातवली गावांच्या सूरक्षेकामी ज्या नाल्यातून नाफ्था वाहून गेला तो नाला बंदिस्त करण्याबरोबरच या भागात एक अग्नीशमन वाहन राखून ठेवणे, या पंचायतींच्या विहिरींचा सर्वे करण्याचे आश्वासन प्रकल्पअधिकार्‍यांनी दिले.

उरणच्या ओएनजीसी प्रकल्पात ३ सप्टेंबरच्या मध्यरात्री नाफ्थ्याच्या टाकीतील नाफ्थाची गळती होऊन  भीषण आग लागली होती. हा नाफ्था नागाव परिसरातील नाल्यातून समुद्राकडे वाहून गेला आणि नाल्यासह अरबी समुद्रातही आगीचे लोळ उसळले. या दिवशी पहाटे पावणेसात वाजण्याच्या सुमारास गळती रोखण्यासाठी रवाना झालेल्या अग्नीशमन वाहनातून उडालेल्या ठणगीने प्रकल्पाला भीषण आग लागली. यात केंद्रिय सुरक्षा दलाचे तीन जवान आणि ओएनजीसीच्या एका अधिकार्‍याला हकनाक जीव गमवावा लागला. या घटनेची दखल घेत खासदार श्रीरंग बारणे यांनी ओएनजीसीच्या अधिकार्‍यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. ओएनजीसीचे सरव्यवस्थापक नरेंद्र असिजा यांच्यासह सीआयएसएफचे कमांडन्ट, ओएनजीसीची सुरक्षा अधिकार्‍यांबरोबरच प्रकल्पाचे शिफ्ट इन्चार्जही उपस्थित होते. याच प्रकल्पात २००४मध्ये लागलेल्या  रामा घरत हे शेतकरी मृत्यूमुखी पडले होते याचा उल्लेख करत खा. बारणे यांनी या घटनेनंतर घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी का झाली नाही, असा सवाल अधिकार्‍यांना केला. यावर अधिकार्‍यांकडे कोणतेच उत्तर नव्हते.

प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी सुरक्षा पट्ट्यासाठी होत असलेल्या दुर्लक्षावरही उपस्थितांनी कोरडं ओढलं. सुरक्षा पट्ट्याकरिता ओएनजीसीने सिडकोला पैसेही दिले. मात्र या महामंडळाकडून सुरक्षा पट्ट्याच्या निर्मितीसाठी अपेक्षित प्रयत्न केले जात नसल्याची तक्रार असिजा यांनी केली. तेव्हा येत्या महिन्याभरात यासाठी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांबरोबर बैठक लावण्याची तयारी खा. बारणे आणि आमदार भोईर यांनी दर्शवली. मात्र आगामी दोन महिन्यात हा विषय संपला पाहिजे, अशा सूचना या लोकप्रतिनिधींनी अधिकार्‍यांना दिल्या. प्रकल्पाच्या सेफ्टी ऑडीटवरही उपस्थितांनी संशय व्यक्त केला. प्रकल्पाच्या सुरक्षेसंबंधी स्थानिक नागाव, म्हातवली आणि चाणजे ग्रामपंचायतींतील पदाधिकार्‍यांबरोबर बैठका घेऊन त्यांच्या सूचनांची अंमलबजावणी करण्याची तयारी सरव्यवस्थपकीय संचालक असिजा यांनी दर्शवली. प्रकल्पात रूजू होत असलेल्या नवख्या कर्मचार्‍यांमुळेच आगीसारख्या अशा घटना घडत असल्याचा आरोप तिन्ही ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी केल्या. रोजगार आणि प्रशिक्षणात स्थानिकांना प्राधान्य देण्यात येत नसल्याबद्दलही लोकप्रतिनिधींनी अधिकार्‍यांची झाडाझडती घेतली. याबाबतही ग्रामपंचायतीच्या सरपंचांबरोबर बैठका घेऊन  त्याद्वारेच कंत्राटी भरती करण्याच्या सूचना करण्यात आल्या. तशा बैठका योजण्याचे आश्वासन असिजा यांनी दिले. या बैठकीला जि.प. सदस्य विजय भोईर , उप जिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, तालुका प्रमुख संतोष ठाकूर, गटनेते, माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, प.सं.सदस्य दिपक ठाकूर, हिराजी घरत, नगरसेवक अतुल ठाकूर, काशिनाथ गायकवाड, सचिन म्हात्रे, रमेश म्हात्रे, नागावचे सरपंच मोहन काठे, म्हातवलीचे सरपंच अनंत घरत, केगावचे सरपंच राजू ठाकूर उपस्थित होते. 

अवश्य वाचा