दांडगुरी

अल्पसंख्याक समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारमार्फत प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. मात्र या कार्यक्रमातून रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन व म्हसळा हे दोन अल्पसंख्याक बहूल तालुके वगळण्यात आले आहेत. यावर रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांनी पाठपुरावा करीत या तालुक्यांचा समावेश करून घेण्याची मागणी लावून धरली होती. त्याबाबतचा पत्र व्यवहारदेखील राज्य शासनाकडे खा.तटकरे यांनी केला होता. या संदर्भात त्यांनी आज अल्पसंख्याक विभागाचे केंद्रीयमंत्री मुख्तार अब्बास नाक्वी यांची दिल्ली येथे भेट घेतली व निवेदन दिले.

श्रीवर्धन व म्हसळा या तालुक्यांत अनुक्रमे २६.०६ व ३०.०९ टक्के अल्पसंख्याक वस्ती आहे. त्यामुळे त्यांच्या विकासासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे मत खा. तटकरे यांनी व्यक्त केले आहे. यामुळे तालुक्याच्या एकंदरीत विकासालाही गती प्राप्त होईल. त्यासाठी या दोन तालुक्यांचा प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमांतर्गत अल्पसंख्याक केंद्रित तालुका म्हणुन समावेश व्हावा, अशी आग्रही मागणी खा. तटकरे यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे केली. त्यावर केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नाक्वी यांनी अनुकूलता दर्शवत, लवकरात लवकर हा निर्णय घेण्यात येईल, याची ग्वाही देत संबंधितांना तसे निर्देश देखील दिले आहे. यामुळे श्रीवर्धन व म्हसळा या दोन्ही तालुक्यांना अल्पसंख्याक तालुक्याचा दर्जा मिळणार असून तेथील विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे.

 

अवश्य वाचा