पाली/बेणसे 

  मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पनवेल नागोठणे ते महाड येथील प्रवाशांना घेऊन जाणारी शिवशाही बस दि. (18) बुधवारी अचानक कर्नाळा खिंडी जवळ बंद पडली. अशावेळी प्रवाशांना पुढे जाण्याकरिता कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्याने प्रवाशी वर्गाचे अतोनात हाल झाले. शिवशाही क्र. एम 3802 ही बस प्रवाशांनी गच्च भरलेली वातानुकूलित बस पनवेल आगारातून सुटली खरी, मात्र ती काही किलोमीटर पुढे चालली. अचानक ही बस बंद पडली, सुरवातीला प्रवाशांना वाटले की वाहतूक कोंडी, अथवा रस्त्याचे काम सुरू असल्याने बस थांबली असावी, मात्र बराच वेळ बस जागीच थांबल्याचे पाहून प्रवाशांच्या बस बंद पडल्याचे लक्षात आले. मग सारेच प्रवाशी खाली उतरले, पनवेल आगारातुन येणाऱ्या सर्वच बस खचाखच भरून आल्याने प्रवाशांचे भर उन्हात अतोनात हाल झाले. प्रवाशी वर्गात लहान मुले,आबालवृद्ध,  विद्यार्थी, महिला आदींचा समावेश होता. मुंबई गोवा महामार्गाची प्रचंड दुरावस्था झाल्याने पैसे जास्तीचे गेले तरी प्रवास आरामदायी व्हावा या अपेक्षेने शिवशाही बसमध्ये बसलेल्या प्रवाशांची मोठी अडचण झाली, पैसेही गेले आणि हाल झाले अशाच संतप्त प्रतिक्रिया प्रवाशी वर्गातून ऐकावयास मिळाल्या. शिवशाही बसचे अपघात तसेच सातत्याने होत असलेला बिघाड  याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, व प्रवाशांच्या सोई करिता सुसज्ज बस द्याव्यात अशी मागणी जोर धरत आहे.

अवश्य वाचा