मुंबई, १८ सप्टेंबर २०१९

मेट्रो शहरातील आईपेक्षा छोट्या शहरांतील आई अधिक आनंदी असल्याचे दिसून आले आहे. 'मेट्रो' शहरातील आई अधिक तणावात असून नोकरी, रोजचा प्रवास आणि विविध पातळ्यांवर लढताना ती मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नसल्याचा निष्कर्ष 'मॉम्स हॅपीनेस इंडेक्स'या सर्वेक्षणातून पुढे आला आहे. मॉम्सप्रेसो डॉटकॉम या वापरकर्त्यांनी उभारलेल्या महिलांसाठीच्या सर्वात मोठ्या कंटेन्ट मंचाद्वारे देशभरातील मातांना आनंद देणा-या बाबी जाणून घेण्याच्या उद्देशाने हे सर्वेक्षण करण्यात आले होते.

या सर्वेक्षणादरम्यान मी किती चांगली आई आहे? माझे पती किती आधार देतात? मला माझ्यासाठी किती वेळ आहे? मी आर्थिकदृष्ट्या किती सशक्त आहे? माझे सासरचे लोक किती आधार देतात, असे प्रश्न प्रामुख्याने विचारण्यात आले होते. निष्कर्षानुसार मेट्रो शहरांतील मातांच्या तुलनेत स्वतः माता, त्यांचे पती आणि मुले यांनी केलेले मातांचे रेटिंग नॉन-मेट्रो शहरांतील मातांसाठी जास्त आहे. मेट्रो शहरांतील ५५% मातांच्या तुलनेत नॉन-मेट्रो शहरांतील ६६% माता आठवड्यातून किमान २-३ वेळा त्यांच्या पतीसोबत उत्तम वेळ व्यतीत करतात. नॉन-मेट्रो शहरांतील ७२% मातांना त्यांच्या मुलांना शिस्त लावण्यात त्यांच्या पतीचे सहकार्य लाभते तर मेट्रो शहरांतील ६३% मातांना ते लाभते. शिवाय मेट्रो शहरांतील ५६%मातांच्या तुलनेत नॉन-मेट्रो शहरांतील ६९% मातांचे वैवाहिक जीवन सुखी आहे. मेट्रोमध्ये राहणा-या मातांच्या तुलनेत नॉन-मेट्रो शहरांतील मातांना घरातील कामांसाठी सासरच्या लोकांकडून जास्त सहकार्य मिळते. व्यायाम करण्यासाठी, मित्रमैत्रिणींना भेटण्यासाठी आणि त्यांना आवडत्या गोष्टी करण्यासाठी वेळ काढण्याचा मातांचा प्रयत्न असतो.

मातेचा आनंद सुनिश्चित करणारा आणखी एक महत्त्वपूर्ण घटक म्हणजे आर्थिक सशक्तीकरण आणि स्वातंत्र्य आहे. सर्वेक्षण केलेल्या ८०% मातांनी त्यांच्या मुलांसाठी एक उत्तम आदर्श बनण्यासाठी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असण्याची इच्छा व्यक्त केली. शिवाय आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणि आपली स्वतःची खास ओळख बनवण्यासाठी त्यांना आर्थिक स्वातंत्र्य हवे असल्याचे देखील नमूद केले.

मॉम्स हॅपीनेस इंडेक्स २०१९ द्वारे निर्धारित केलेल्या भारतीय मातांच्या मुख्य तणावाच्या कारणांमध्ये मुलांची सुरक्षा, इंटरनेट आणि गॅझेट्सचा वापर, खाण्याच्या सवयी, शिस्त आणि अभ्यास यांचा समावेश होता. 

मॉमस्प्रेसो डॉटकॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल गुप्ता म्हणाले, 'भारतीय मातांच्या सुखाचे विविध निर्धारक समजून घेण्यासाठी मॉम्स हॅपीनेस सर्वेक्षण हे एक महत्त्वाचे साधन आहे.या वर्षाच्या सर्वेक्षणानुसार मेट्रो आणि नॉन-मेट्रो शहरांमध्ये राहणा-या माता यांच्यातील आनंदाच्या पातळीमधील तफावतीबद्दल आम्हाला खूप महत्त्वाची माहिती मिळाली आहे. तिच्या आयुष्यातील निरनिराळ्या सदस्यांच्या सहकार्यावर तिचा आनंद अवलंबून असतो हे देखील यानिमिताने निदर्शनास आले आहे.'

डायमंड प्रोड्यूसर्स एसोसिएशन (डीपीए)च्या सहकार्याने करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात देशभरातील २०२० मातांचा समावेश होता.

अवश्य वाचा