मुंबई, 

येत्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीने रिपब्लिकन पार्टीसाठी किमान दहा जागा सोडाव्यात, अशी मागणी रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत केली. या निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी भाजपाच्या चिन्हावर लढणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टीला हव्या असलेल्या मतदारसंघांची नावेही त्यांनी यावेळी जाहीर केली. मराठवाड्यात केज, उद्गीर, देगलूर व गंगाखेड, विदर्भात भंडारा, चंद्रपूर, उमरखेड, नागपूर उत्तर, पांढरकवडा, आर्णी, मेहेकर आणि बडनेरा, पश्चिम महाराष्ट्रात पिंपरी, पुणे कॅन्टॉन्मेंट, माळशीरस, मोहोळ व फलटण, उत्तर महाराष्ट्रात भुसावळ, चाळीसगाव, देवळाली व श्रीरामपूर, मुंबईत चेंबूर, मानखुर्द, शिवाजीनगर, धारावी, कुर्ला, वर्सोवा आणि चांदिवली तसेच कोकण व ठाण्यातून अंबरनाथ, उल्हासनगर, कर्जत आणि खालापूर अशा ३२ मतदारसंघांपैकी दहा जागा आमच्या पक्षाला सोडाव्यात असे आठवले म्हणाले. मागच्या विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टीने अंबरनाथ, चेंबूर, पिंपरी, मेहेकर, विक्रोळी, शिवाजीनगर आणि देवळाली मतदारसंघांतून उमेदवार उभे केले होते. मात्र, यात त्यांना एकही जागा जिंकता आली नाही.

अयोध्येतील राममंदिराच्या मुद्द्यावर शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत वाट बघावी, असेही ते म्हणाले. भारतीय क्रीडा क्षेत्रात अनुसूचित जाती-जमातींसाठी आरक्षण असावे, अशी मागणीही त्यांनी केली.

देशातली सध्याची आर्थिक स्थिती आव्हानात्मक आहे. परंतु केंद्र सरकारने हाती घेतलेल्या उपाययोजनांमुळे ती लवकरच सुधारेल. भारताचा जीडीपी ८.२ टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत येणे हे प्रशासनापुढे मोठे आव्हान आहे, असेही आठवले म्हणाले.

अवश्य वाचा