सिंधुदुर्ग  

'महावितरणच्या कोकण परिमंडळा अंतर्गत येणाऱ्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी मुळसधार पावसातही ग्राहकांना चांगली सेवा दिली आहे. अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याने महावितरणची यंत्रणा प्रभावित झाली होती. मात्र अशा कठीण प्रसंगीही महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत कमी कालावधीत वीज यंत्रणा पुन्हा उभी करून वीज पुरवठा सुरळीत केला. रत्नागिरी परिमंडळातील सर्व कर्मचाऱ्यांचे हे कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे.' असे गौरवउद्गार महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सह व्यवस्थापकीय संचालक विजयकुमार काळम पाटील(भाप्रसे) यांनी काढले. (सोमवार दि.१६ रोजी) सिंधुदुर्ग मंडळाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासोबतच १०० टक्के वीज बिल वसुलीचे आदेश दिले. याप्रसंगी कोकण परिमंडळाच्या मुख्य अभियंता रंजना पगारे उपस्थित होत्या. 

विजयकुमार काळम पाटील(भाप्रसे) म्हणाले, "पैसे भरून प्रलंबित असलेल्या अर्जदारांना तातडीने वीज जोडणी द्या. नादुरुस्त वीज मीटर तातडीने बदला. ग्राहकांना योग्य विजेच्या वापराचे वीजबील द्या. प्रत्येक उपविभागात होणारी विजेची हानी (डिस्ट्रीब्यूशन लॉस) कमी करा. ग्राहकांचे वीज बिल दुरुस्त करताना वीज नियामक आयोगाच्या निर्देशांचे तंतोतंत पालन करा तसेच महावितरणचा महसूल प्रभावित होणार नाही याची काळजी घ्या. जिथे नव्याने पायाभूत सुविधा उभारावी लागत नाही तिथे ग्राहकांना तातडीने वीज जोडणी द्या." यावेळी विजयकुमार काळम पाटील(भाप्रसे) यांनी उपविभागानुसार वसुली व वीजपुरवठा खंडित थकबाकीदार ग्राहकांचा आढावा घेतला. 

यावेळी बैठकीच्या सुरवातीला विजयकुमार काळम पाटील(भाप्रसे) यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या बैठकीस सिंधुदुर्ग मंडळाचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील, कुडाळ विभागाचे कार्यकारी अभियंता कैलास लवेकर, कणकवली विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते, कार्यकारी अभियंता(प्रशासन) रमेश लोकरे व सिंधुदुर्ग मंडळाचे सर्व उप-विभागीय अधिकारी व सहाय्यक लेखापाल उपस्थित होते.

अवश्य वाचा