सांगोला

      शेतकरी कामगार पक्षाची विचारधारा ही सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, कामगार, दलित, विकासाशी बांधिलकी असणारी असून महाराष्ट्रातील सभागृहाचे कामकाज हे शेतकरी कामगार पक्ष ठरवतो. जरी हा पक्ष छोटासा असला तरी आज या पक्षाकडे आमदार भाई गणपतरावजी देशमुख यांच्या सारखे प्रामाणिक व सर्वसामान्यांसाठी कार्य करणारे नेतृत्व आहे. आ.गणपतराव देशमुख म्हणजे सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी व कामगारांचे बाहुबली असल्याचे मत शेतकरी कामगार पक्षाचे महाराष्ट्र सरचिटणीस आ.भाई जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

          सांगोला येथे आयोजित शेकापक्ष विचारमंथन मेळावा या कार्यक्रमाप्रसंगी आ.भाई जयंत पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ.गणपतराव देशमुख, आ.धैर्यशील पाटील, माजी आ.संपतराव पाटील, शेकापक्षाचे कार्यालयीन चिटणीस एस.व्ही.जाधव, तालुका चिटणीस विठ्ठलराव शिंदे, चंद्रकांतदादा देशमुख, बाबा करांडे, ऍड.सचिन देशमुख, नानासाहेब लिगाडे, सभापती डॉ.श्रुतिका लवटे, भरत शेळके, संतोष देवकते, यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

         पुढे बोलत असताना आ.जयंत पाटील म्हणाले की, सध्याच्या राष्ट्रीय राजकारणामध्ये सर्वात तरुण 93 वर्षाचे नेतृत्व म्हणून काम करण्याचे भाग्य शेकापक्षाला मिळाले आहे.  विधानसभेत माईक जरी बंद पडला तरीही खड्याबोल आवाजात भाषण करणारे हे नेतृत्व जेव्हा उभा राहते तेव्हा संपूर्ण सभागृह त्यांचे विचार ऐकण्यासाठी शांत बसते. विधीमंडळातील त्यांची काम करण्याची पध्दत वेगळी आहे. फक्त सांगोला तालुक्याच्या विकासावर न बोलता आ.देशमुख हे संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाबाबत बोलत असतात. गेल्या 55 वर्षात सर्वसामान्यांची कामे त्यांनी केली असल्यामुळे निवडणूकीत मताचे दान भरभरुन लोक देतात.

        सध्या अनेक सत्ता उपभोगलेले लोक पक्षांतर करीत आहेत. अशा परिस्थितीत कॉंग्रेसचे बीजेपी व बीजेपीची कॉंग्रेस कधी झाली हे कळलेच नाही. शेतकरी कामगार पक्ष हा नेहमीच विचारांवर चालणारा पक्ष आहे. कधीही सत्तेत फार काळ नसताना प्रवाहाच्या विरोधात जावून आ.गणपतराव देशमुख यांनी तालुक्याचा कौतुकास्पद विकास केला.

      आ.धैर्यशील पाटील यावेळी बोलत असताना म्हणाले की, विचारमंथन मेळाव्याला जमलेली ही गर्दी बघितली की सहज लक्षात येते, 2019 चा सांगोला तालुक्याचा आमदार हा शेकापक्षाचाच असणार. देवाने या तालुक्याला पाऊस पाडायचा नाही ठरवले परंतु याच तालुक्याला देवासारखा माणूस दिला की ज्याने शेतीच्या पाण्यासाठी कृष्णेचे व पिण्याच्या पाण्यासाठी भीमा नदीचे पाणी आणून अशक्यप्राय गोष्ट शक्य केले. गेल्या अनेक वर्षात आ.देशमुख यांनी काय केले असा प्रश्न जे लोक विचारतात त्या लबाड लोकांना आमदारीपासून दूर ठेवले हेच महत्त्वाचे काम त्यांनी केले असल्याचे त्यांनी सांगितले.

       कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाना वरुन बोलत असताना आ.भाई गणपतराव देशमुख म्हणाले की, आजच्या कार्यक्रमाची गर्दी पाहून मी आजपर्यंत केलेल्या लोकांच्या कामाचे सार्थक झाले आहे. शेतकरी कामगार पक्ष हा छोटा असला तरी तत्वज्ञानाने मोठा आहे. जनतेची कामे करत असताना मी आमदार व मंत्रीपदाची स्वप्ने कधी बघितलेली नाही. निष्ठेने व प्रामाणिकपणे तालुक्याच्या विकासासाठी काम केले. यापुढच्या  काळात सोलापूर जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाचा वारसा टिकला पाहिजे व पक्ष संघटना बळकट झाली पाहिजे यासाठी तरुणांनी आता पुढाकार घेतला पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.

        सदर कार्यक्रम प्रसंगी बाबा कारंडे, संतोष देवकते, वैभव केदार, विशाल काटे, ऍड.सचिन देशमुख, कार्यालयीन चिटणीस एस.व्ही.जाधव, भरत शेळके, चंद्रकांतदादा देशमुख, माजी आ.संपत पाटील, आदि मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्वागत चिटणीस विठ्ठल शिंदे यांनी केले. या विचारमंथन मेळाव्यास शेतकरी कामगार पक्षाचे विविध गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अवश्य वाचा