मुंबई, 

भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या जागावाटपाच्या चर्चेतून फार काही निष्पन्न होत नसल्याचे स्पष्ट होऊ लागताच या दोन्ही पक्षांनी राज्यातल्या सर्वच्या सर्व २८८ मतदारसंघांतील उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. शनिवारी भाजपाच्या नेत्यांनी आढावा घेतल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी आपल्या मातोश्री निवासस्थानी आढावा घेतला.मातोश्री निवासस्थानी तातडीने बोलाविण्यात या बैठकीत पक्षाचे विविध जिल्ह्यांचे प्रमुख,संपर्कप्रमुख व पदाधिकारी सहभागी झाले होते. ही बैठक चालू असतानाच पक्षाच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने विविध मतदारसंघातील इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. दिवसभर या मुलाखती चालू होत्या.या मुलाखती सुरू असतानाच लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेनेच्या वाटाघाटींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे नीरज गुंडे मातोश्रीवर पोहोचले. गुंडे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोघांचेही मित्र आहेत. गुंडे मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन मातोश्रीवर पोहोचले होते, अशी चर्चा आहे. याबाबत प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांची विचारणा केली असता, आपण चहा पिण्यासाठी मातोश्रीवर आलो होतो, असे उत्तर गुंडे यांनी दिले.

अवश्य वाचा