रोहा 

खासदार म्हणून मागील तीन महिन्यांत केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी खा सुनिल तटकरे यांनी रोहा नगरपरिषदेच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.याप्रसंगी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आगामी विधानसभा निवडणुकीत शेकाप - राष्ट्रवादी - काँग्रेस व इतर समविचारी पक्षांच्या आघाडीला रायगड जिल्ह्यात चांगले यश मिळेल असे सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित शिवस्वराज्य यात्रा १९ ते २१ सप्टेंबर या कालावधीत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात येणार असल्याची माहिती खा सुनिल तटकरे यांनी दिली.तसेच मागील तीन महिन्यात रायगड लोकसभा मतदारसंघातील विविध समस्या मार्गी लावण्यासाठी केलेल्या पाठपुराव्या बाबत पत्रकारांना माहिती दिली.यामध्ये नेत्रावती एक्सप्रेस या गाडीला खेड येथे थांबा,राष्ट्रीय फळबाग योजना,मच्छीमाराना अनुदान,क्रीडा संकुलामध्ये मल्टीपर्पज हॉल,पाईपद्वारे सीएनजी पुरवठा,एलपीजी बॉटलींग प्लान्टची क्षमता वाढविणे,किनारपट्टी असणाऱ्या पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी तसेच कुडे येथील बौद्ध लेण्यांचा विकास करण्यासाठी स्वदेश पर्यटन योजनेअंतर्गत निधी मिळावा यासाठी केलेले प्रयत्न,प्रधानमंत्री जनविकास योजनेअंतर्गत मुस्लिम,नवबौद्ध,जैन,शिख, पारशी या समाजाच्या विकासासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी मंडणगड,श्रीवर्धन आणि म्हसळा या तालुक्यांचा या योजनेत समावेश व्हावा तसेच मतदारसंघातील रस्त्यांची दुरावस्था दूर करण्यासाठी केंद्राने निधी द्यावा अशा विविध मागण्यांसाठी केलेला पत्रव्यवहार याबाबत खा तटकरे यांनी माहिती दिली.

रोहा शहरात उभ्या राहत असलेल्या बहूउद्देशीय इमारतीसाठी तसेच इतर भौतिक सुविधांसाठी अडीच कोटी रुपयांचा निधी नगरपालिकेला उपलब्ध करून दिला असल्याची माहिती तटकरे यांनी दिली.दिव येथील जमीन घोटाळ्यातील सत्य बाहेर यावे तसेच जिल्ह्यात झालेल्या इतर जमीन व्यवहारातील सत्य बाहेर यावे यासाठी वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हावी अशी मागणी मुख्यमंत्री महोदयांकडे केली असल्याचे सांगितले असून रिफायनरी बाबत पूर्ण माहिती घेणार असून सदर प्रकल्प फायदेशीर आहे अथवा नाही तसेच स्थानिकांची मते आणि मित्र पक्षाच्या नेते मंडळींशी विचारविनिमय करून या प्रकल्पाबाबत निर्णय घेऊ असे देखील खा तटकरे यांनी सांगितले आहे. या पत्रकार परिषदेला नगराध्यक्ष संतोष पोटफोडे,उपनगराध्यक्ष मयूर दिवेकर,समीर सकपाळ,पूर्वा मोहिते, चाळके तसेच मधुकर पाटील,विजय मोरे, मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

अवश्य वाचा