प्रसिद्ध आणि वादग्रस्त पत्रकार रवीशकुमार यांना पत्रकारितेतल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांच्या बाजूने तसेच विरोधात बोलणार्‍यांकडून कडक प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. मॅगसेसे पुरस्स्काराला खास वलय असल्याने आणि या पुरस्स्काराने गौरवल्या जाणार्‍या व्यक्तीवर जगभरातून प्रकाशझोत पडत असल्याने या प्रतिक्रियांची विशेष दखल घ्यावी लागते. 

माझ्या व्यावसायिक यशाचा फॉर्म्युला मी सर्वांना अगदी खुलेपणाने सांगतो. यशाचे खास असे काही गुपित नसते. जिद्द, कष्ट, प्रामाणिकपणा, ग्राहकसेवा आणि कल्पकता या पंचसूत्रीच्या जोरावर कुणीही माणूस व्यवसायात भरारी घेऊ शकतो. यातील पहिला गुण म्हणजे जिद्द. मानवजातीने निसर्गावर मात करुन स्वतःची घडवलेली प्रगती ही याच जिद्दीचा परिपाक आहे. 

माझ्यात दुर्दैवाने लहानपणापासून या जिद्दीचा अभाव होता. शालेय जीवनात मी कधीही मनापासून झटून अभ्यास केला नाही, एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला नाही. वडिलांनी सुरू केलेल्या व्यवसायात उतरलो तेही जिद्दीने नव्हे, तर झटपट श्रीमंतीचे पोरकट स्वप्न मनाशी बाळगून. निर्धाराची ताकद नसल्याने व्यवसायात पहिल्याच वर्षी नुकसान झाल्यावर मी नेहमीचा पळपुटेपणाचा मार्ग पत्करण्याच्या विचारात होतो. धंदा म्हणजे माझ्यासाठी जणू गाजराची पुंगी होती जी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली. ‘आपण दुकान विकून भारतात परत जाऊया आणि मी नोकरी करुन घरखर्चाला मदत करेन’, असा उतावळा सल्ला मी वडिलांना दिला. पण तेथेच मला जिद्दीचे पहिले दर्शन घडले. 

माझे बाबा लष्करी सेवेत राहिल्याने त्यांना सहजासहजी माघार घेणे पसंत नव्हते. ते म्हणायचे, ‘दादाऽ क्या खाना तो दम खाना, मिट्टी मत खाना.’ बाबांनी मिळेल तेथून उधार-उसनवारी करुन दुकान सुरु ठेवण्यासाठी पैसा उभा केला. माझी आईसुद्धा याच जिद्दीचे प्रतिक. तिने आपले मंगळसूत्रासहित सर्व दागिने व घरातील चीजवस्तू विकून आम्हाला भांडवल पाठवले आणि सोबत एका ओळीची चिठ्ठी. त्यात म्हटले होते, की ‘एकदा पुढे टाकलेले पाऊल माघारी घेऊ नका.’ आई-बाबांच्या या निश्‍चयी स्वभावामुळे माझ्यात आजवर निद्रिस्त राहिलेली जिद्द एकाएकी जागृत झाली. ‘कर नाहीतर मर’, या जिद्दीने मी कष्ट केले आणि मग कधीच मागे वळून बघावे लागले नाही. 

जिद्द मनात रुजली म्हणजे ती अशक्यप्राय गोष्टी आपल्या हातून घडवून घेते. एका व्यावसायिकाचे उदाहरण आहे. तो एका कंपनीत निवृत्त होईपर्यंत अकाउंट्स विभागातील कारकून म्हणून नोकरी करत होता. तेथे त्याचा संपर्क कंपनीच्या विविध विभागातील कर्मचार्‍यांशी येई. अशाच चर्चांमधून त्याला उत्पादनाची विक्री व विपणन अल्पावधीत वाढवण्याचे एक वेगळे प्रारुप सुचले होते, परंतु ते कुणासमोर मांडायची हिंमत त्याच्याकडे नव्हती. कालांतराने हा माणूस कंपनीतून निवृत्त झाला, पण आपल्या मनातील प्रारुप राबवून बघायचा विचार त्याच्या मनातून गेला नाही. त्यातूनच त्याच्या मनात स्वतंत्रपणे व्यवसाय करण्याची जिद्द उत्पन्न झाली आणि तो यशस्वीही झाला. वयाच्या साठीनंतर तो केवळ 12 वर्षे अधिक जगला, पण या एका तपात त्याने आपला व्यवसाय आंतरराष्ट्रीय पातळीला नेला. त्याला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार आणि मूत्रपिंड विकार असे गंभीर रोग होते पण त्याची तमा न बाळगता तो अविरत कार्यरत राहिला. त्याच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टर त्याला आश्‍चर्याने विचारत, ‘अहोऽ ज्या वयात लोक आराम करतात तेथे तुम्ही व्यवसायासाठी इतके जिद्दीने कष्ट का करता?’ त्यावर तो म्हणाला, ‘डॉक्टरऽ मला आजवर माझ्यातील याच जिद्दीने जिवंत ठेवले आहे. मला ठाऊक आहे, की माझ्याकडे वेळ कमी आहे, पण मी मृत्यूला घाबरत नाही. त्याची वेळ येईल तेव्हा त्याने त्याचे काम करावे. तोवर मला माझे काम करु द्यावे.’ 

माझाही या निर्धारावर पूर्ण विश्‍वास आहे कारण त्याच्याच मदतीने मी मृत्यूच्या दारातून परत आलो आहे. अगदी माझ्या मित्राचेही उदाहरण तसेच घडले आहे. माझा मित्र कंपन्यांसाठी जाहिरातीची कामे करुन द्यायचा. एक दिवस त्याच्या मूत्रपिंडात कर्करोग झाल्याची बातमी त्याच्यावर विजेसारखी कोसळली. नंतर शस्त्रक्रिया करुन त्याचे रोगग्रस्त मूत्रपिंड काढावे लागले आणि केमोथेरपी उपचार घ्यावे लागले. मात्र शरीराने खंगला तरी मनाने तो कधीही निराश झाला नाही. मी भेटायला गेल्यावर तो ठामपणे म्हणायचा, ‘जयऽ देखना. लौटके आऊंगा मै.’ खरोखर त्याच्या प्रबळ इच्छाशक्तीने चमत्कार घडला. रुग्णालयातून परतताच त्याने आपली जीवनशैली बदलली. पहाटे साडेपाचला उठून व्यायाम करायला लागला. ध्यानधारणेने मन अधिकाधिक खंबीर बनवू लागला. आश्‍चर्य म्हणजे कर्करोगासारख्या असाध्य व्याधीतून तो लवकरच पूर्ण बरा होऊन पूर्ववत कामाला लागला. 

मित्रांनोऽ आयुष्यात कधीही आणि कोणतेही आव्हान समोर उभे राहिले तर पाय घट्ट रोवून लढा. नरवीर तानाजी मालुसरे धारातीर्थी पडल्यावर माघार घेणार्‍या मावळ्यांना वयोवृद्ध शेलारमामांनी बजावले होते, की ‘एकतर लढून मरा नाहीतर कड्यावरुन उडी टाकून मरा, पण पळपुटेपणाने शत्रूच्या हातून मारले जाऊ नका.’ तोच निर्धार आपल्या अंगी असला पाहिजे. असामान्य धाडसाने मृत्यूलाही आव्हान देणारे लोक पाहिले म्हणजे मला दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ‘गीत नया गाता हूं’ या प्रेरणादायी कवितेतील दोन ओळी आठवतात. 

हार नही मानूंगा, रार नयी ठानूंगा 

काल के कपाल पर लिखता और मिटाता हूं 

असा असीम निर्धार आपण अंगी बाणवायला हवा.  

अवश्य वाचा