अफझलखानाबरोबरच्या लढाईत जर शिवाजीराजांचे काही बरेवाईट झाले असते तर स्वराज्याचा डाव मांडण्यापूर्वीच मोडला असता. तसेच जर औरंगजेबाच्या आग्र्याच्या कैदेत महाराजांचा घातपात झाला असता तर स्वराज्याचा डाव अर्ध्यावरच मोडला असता. पण इतिहासात जर-तर नसते आणि म्हणूनच इतिहासाची  पाने ऐतिहासिक होऊन गेली, 17 ऑगस्ट, 1666 या दिवशी. काय घडले या दिवशी? 

12 मे 1666 या दिवशी बादशहा औरंगजेबाने आपल्या वाढदिवसानिमित्त आग्र्यात शाही दरबार भरवला होता. त्याचे आमंत्रण महाराजांनाही होते. आमंत्रण  कसले पुरंदरच्या तहातील ती एक तरतूदच. अफझलखान, सिद्दी जौहर, शाइस्तेखान ई.मुस्लिम सरदारांना धूळ चारणारे शिवाजी महाराज मात्र मिर्झाराजे  जयसिंग या औरंगजेबाच्या हिंदू सरदाराकडून पराभूत झाले. पुरंदरच्या तहानुसार बादशहाची आग्र्याला जाऊन भेट घेणे ही एक तरतूद होती. आग्र्यात जाऊन बादशहाची भेट घेणे म्हणजे मगरीच्या पाठीवर बसून समुद्रपर्यटनाचा आनंद घेण्यासारखे होते. अखेर हिंदवी स्वराज्यासाठी या दिव्यातून पार पडण्याचा निर्णय महाराजांनी घेतला आणि त्यातून ते सहीसलामत बाहेर पडलेसुद्धा.

मजल दरमजल करत अखेर एकदाचे महाराज आग्र्यास पोहोचले. 12 मे 1666 चा तो दिवस उजाडला. महाराज ह्याच दिवशी औरंगजेबाला भेटणार होते. महाराजांना दरबारात आणण्याची जबाबदारी मिर्झाराजे जयसिंगांचा मुलगा रामसिंहाकडे होती. पण औरंगजेबाने जाणूनबुजून त्याला दरबारात ठेवले. त्यामुळे खूपच गोंधळ उडाला. तोपर्यंत दिवाण-इ-खास व दिवाण-इ-आममधील दरबार संपला होता. अखेर औरंगजेबाच्या घुसकान्याच्या दरबारात महाराजांचे आगमन झाले. तथापि त्यांच्या आगमनाकडे औरंगजेबाने फारसे लक्ष दिले नाही. महाराजांनीही उभ्या आयुष्यात एका यवनाला प्रथमच मुजरा केला, पण यवनांच्या परंपरेनुसार बादशहाला कुर्निसात केला नाही आणि आपल्या जवळचा नजराणा औरंगजेबाला नजर केला. मग जाणूनबुजून महाराजांना दुय्यम सरदारांच्या रांगेत शेवटी उभे केले. इथेही नियतीला एक वेगळा इतिहास घडवायचा होता. कारण या दरबारात गेली शेकडो वर्षे माना खाली घालून रुबाबात उभे राहण्याची परंपरा होती. ती या ‘मराठमोळ्या शिवाजीराजांनी’ मोडली आणि रामसिंहाकडे एक करडी नजर टाकून महाराज कडाडले, रामसिंह! हमारे आगे यह कौन खडा है? ये जसवंतीसिंह ज्याने कोंढाण्याच्या लढाईत मराठ्यांच्या हातून मार खाल्ला. असे बरेच काही बोलून महाराज निघून गेले. भर दरबारात महाराजांच्या धारिष्ट्याची चर्चा होत होती. औरंगजेबालाही शिवाजीचे नक्की काय करायचे ते समजत नव्हते. महाराजांचा घातपात करून ठार मारायचा त्याचा विचार होता. पण तसे केल्यास यापुढे कोणीही औरंगजेबावर विश्‍वास ठेवला नसता. महाराजांना काबूलच्या मोहिमेवर पाठवून तेथे त्यांना कपटाने लढाईच्या  चकमकीत ठार मारण्याचा विचार होता. अखेर पुलातखानाच्या करड्या पहार्‍यात महाराजांना कैद करण्यात आले. यानंतर दोघांमध्ये अर्जविनंत्याचे युद्ध सुरु झाले. म्हणजे शिवरायांनी औरंगजेबाकडे अर्ज करायचे आणि औरंगजेबाने ते केराच्या टोपलीत टाकायचे, असा प्रकार घडायचा. महाराजांच्या सैन्याला दक्षिणेत  जाण्याची परवानगी औरंगजेबाने दिली आणि शिवाजीची प्रकृती बिघडल्याने गरिबांना मेवामिठाई वाटण्याची परवानगीचा अर्ज औरंगजेबाने मंजूर केला. झाले, एकदाचे पेटारे आतबाहेर येऊ जाऊ लागले. पेटार्‍यात फक्त मेवामिठाई असल्याने पुलातखान व त्याचे पहारेकरी कंटाळले. तर इकडे औरंगजेबाचे लक्ष लागले होते ते फिदाई हुसेनच्या वाड्याकडे. कारण या वाड्यात शिवाजी महाराजांना ठार मारण्याची त्याने 18 ऑगस्ट ही तारीख मुक्रर केली होती. या गोष्टीची खबर  महाराजांना लागली होती. त्यामुळे 17 ऑगस्टला पहाटेपासून महाराजांची प्रकृती जाणूनबुजून जरा जास्तच बिघडली होती. 17 ऑगस्टची ती दुपार. महाराजांच्या जागी हिरोजी फर्जत झोपला. आणि 33 कोटी देवांचा जप करून एका पेटार्‍यात शिवाजीराजे तर दुसर्‍या पेटार्‍यात संभाजीराजे झपकन बसले. आणि क्षणाचाही विलंब न करता पेटारे झपकन उचलले गेले. तोच पहारेकर्‍यांनी पेटारे थांबविले आणि पेटारे तपासायला सुरुवात केली. या वेळेस महाराजांच्या मनाची घालमेल काय झाली असेल ती इतिहासालाही ठाऊक नाही. एक, दोन, पेटारे तपासल्यावर पुलातखानाने सर्व पेटारे बाहेर सोडले आणि हिंदवी स्वराज्याचे स्वातंत्र्य औरंगजेबाच्या मगरमिठीतून सहीसलामत निसटले.

अवश्य वाचा