राज्यात ऑक्टोबरमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागलेले आहेत.विशेष सत्ताधारी भाजप, शिवसेनेने तर याच जोरदार तयारी सुरु केलेली आहे. त्यासाठी भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 1 ऑगस्टपासून महाजनादेश यात्रा तर शिवसेनेने आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जनसंवाद यात्रा, आदेश बांदेकरांची माऊली संवाद यात्रा सुरु केली आहे. मध्यंतरी राज्याला महापुराचा मोठा तडाखा बसला.त्यात पश्‍चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा येथे तर महाजलप्रलयच आल्याने मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रा स्थगित केली आता ती पुन्हा सुरु होतेय. या यात्रांच्या माहोलमध्ये जनतेचा आक्रोश मात्र राज्यकर्त्यांना ऐकूच येत नसल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. पूरग्रस्त सांगली, कोल्हापुरात नुसता हाहा:कार उडालाय. हजारो घरे पाण्यात वाहून गेलेली आहेत. लाखो एकर शेतीचे अपरिमित असे नुकसान झालेले आहे. मोडलेला संसार उभा कसा करायचा याची चिंताच पूरग्रस्तांना लागलेली आहे. सरकारने 6 हजार 800 कोटींचे मदतीचे पॅकेज जाहीर केले खरे, पण तो प्रस्ताव आता केंद्राला पाठवून तेथून हा निधी प्राप्त होईपर्यंत पूरग्रस्तांचे हाल न बघण्याच्या पलिकडचे होणार आहे. त्यामुळेच सर्वसामान्य जनतेचा आक्रोश दिवसेंदिवस वाढत चाललाय. पूरग्रस्तांना सावरण्यासाठी अवघा महाराष्ट्र धावून आलाय खरा, पण ही मदत काही कायमस्वरुपी असूच शकणारी नाही. त्यासाठी सरकारनेच पुढाकार घेऊन पूरग्रस्तांचे सुरक्षित आणि कायमस्वरुपी पुनर्वसन करणे ही काळाची गरज बनलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राज्याला उद्देशून केलेल्या भाषणात राज्यातील पूरग्रस्तांच्या मागे सरकार ठामपणे उभे राहील असे जाहीर केले खरे, पण ते प्रत्यक्षात येत नाही तोपर्यंत पूरग्रस्तांना सरकारविषयी कधीच आस्था वाटणार नाही. पुनर्वसनाचे काम हे प्रदीर्घ कालावधीचे आहे.त्यासाठी घिसाडघाईने निर्णयही घेऊन चालणार नाही.कायमस्वरुपी तोडगा काढायचा असेल तर राज्यातील जनतेला आधी पूर्णपणे विश्‍वासात घेणे फडणवीस सरकारला भाग पडणार आहे. पूरग्रस्तांच्या आक्रोशाबरोबरच बळीराजाचा पीळ पिळवटून टाकणारा आक्रोशही राज्यकर्त्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. पूरग्रस्त सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील शेतकर्‍यांची पुरती वासलात लागलीच आहे. त्याचबरोबर अतिवृष्टीने अन्य जिल्ह्यातही मोठी हानी झालेली आहे. एकीकडे असा ओला दुष्काळ असताना तिकडे मराठवाड्यातील बळीराजा अजूनही मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. तेथे पाऊस न पडल्याने दुष्काळाचे सावट आणखी गडद होत चाललेले आहे. अशी भीषण परिस्थिती असताना मुख्यमंत्री मात्र महाजनादेश यात्रेत मश्गुल आहेत हे चित्र खेदजनक आहे,जनतेचा आक्रोश ऐकून मुख्यमंत्र्यांना पाझर फुटावा आणि महाराष्ट्र आक्रोशमुक्त व्हावा, एवढीच माफक अपेक्षा.

 

बॉलीवूडची रजनीगंधा

शंभर वर्षांची परंपरा लाभलेल्या भारतीय चित्रपटसृष्टीतील बॉलीवूडमध्ये आतापर्यंत हजारो कलावंत निर्माण झाले.त्यात हजारो नायक झाले तर तेवढ्याच नायिकाही झाल्या. त्या सर्वांनीच आपल्या कलागुणांनी भारतीय चित्रपटसृष्टी समृद्ध करुन टाकली. प्रत्येक पिढीचा एक नायक असतो तशीच एक नायिका देखील प्रत्येकाच्या मनात कुठेतरी घर करुन राहिलेली असते. अशीच एक ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा. या गुणी अभिनेत्रीने भारताचा स्वातंत्र्यदिनाचा सोहळा सुरु असतानाच या जगाला अलविदा केले.  सिन्हा गेल्या काही वर्षांपासून हृदयविकार,फुफ्फुसांच्या आजाराने त्रस्त होत्या. त्यांनी  छोटी सी बात, रजनीगंधा, पती पत्नी और वो या चित्रपटात भूमिका साकारल्या होत्या.  काव्यांजली, कबूल है, चंद्र नंदिनी, कुल्फी कुमार बाजेवाला  यासारख्या हिंदीमालिकांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. सन 70 च्या दशकात प्रदर्शित झालेल्या रजनीगंधा या सिनेमाने विद्या यांना रातोरात ग्लॅमर बनवून टाकले होते. बॉलीवूडमधील रजनीगंधा अशीच त्यांची ख्याती झालेली होती. मध्यमवर्गीयांची भूमिका त्यांनी प्रभावीपणे निभावल्या. विद्या यांनी अनेक हिट चित्रपट दिलेत. त्याचमुळे राज कपूर यांनी त्यांना  ‘सत्यम शिवम सुंदरम’ हा चित्रपट ऑफर केला होता. पण विद्या यांनी या ग्लॅमरस भूमिकेला नकार दिला. त्याकाळात राज कपूर यांना नकार देणे एक मोठी गोष्ट होती. पण विद्या यांनी आपल्या अटींवर काम केले. चित्रपटांसाठी त्यांनी कुठलीही तडजोड केली नाही. बर्‍याच वर्षांनी अभिनेता सलमान खानच्या बॉडीगार्ड चित्रपटामध्ये त्यांची झलक पाहायला मिळाली होती. वयाच्या 18 व्या वर्षीच विद्या सिन्हा यांनी मॉडेलिंग आणि अ‍ॅक्टिंग सुरु केली होती. व्यंकटेश्‍वरम अय्यर यांच्याशी त्यांनी लग्न केले. पण 1996 मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर 2001 मध्ये विद्या यांनी ऑस्ट्रेलियात स्थायिक नेताजी भीमराव साळुंखे यांच्याशी दुसरा विवाह केला.  पैशांसाठी दुसरा पती विद्यांचा छळ करू लागला होता. पैसे देण्यास नकार दिल्यावर त्यांना मारहाण करू लागला होता. विद्या यांनी या स्थितीचा खंबीरपणे सामना केला आणि पतीविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर काहीच महिन्यांत त्यांनी दुसर्‍या पतीपासून घटस्फोट घेतला होता.बॉलीवूडच्या चमचमत्या पडद्यावर वावरणार्‍या प्रत्येक कलावंतांचे खाजगी आयुष्य हा एक संशोधनाचा  विषय आहे. हे कलावंत केवळ पडद्यावरच सुखी वाटतात. वैयक्तिक जीवनात मात्र त्यांच्या वेदना या न उमगणार्‍याच असतात.विद्या देखील अशीच होती.

 

अवश्य वाचा