महाप्रलयाच धोका अजूनही टळलेला नाही. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील  कृष्णा, पंचगंगेला आलेल्या पुराचे पाणी आता हळूहळू संथगतीने उतरु लागलेले आहे. ते उतरण्यासाठी आणखी काही कालावधी जाणार आहे. तोपर्यंत वरुणराजाने बरसणे थांबविणे गरजेचे आहे. याच काळात जर पुन्हा पाऊस पडू लागला, तर उतरलेले पाणी आणखी वाढण्याची भीती पूरग्रस्तांसह प्रशासकीय यंत्रणाही करीत आहे. त्यामुळे हा महापूर पूर्णपणे ओसरल्याशिवाय हे संकट कमी झाले असे कदापि म्हणता येणार नाही. या जलप्रलयाने लाखो संसार उद्ध्वस्त झाल्याचे भयावह चित्र दिसत आहे. लाखो एकर शेती पाण्याखाली गेल्याने ती पुन्हा पिकती करण्याचे मोठे आव्हान बळीराजापुढे आहे. त्यासाठी त्याला पुन्हा नव्या जोमाने आपल्या शिवारात उतरावे लागणार आहे. गावातील घरे, शाळा, मंदिरे यांची पुरती धूळधाण उडाली आहे. त्यातून सावरायचं कसं, याचीच मोठी चिंता पूरग्रस्तांना लागली आहे. महाजलप्रलयाने अवघ्या सांगली, कोल्हापूरची रया गेली आहे. बघावे तिकडे पाणीच पाणी दिसतेय. ज्या भोगावती, पंचगंगा, कुंभी, कासारी, तुळशी नद्यांच्या निर्मळ पाण्यांनी आमच्या अनेक पिढ्यांची तहान भागविली. ज्या नदीच्या पाण्याने आमच्या शिवारातील शेते फुलविली, त्याच फुलविलेल्या शेतीच्या जीवावर आम्ही सधन झालो, त्याच नद्या असे आक्राळविक्राळ रुप धारण करतील याची जराशीही कल्पना सर्वसामान्य कोल्हापूरकरांना नव्हती. दरवर्षी पावसाळ्यात पूर, महापूर येणे हे नित्याचे होते. पण, असा जलप्रलय येईल असे स्वप्नातदेखील वाटले नव्हते. पण, ते घडले आणि आमचे होत्याचे नव्हते झाले. डोळ्यादेखतच अनेकांची पडणारी घरे, कोसळणारे वाडे याच जलप्रलयात सर्वांनी अश्रूभरल्या नजरेने पाहिले. पाण्याखाली गेलेली शेती पाहताना या काळ्यात मातीत घाम गाळणार्‍या बळीराजाची अवस्था काय झाली असेल, याचे वर्णनदेखील करता येणार नाही. हे सारेे वर्णनापलीकडचेच आहे. हे सोसण्याची ताकद आता पूरग्रस्तांमध्ये राहिलेली नाही. कारण, पुन्हा नव्याने उभे करायचे. हे सारे उभे करताना सारी हयात घालविली, सुखाचे चार दिवस असतानाच नियतीने हा भला मोठा घाला घातला आणि होत्याचे नव्हते करुन टाकले. यातून सावरण्यासाठी खूप कालावधी लागणार आहे. महापुराचे संकट हे कोल्हापूर, सांगली, सातारकरांसाठी एक आव्हानच होते. त्यातून सावरताना अनेकांना आपले जीवही गमवावे लागले आहेत. दुभती जनावरे पुराच्या पाण्यात वाहून जाऊन मृत झालेली आहेत. शेतीही पूर्णपणे नष्ट झाल्याने उद्याची भ्रांत आता सर्वांनाच लागली आहे. महापुराच्या संकटातून सावरण्यासाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरु झालाय. कारण, यापूर्वी ज्या ज्यावेळी राज्यात अन्यत्र अशी संकटे आली, तेव्हा याच कोल्हापूर, सांगली, सातार्‍यामधून मोठ्या प्रमाणात अशीच मदत पोहोचवली गेली होती. त्यामुळे आपल्या कोल्हापूर, सांगली, सातारकरांना वाचविण्यासाठी महाराष्ट्रातील जनता आता पुढे सरसावली आहे. ही मदत जे खरोखरच पूरग्रस्त आहेत त्यांनाच मिळाली पाहिजे. शिवाय राज्य, केंद्र सरकारच्या माध्यमातूनही जी मदत मिळणार आहे, तीसुद्धा योग्य आपद्ग्रस्तांपर्यंत मिळाली तर काही प्रमाणात या पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केल्याचे समाधान प्राप्त होऊ शकेल. कारण, अनेकदा अशी नैसर्गिक आपत्ती आली की ती अनेकांसाठी इष्टापत्तीच ठरते. त्यातून मग मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होतात, जे पूरग्रस्त नसतात, त्यांनाही सरकारी मदत मोठ्या प्रमाणात मिळते आणि जे खरोखरच पूरग्रस्त झालेत, ते बिचारे अशा मदतीपासून नेहमीच वंचित राहतात. यासाठी सरकारी यंत्रणेबरोबरच स्वयंसेवी संस्था आणि पूरग्रस्तांनीही जागरुक राहणे गरजेचे आहे. महाजलप्रलयानंतर सोशल मीडियावर कुसमाग्रज यांची ‘कणा’ ही कविता सर्वत्र व्हायरल होत राहिली. त्यात त्यांनी म्हटल्याप्रमाणे
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा...
असे संकटातही उभारण्याचे आवाहन कुसुमाग्रजांनी या काव्यातून केले आहे. मात्र खरोखरच कणा मोडून पडलाय. त्यातून सावरण्यासाठी सर्वांच्या मदतीची नितांत गरज भासणार आहे. आता पूर ओसरू लागलाय. पण, तो ओसरल्यानंतर या महापुराचे भीषण वास्तव सामोरे येऊ लागल्याने पूरग्रस्त कमालीचे हादरुन गेलेले आहेत. कारण, आयुष्यभर काबाडकष्ट करुन जमा केलेले सारंच पुराच्या पाण्यात वाहून गेलेले आहे. ते पुन्हा उभे करण्यासाठी आता सार्‍यांनाच नव्या जोमाने उभे राहिले पाहिजे. यासाठी राज्य सरकारनेही खंबीरपणे पूरग्रस्तांच्या मागे उभे राहिले पाहिजे. दुर्दैवाने तसे घडताना दिसत नाही. वास्तविक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे पाठपुरावा करुन या जलप्रलयाला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची मागणी वारंवार केली पाहिजे. जे संसार मोडून पडलेत त्यांना तुटपुंजी मदत देऊनही आता भागणार नाही, तर त्या संसारांना पुन्हा उभे करण्यासाठी एक पालक या नात्याने सरकारने पूरग्रस्तांच्या मागे उभे राहिले पाहिजे.वाहून गेलेली जमीन पुन्हा पिकती करण्याबरोबरच पुराच्या पाण्यात वाहून गेलेले पशुधन पुन्हा नव्या रुपात बळीराजाला सुपूर्द केले पाहिजे, नाहीतर हा पूरग्रस्त देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही. संकट खूप मोठे आहे, याची जाणीव सर्वांनाच आहे. राज्यासह देशभरातून आता मदतीचा ओघ सुरु झालाय. राज्यातील देवस्थानांनीदेखील आपापल्या तिजोर्‍यातून पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यास पुढाकार घेतलाय. अजूनही देवस्थांनाही सारी तिजोरी या आपद्ग्रस्तांसाठी खाली केली तरी हरकत नाही. तसे झाले तर खरोखरच देवच मदतीसाठी धावला, अशीच भावना पूरग्रस्तांच्या मनात कायमची राहील. 

 
 
 

अवश्य वाचा