ज्या  घोषणेने हट्टी, दुराग्रही चर्चिललाही नमवले त्या, ‘छोडो भारत’ची घोषणा 8 ऑगस्ट 1942 ला गांधीजींनी केली. बर्‍याच लोकांना असे वाटते की, 8 ऑगस्टला गांधीजी गवालिया टँक मैदानावर आले, त्यांनी ‘छोडो भारत’ची घोषणा केली आणि पुढे ब्रिटिशांनी भारत सोडला. पण, वस्तुस्थिती तशी नाही. गांधीजींनी केलेल्या ‘छोडो भारत’ या घोषणेलासुद्धा एक इतिहास आहे, म्हणून त्याची दखल ‘तारखेत काय आहे?’मध्ये घेतलीच पाहिजे.

पाकिस्तानचे पौरोहित्य करण्यासाठी आलेली क्रिप्स योजना अखेर बारगळली. बारगळावी अशीच चर्चिलची इच्छा होती. कारण, तो स्वतःच म्हणतो की, ब्रिटन साम्राज्याचे विघटन करण्यासाठी मी इंग्लंडचा पंतप्रधान झालो नाही. केवळ अमेरिकेची दिशाभूल करण्यासाठी क्रिप्सला पाठवला होता. त्याच्या या वक्तव्याने सारे भारतीय निराश झाले होते. तथापि, लोक आता सुभाषकडे भारतीय स्वातंत्र्याचा किरण म्हणून पाहात होते. खुद्द गांधीजीही म्हणाले की, सुभाषच्या प्रखर स्वातंत्र भावनेने आम्ही पेटलो आहोत. तसेच या सुमारास गांधीजींचे वय 73 झाले होते. त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा उत्तरार्ध होत चालला होता. महायुद्धाने अहिंसेचे तत्त्वज्ञान धुळीत मिळाले, तर पाकिस्तानच्या मागणीमुळे हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या भावनांचा चुराडा झाला होता. तेव्हा अशा प्रसंगी आपण ब्रिटिशांच्या विरोधात काही केले नाही, तर इतिहास आपल्याला कधीच क्षमा करणार नाही, ही व्यक्तिगत सलही त्यांना टोचत होती. अशा उद्विग्न मनःस्थितीत सोमवार या त्यांच्या मौनाच्या दिवशी विचार करत बसले असता त्यांना एक मार्ग सापडला आणि त्यातून ‘छोडो भारत’ या घोषणेचा जन्म झाला.

सोमवारच्या मौनावस्थेच्या दिवशी भारतात ब्रिटिशांनी आपली सत्ता काढून घ्यावी असे त्यांना सांगावे, अशी कल्पना गांधीजींना सुचली होती. अमेरिकन पत्रकार लुई फिशर याला मुलाखत देताना त्यांनी सांगितले होते, समजा ही त्यांना (ब्रिटिशांना) जायला सांगितले, तर या सर्वातूनच ‘छोडो भारत’ या घोषणेचा जन्म झाला. पण, गांधीजींनी ‘छोडो भारत’ची घोषणा केली आणि लगेच नेहरू, पटेल, आझाद कामाला लागले असे नव्हे. विशेषतः पं. नेहरू व आझादांचा गांधीजींच्या आक्रमक धोरणाला विरोध होता. कारण, ब्रिटिश अडचणीत असताना आपण असे काही केल्याने  भारत हा जर्मनी, जपान, इटली यांचा हस्तक आहे, अशी आंतराष्ट्रीय राजकारणात भारताची प्रतिमा तयार होणार होती.  

गांधीजींच्या या लढाऊ रुद्रावतारामुळे देशभर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पण, काँग्रेसमध्ये दोन गट पडले. तेव्हा जर नेहरू, आझाद आपल्याबरोबर आले नाहीत, तर ‘छोडो भारत’ची प्रत्यक्ष घोषणा आपल्या एकट्याच्या हिमतीवर अमलात आणायची, असा विचार गांधीजींनी केला. त्यासाठी प्रसंगी काँग्रेसचा त्याग करण्याची गांधीजींची तयारी होती. तुम्ही कोणी येणार नसाल, तर मी एकटा पुढे जाईन, असे गांधीजी म्हणाले. अखेर नेहरू, आझाद यांचा विरोध मावळला आणि 14 जुलै 1942 रोजी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणीने ‘छोडो भारत’चा ठराव पास केला. काँग्रेसच्या आतापर्यंत झालेल्या सर्व अधिवेशनात हे सर्वात महत्त्वाचे असे ऐतिहासिक अधिवेशन मौलाना आझादांच्या नेतृत्वाखाली 7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतच गवालिया टँक (आजचे ऑगस्ट क्रांती मैदान) मैदानावर सुरु झाले. येथेच 14 जुलैच्या ‘छोडो भारत’ ठरावाचा अंतिम निर्णय व्हायचा होता. त्या काळातील एक लाख रुपये खर्चून 32 हजार चौ. फुटांचा उभारलेला भव्य मंडप 8000 प्रेक्षकांनी खचाखच भरला होता. सुमारे 350 देशी-विदेशी पत्रकार या प्रसंगी उपस्थित होते. आझादांनी ‘छोडो भारत’ या मागणीचे स्पष्टीकरण केले. तर पं. नेहरुंनी ‘छोडो भारत’चा ठराव मांडला. त्याआधी गांधीजींचे दोन तासांचे मंत्रमुग्ध करणारे भाषण झाले. दुसर्‍या दिवशी 8 ऑगस्टला मूळच्या ‘छोडो भारत’च्या ठरावावर अनेक सूचना मांडण्यात आल्या. त्या सर्व फेटाळण्यात आल्या आणि प्रचंड बहुमताने तो ऐतिहासिक ‘छोडो भारत’चा ठराव मंजूर झाला. आणि, मग पुढचा इतिहास सार्‍या भारतीयांना ठाऊक आहे. ‘छोडो भारत’चे जनक एक अमेरिकन पत्रकार आहेत. बरोबर 26 वर्षांपूर्वी 1916 रोजी एका जाहीर सभेत गांधीजींनी ते ऐतिहासिक भाषण दिले होते ते असे, हिंदुस्थानच्या कल्याणासाठी इंग्रजांनी येथून जावे. तसेच त्यांना हाकलून देणे आवश्यक आहे असे मला वाटते तर त्यांनी गेले पाहिजे, हे सांगायला मी कचरणार नाही. हे त्याचे बोल खरे ठरावे, कारण ‘छोडो भारत’मुळे हट्टी, दुराग्रही चर्चिलने इंग्लंडच्या राजा 6व्या जॉर्जपुढे कबूल केले की, ‘द आयडिया ऑफ ट्रान्सफर ऑफ पॉवर इन इंडिया हॅड बिकम अँन अँडमिटेड इनव्हीटॅबिलिटी इन माईंड्स ऑफ द ब्रिटिश पार्टी लीडर्स’ म्हणजे, भारतातील सत्तेचे हस्तांतरण ही कल्पना ब्रिटिश राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या मनात एक मान्य व अटळ अशी संकल्पना बनली होती.
     

 (सौजन्य ः सहज शिक्षण यू ट्यूब वाहिनी)

दिनांक 8 ऑगस्ट 2019 
इतर दिनविशेष :
1) ज्येष्ठ नागरिक दिन.
2) राष्ट्रीय संस्कृत दिन.
3) जागतिक मांजर दिन.
4) 1880- पुण्यात सार्वजनिक काकांचे स्मारक उभारण्यात आले.
5) 1902- पॉल डिरॅक, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
6) 1921- वुलिमिरी रामलिंगस्वामी, भारतीय वैद्यकीयशास्त्रज्ञ यांचा जन्म.

अवश्य वाचा