गेल्या आठवडाभरात राज्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. या पावसाचा कहर इतका वाढलाय, की राज्यातील मराठवाडा वगळता उर्वरित भागातील सर्व धरणे तुडुंब भरलेली आहेत, नद्यांना महापूर आलेले आहेत. लाखो जणांना या महापुराचा मोठा फटका बसलाय. लाखो एकर शेती पाण्याखाली गेल्याने बळीराजाला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. अशा वेळी राज्यकर्त्यांनी अन्य कुठलीही कामे न करता पूरग्रस्तांच्या मदतीला धावून येणे गरजेचे आहे. दुर्दैवाने याचाच विसर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पडलेला दिसतो. अवघा महाराष्ट्र जलमय झाला असताना, मुख्यमंत्र्यांना मात्र ऑक्टोबरमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीची चिंता लागून राहिलेली आहे. त्यामुळेच जलमय महाराष्ट्राला पाण्यात बुडवून मुख्यमंत्री भाजपसाठी ‘महाजनादेश’ यात्रा काढण्यात मश्गुल झालेले आहेत. लोकशाहीत प्रत्येक राजकीय पक्षाला अशा राजकीय यात्रा काढण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. आमचाही त्यास विरोध नाही. पण, वेळेचे भानही तितकेच बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. अवघा महाराष्ट्र जलमय झालेला असताना, लाखो लोक पुरात अडकले असताना, त्यांच्या मदतीला धावून न येण्याचे सौजन्यही मुख्यमंत्री महोदयांनी दाखविलेले नाही. याचेच वैषम्य राज्यातील जनतेला वाटते. वास्तविक, मुख्यमंत्र्यांनी सध्या सुरु असलेली महाजनादेश यात्रा तूर्त स्थगित ठेवून पूरग्रस्तांची विचारपूस करण्यासाठी पूरग्रस्त भागात धाव घेतली असती, तर त्यांना सध्या सुरु असलेली महाजनादेश यात्रा काढावीच लागली नसती. केवळ अतिवृष्टी पडलीय म्हणून राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली म्हणजे आपले कर्तव्य झाले, असे जर मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना वाटत असेल, तर ते अत्यंत चुकीचे आहे. राज्यातील जनतेच्या सुखदुःखात सहभागी होण्याचे औदार्य भाजप सरकारने दाखविले पाहिजे. केवळ सकाळी उठून टिव टिव करण्यापेक्षा प्रत्यक्षपणे काय परिस्थिती आहे. पूरग्रस्त जनतेला सरकारी मदत वेळेत मिळते की नाही, याचाही विचार फडणवीस सरकारने करणे आवश्यक आहे.केवळ प्रशासनाला आदेश दिले म्हणजे आपले काम झाले, असे जर फडणवीस यांना वाटत असेल, तर ते अत्यंत चुकीचे ठरणार आहे.पश्‍चिम महाराष्ट्रात सांगली, कोल्हापूर विभागात कृष्णेला आलेला महापूर अद्याप कमी होताना दिसत नाही. कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग योग्य प्रकारे झाला नाही त्याचा मोठा फटका सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना बसण्याची शक्यता आहे. यापूर्वीही सन 2005 मध्येही कर्नाटकातील अलमट्टी धरणामुळेच सांगली, कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जातीने याकडे लक्ष घालून कर्नाटकवर राजकीय दबाव आणून अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यास भाग पाडले पाहिजे. आता तर कर्नाटकात बी.एस. येदीयुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार सत्तेवर आलेले आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन अलमट्टी धरणाचा मुद्दा कायमस्वरुपी निकालात काढावा. केवळ महाजनादेश यात्रा काढली म्हणजे असले मूलभूत प्रश्‍न मिटले, असे जर फडणवीस यांना वाटत असेल, तर तो त्यांचा भ्रम आहे. कारण, अलमट्टीसारखे अनेक मुद्दे फडणवीस सरकारला गेल्या पाच वर्षांत सोडविताच आलेले नाहीत. त्यामुळे ते आणखी किचकट बनत चालले आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महानगरी मुंबईची पावसाळ्यात काय हालत होते, हेसुद्धा मुख्यमंत्र्यांनी अनेकदा अनुभवलेले आहे. तरीही त्यावर कायमस्वरुपी ठोस उपाययोजना करण्यात सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेला यश आलेले नाही. केवळ ‘करुन दाखविले’ असे मिरविण्यापेक्षा जे आहे ते नीट ठेवण्याचा प्रयत्न या सत्ताधार्‍यांनी करावा. मुसळधार पावसाने मुंबई, ठाण्यातील लोकलसेवेचे पुरते तीनतेरा वाजलेले आहेत. अनेक स्थानकांना धबधब्याचे स्वरुप आल्याचे दिसत आहे. अनेक रेल्वे रुळ उखडून गेलेले आहेत. त्या रेल्वेच्या सुधारणेसाठी विद्यमान सरकारने काय केले, हेच यावरुन दिसून येते. केवळ बजेटमध्ये तरतुदी केल्या म्हणजे आपले काम झाले, असेच या राज्यकर्त्यांना वाटत असेल तर अशा राज्यकर्त्यांना जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. राज्यात अनेक ठिकाणी विकासकामे अपूर्णावस्थेत सुरु आहेत. त्याचाही फटका पूरस्थितीला कारणीभूत ठरत आहे. कारण, जिथे-जिथे ही अर्धवट विकासकामे सुरु आहेत, तेथील पाणी वाहून जाणारे नैसर्गिक स्त्रोतच कायमस्वरुपी बंद करुन टाकण्यात आलेले आहेत. त्यामुळेच पाण्याचा विसर्ग होतच नसल्याने ही पूरस्थिती निर्माण झालेली आहे. राज्यातील सर्वच रस्त्यांची अवस्था ही अतिशय शोचनीय अशीच आहे. त्याच खड्डे पडलेल्या रस्त्यांवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रा काढत आहेत. निदान त्यावरुन तरी त्यांना समजेल राज्यातील रस्त्यांची अवस्था काय आहे. त्यातून ते योग्य बोध घेतील, अशी अपेक्षा.

अवश्य वाचा