हिमा दास या धावपटूने तब्बल पाच सुवर्णपदके जिंकून क्रीडा क्षेत्रातले आपले कर्तृत्व सिद्ध केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या दिग्गजांबरोबरच सर्वसामान्य लोकांनीही सोशल मीडियावरून तिचे सतत अभिनंदन आणि वारेमाप कौतुक केले. आपल्या प्रगतीचा आलेख सतत उंचावत ठेवत असतानाच सामाजिक भानही जपणार्‍या या गुणी खेळाडूविषयी...

हिमा दास या धावपटूने गेले काही दिवस लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. तिने एकापाठोपाठ जिंकलेल्या सुवर्णपदकांबरोबरच लोकांची मने जिंकली आहेतच; शिवाय, आसाममधील पूरग्रस्तांसाठी आपले अर्धे वेतन देऊन तिने सामाजिक बांधिलकीची तिची जाणही दाखवून दिली आहे. हिमा दास हिचा जन्म 9 जानेवारी 2000 चा आहे. जेमतेम 19 वर्षांच्या या खेळाडूचे टोपणनाव ‘धिंग एक्स्प्रेस’ असे आहे. आसामची ही स्प्रिंटर शर्यतीतील धावपटू किती जोरदार धावू शकते हे तिच्या या टोपणनावावरूनच स्पष्ट होते. अलीकडेच तिने राष्ट्रीय विक्रम केला असून, 400 मीटर धावण्याची शर्यत तिने 50.79 सेकंदांमध्ये पूर्ण केली. इंडोनेशियातील जाकार्ता इथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये तिने हा विक्रम नोंदवला. आयएएएफ वर्ल्ड यू 20 चॅम्पियनशिपमध्ये ट्रॅक इव्हेंटमध्ये सुवर्णपदक पटकावणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू आहे. खेळाबरोबरच तिचे शिक्षणही सुरू आहे. नुकतीच 2019च्या मेमध्ये ती आसाम हायर सेकंडरी एज्युकेशन कौन्सिलमधून ती बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाली. मात्र, तिच्या क्रीडा करिअरची सुरुवात आधीपासूनच झाली होती. 

आसाममधील कंधुलीमारी गावातील ती रहिवासी असून, तिच्या वडलांचे नाव रोणजीत दास आणि आईचे नाव जोनाली असे आहे. हिमा दासचे वडील व्यवसायाने शेतकरी आहेत. एकूण पाच भावंडांमध्ये हिमा सर्वात लहान आहे. तिने धिंग पब्लिक हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे. पहिल्यापासूनच खेळाची आवड असलेल्या हिमा दासला सुरुवातीला फूटबॉल खेळण्यात रस होता. पण, फूटबॉल खेळणार्‍या मुली फारशा नसल्यामुळे  हायस्कूलमध्ये ती नेहमीच मुलांबरोबर फूटबॉल खेळत असे. पण, भारताच्या महिला फूटबॉल संघात आपल्याला फारसे भवितव्य आहे, असे तिला वाटले नाही. त्यानंतर शाळेतील शारीरिक शिक्षणाच्या शम्सूल हक या शिक्षकांच्या सल्ल्यावरून तिने आपला खेळ बदलला आणि ती धावण्याच्या स्प्रिंट शर्यतींमध्ये भाग घेऊ लागली. नागावच्या जवाहर नवोदय विद्यालयातील प्रशिक्षकांनी तिच्यातील गुणवत्ता हेरली. त्यानंतर ती कमी आणि मध्यम अंतराच्या शर्यतींमध्ये भाग घेऊ लागली. शिवसागर क्रीडा स्पर्धेत तिला दोन सुवर्णपदके मिळाली. तिच्या कामगिरीमुळे क्रीडा आणि युवा संचलनालयाचे प्रशिक्षक निपोन दास आणि नाबाजीत मालाकार प्रभावित झाले. त्यांनी तिला अधिक चांगल्या प्रशिक्षण सुविधांसाठी गुवाहाटीला येण्याविषयी विचारले. तिच्या पालकांनी सुरुवातीला त्याला नकार दिला. परंतु, या प्रशिक्षकांनी त्यांना तिथे जाण्याचे महत्त्व पटवून दिल्यावर त्यांनी अखेरीस त्याला होकार दिला. 

हिमा सारुसजाई स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सजवळ राहू लागली आणि तिने राज्य अकादमीत प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. वास्तविक, या अकादमीत बॉक्सिंगचे आणि फूटबॉलचे प्रशिक्षण दिले जाते. परंतु, हिमाची गुणवत्ता पाहून तिला तिथे धावण्याचे प्रशिक्षण देण्यास परवानगी देण्यात आली. नंतरच्या काळात अ‍ॅथलेटिक्ससाठी स्वतंत्र सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या. अकादमीत गेल्यानंतर हिमाची हळूहळू अधिक प्रगती होऊ लागली. 2016 मध्ये ती ज्युनिअर नॅशनल फायनल्सच्या 100 मीटर पर्यंत पोहोचली. तसेच 2017च्या एशियन युथ चॅम्पियनशिप स्पर्धांसाठी तिची निवड झाली. या स्पर्धा बँकॉकमध्ये होणार होत्या. याखेरीज 2017 च्या नैरोबीच्या वर्ल्ड युथ चॅम्पियनशिपसाठीही तिची निवड झाली. या दोन्ही स्पर्धांत तिने अनुक्रमे सातवे आणि पाचवे स्थान मिळवल. 2018च्या एप्रिलमध्ये ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट इथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भाग घेतला. या स्पर्धांमध्ये तिने 400 मीटर आणि 4 बाय 400 मीटर रिले या स्पर्धांमध्ये भाग घेतला. तिने तिथे अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. मात्र, 51.32 सेकंदांत स्पर्धा पूर्ण करून ती सहावे स्थान मिळवण्यात यशस्वी ठरली. बोट्सवानाच्या सुवर्णपदक विजेत्या अमँटल माँटशो या खेळाडूहून तिला लागलेला वेळ 1.17 सेकंदांनी अधिक होता. रिले स्पर्धेतही ती भारतीय संघात होती, परंतु या संघाला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यांच्या एकूण कामगिरीसाठी त्यांना तीन मिनिटे आणि 33.61 सेकंद लागले. 

बारा जुलै 2018 रोजी फिनलंडमधील ताम्पेरे इथे झालेल्या वर्ल्ड यू-20 चॅम्पियनशिप्समध्ये हिमाने सुवर्णपदक मिळवले. तिने 51.46 सेकंदांत 400 मीटरचे अंतर कापून ही शर्यत जिंकली आणि सुवर्णपदक मिळवले. आंतरराष्ट्रीय ट्रॅक इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय स्प्रिंटर धावपटू ठरली. यावेळी तिने आपल्या व्यूहरचनेची चुणूकही दाखवली. जवळ-जवळ निम्मी शर्यत ती मंद असलेल्या गतीने धावली. त्यानंतर अखेरच्या 100 मीटरच्या अंतरात मात्र तिने आपला वेग वाढवला आणि तिच्या पुढे असलेल्या तीन स्पर्धकांना मागे टाकून तिने पहिला क्रमांक पटकावला.

2018च्या आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी तिची निवड झाली. 400 मीटर शर्यतीत ती धावणार होती. हे अंतर तिने फक्त 51 सेकंदांत पूर्ण केले आणि नवीन भारतीय राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. 26 ऑगस्ट 2018 रोजी 400 मीटर फायनलमध्ये तिने आपल्या वेळेत आणखी सुधारणा केली. मात्र, यावेळी तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्यानंतर 30 ऑगस्ट 2018 रोजी एम.आ. पूवम्मा, सरिता गायकवाड आणि व्ही.के. विस्मया यांच्यासह तिने 3ः28.72  या वेळेत 400 मीटर रिलेचे अंतर कापून तिच्या टीमने सुवर्णपदक पटकावले. 

यंदाच्या जुलै महिन्यात तिने आपल्या खेळाने क्रीडा रसिकांचे डोळे दिपवून टाकले. तिने या एका महिन्यात सुवर्णपदकांची लयलूट केली आहे. 2 जुलै 2019 रोजी पोलंडमध्ये झालेल्या पोझनान अ‍ॅथलेटिक्स ग्रँड प्रिक्स स्पर्धेत हिमा दासने 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावले. ही शर्यत पूर्ण करण्यास तिला 23.65 सेकंद लागले. त्यानंतर कुथो अ‍ॅथलेटिक्स मीटमध्ये 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले. 7 जुलै 2019 मध्ये झालेल्या या स्पर्धेत तिने हे अंतर 23.97 सेकंदांत कापले. 

याच वर्षी 13 जुलैला तिने झेक रिपब्लिकमध्ये झालेल्या क्लाड्नो अ‍ॅथलेटिक्स मीटमध्ये 200 मीटरचे अंतर 23.43 सेकंदांतच कापले आणि पुन्हा एकदा सुवर्णपदकावरचा आपला हक्क अबाधित ठेवला. याखेरीज झेक प्रजासत्ताक इथे झालेल्या टाबर अ‍ॅथलेटिक्स मीटमध्ये नुकतेच 17 जुलैला तिने आणखी एक सुवर्णपदक मिळवले. यात तिला 200 मीटरचे अंतर कापण्यास फक्त 23.25 सेकंद लागले. हिमा दासच्या प्रगतीचा हा एकूण आलेख पाहता ती दिवसेंदिवस आपल्या कामगिरीत सुधारणा करत असून, तिला लागणारा वेळ कमी करत निघाल्याचे दिसते. 20 जुलै 2019 रोजी तिने पाचवे सुवर्णपदक जिंकले आणि यावेळी तिच्या वेळेत आणखी घट झाली. तिला हे अंतर कापण्यास आणखी कमी म्हणजे 52.09 सेकंदांचा वेळ लागला.

अवश्य वाचा