महाराष्ट्रात गेल्या आठवडाभरात वरुणराजाने जोरदार हजेरी लावलेली आहे. यामुळे तहानलेल्या महाराष्ट्राची तृष्णा आता भागणार आहे. मुंबई,ठाण्यासह कोकण,उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. तो जोर आणखी काही दिवस वाढण्याची शक्यताही मध्यवर्थी वेधशाळेने वर्तविलेली आहे. यावर्षी  मोसमी पाऊस सरासरी गाठेल असा अंदाज मध्यवर्ती वेधशाळेने वर्तविला होता.पण गेल्या आठवडाभरात पावसाचा वाढलेला जोर पहाता हा पाऊस ऑगस्टमध्येच सरासरीपेक्षा अधिक पडेल असा अंदाज आहे.मराठवाडा तसेच सोलापूर जिल्ह्याचा परिसर अजूनही मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. तेथेही आगामी काळात अशीच पर्जन्यवृष्टी व्हावी, अशीच त्या वरुणदेवाकडे मनोमन प्रार्थना मराठवाड्यातील जनता मोठ्या अपेक्षेने करीत आहे. या पावसाने राज्यातील बहुंताशी धरणे,तलाव तुडूंब भरलेले आहेत.नद्या नाल्यांना महापूरही आलेले आहेत.या महापुराचा फटका लाखोजणांना बसला आहे. शिवाय लाखो एकर शेतीही पाण्याखाली गेलेली आहे. त्याचा फटका हा राज्यातील बळीराजाला बसणार आहे. अर्थात त्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनाने सुरुही केले आहे .पण नैसर्गिक आपत्तीपुढे कुणाचेच काय चालत नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेले आहे. मुसळधार पावसाने मुंबईसह अन्य महानगरांची वर्षभराची पाणीसमस्या ऑगस्टमध्येच मिटवून टाकली आहे.हे करीत असताना आपण सर्वजणांनी एक गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे ती म्हणजे वरुणराजाने जी काही बरसात केली त्यातील किती टक्के पाणी आपण अडविले.दरवर्षी राज्यासह देशात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होते.त्यातील अवघे काही टक्केच पाणी आपण अडवू शकलो आहे.उर्वरित पाणी जसे पडते तसेच ते समुद्राला वाहून जाते आणि मग ऐन उन्हाळ्यात आपल्याला पुन्हा एकदा पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.हे वर्षानुवर्षाचे विदारक चित्र आहे. ते बदलण्याची आता खरोखरच गरज निर्माण झालेली आहे. त्यासाठी पाणी अडवा,पाणी जिरवा हा मुलमंत्रच सर्वांनीच जोपासला पाहिजे. सरकारच्या माध्यमातून जलसिंचनासाठी अनेक  कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत.त्यातून काही प्रमाणात जलसिंचन होत असल्याचे जाणवत आहे. पण ही चळवळ आणखी व्यापक होणे गरजेचे आहे.कारण भविष्यात पाण्यासाठीच युद्ध होण्याची भीती सातत्याने व्यक्त केली जात आहे.आणि खरीही आहे.कारण गेल्या काही वर्षात राज्याला दुष्काळाला सामोरे जावे लागले होते.त्याचा परिणाम राज्याच्या एकूणच विकासप्रक्रियेवर पडलेला आहे.त्याची झळ दुष्काळग्रस्त जनतेलाही मोठ्या प्रमाणात बसली आहे.एकीकडे पाण्याची मोठ्या प्रमाणात होणारी नासाडी आणि दुसकीकडे पाण्याच्या एका थेंबांसाठी चाललेला संघर्ष असे विदारक चित्र आपणास पहावयास मिळत आहे.हे कुठेतरी थांबले गेले पाहिजे.नव्या पिढीला देखील पाण्याचे महत्व पटवून देणे गरजेचे आहे.उगीचच होणारी पाण्याची नासाडी थांबविली तर महाराष्ट्रासह अवघा देश सुजलाम सुफलाम होण्यास विलंब लागणार नाही.यासाठी नद्या जोड प्रकल्पाची प्राधान्याने अंमलबजावणी करणे हाच त्यावरील एकमेव उपाय आहे.यासाठी विद्यमान केंद्र सरकारने प्रबळ इच्छाशक्ती दाखवून नद्या जोड प्रकल्पास प्रारंभ केला पाहिजे.अर्थात हा प्रकल्प वर्षभरात पूर्ण होणारा नाही त्यासाठी खूप वर्षाचा कालावधी लागणार आहे.तोपर्यंत अनेक पावसाळे असेच वाहून जातील.हे जरी खरे असले तरी भविष्याचा विचार करता नद्या जोड प्रकल्पाला राज्यकर्त्यांनी चालना देणे अत्यावश्यक बनलेले आहे.आता ऑगस्ट सुरु झालाय.अजून पावसाचे दोन महिने बाकी आहेत.या कालावधीत देखील असाच पाऊस सर्वदूर पडावा.जिथे दुष्काळाची झळ पोहोचलीय अशा मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागातही मोसमी पावसाने अशीच बरसात करुन तेथील शिवारे हिरवीगार करावीत,कोरडे ठाक पडलेली धरणे,तलाव पाण्याने तुडूंब भरावीत,नद्या,नाले ओसंडून वहावीत आणि दुष्काळामुळे करपलेली आमच्या बळीराजाची शेती पुन्हा एकदा अशीच बहरावी,एवढीच मनोमन प्रार्थना त्या निसर्गाकडे.रायगडसह कोकणापुरते बोलायचे झाल्यास दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही वरुणराजाने कोकणावर चांगलीच बरसात केलेली आहे. कोकणातील सर्व नद्या तुडुंब भरुन वाहू लागल्या आहेत.नद्यांच्या महापुराचे पाणी विविध ठिकाणी घुसल्याने जनजीवनही विस्कळीत झालेले आहे.त्यामुळे कोट्यवधींची वित्तहानी देखील झालेली आहे.पंधरा,वीसजणांचे नाहक बळीही गेलेले आहेत.अशा दुर्घटनांची कोकणच्या मातीला जणू सवयच लागलेली आहे.त्यामुळे दरवर्षी येणारा पावसाळा जसा सुखाच्या जोरदार सरी बरसत येतो तसाच तो वाईट घटनाही घडवून जातो.अर्थात या वाईट घटना घडण्यामागे आपलीच अनेकदा घिसाडघाई कारणीभूत ठरतेय.त्यासाठी पावसाळ्यात सर्वांनीच जपूण राहणे ही काळाची गरज बनली आहे.

अवश्य वाचा

पोटनिवडणूक मतमोजणी सोमवारी.