अशी एक आगळावेगळी तारीख निवडण्यामागे इतिहास आहे तो असा की , नुकताच 12 नोव्हेंबर, 2004 रोजी एतिहासिक मुघले आझम नव्याने भेटीला आला. आधुनिक तंत्र वापरून मूळ कृष्णधवल असणारा हा चित्रपट रंगीत प्रदर्शित झाला आणि इतिहास 40  वर्षांनी मागे गेला . 

निर्माता - दिगदर्शक के . आसिफ यांचे मुघल - ए - आझम एक स्वप्न. भारतीय चित्रपटांच्या इतिहासात या चित्रपटात ने एक नवा विक्रम प्रस्थापित केला . हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याच्या भव्यतेमुळे त्याची कीर्ती परदेशात पोहोचली होती . अहोरात्र मेहनत करून आसिफमियाँनी हा चित्रपट बनवला होता आणि तो एतिहासिक दिवस उजाडला. 

5 ऑगस्ट, 1960 रोजी हिंदुस्थानात एकाच वेळी 190 ठिकाणी प्रदर्शित होणारा हा पहिला चित्रपट . त्या वेळेस लाहोर- कराचीहून हजारो चित्रपटशौकिन हिंदुस्थानात आले होते . मुंबईला ’मराठा मंदिर ’ या चित्रपटगृहात 5 ऑगस्ट रोजी त्याचा प्रीमियर शो होता . त्यासाठी परदेशातील सिनेरसिक, कलावंत हजर होते . चित्रपटाची तिकिटे मिळावी म्हणून लोक रात्रीच मुक्कामाला तेथे येत व पुढच्या आठ दिवसांचे तिकीट घेऊन जात . कित्येकदा तिकिटांसाठी मारामार्‍या होत होत्या . आज नव्या पिढीला दंतकथा वाटेल , पण ही वस्तुस्थिती होती . प्रेक्षक, समीक्षक आणि मीडिया या सर्वांनी या चित्रपटाला उचलून धरल्याने पुढे राष्ट्रपतींचे रौप्यपदकही त्यास मिळाले . आज इतकी वर्षे झाली तरी या चित्रपटाची जादू कायम आहे . असे या चित्रपटात आहे तरी काय ? 

कथा, संवाद, अभिनय, संगीत, छायाचित्रण, उंची कपडे, वातावरण, भव्य सेट्स आणि कलाकारांचे अभिनय या सार्‍या बाबतीत तो उजवा ठरला . यातील शिशमहालच्या सेटने तर लोकांचे डोळे दिपले . कोट्यवधी रुपये खर्च झालेला हा पहिलाच चित्रपट. यातील संगीत सिनेरसिकांच्या हृदयाला जाऊन भिडले होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या चित्रपटाचा गाभा म्हणजे त्याची कथा . काय होती ती कथा ? कथा होती सलीम - अनारकलीच्या प्रेमाची........त्याला करणार्‍या त्याच्या बापाची म्हणजे अकबराची आणि द्विधा मनःस्थितीत असणार्‍या जोधबाईची. पण हे सारे पाहिल्यावर असे वाटते की ,हे सारे खरे होते का ? तर नाही ! पण आपल्या देशात इतिहासावर सिनेमा नाटकांचा भारी पगडा. त्यामुळे कलेच्या नावाखाली के. आसिफ यांनी इतिहासाच्या खून कसा केला हे जुन्या आणि नव्या पिढीला समजायला पाहिजे त्यासाठी हा सारा खटाटोप. 

मुळात हा सलीम कोण ? तर सलीम उर्फ जहांगिर म्हणजे अकबराच्या सर्वात क्रूर पुत्र. जहांगीरला लग्नाला बायका 13 होत्या शिवाय जनानखाना वेगळाच पत्नी म्हणून त्याच्या जीवनात आलेली शेवटची स्त्री म्हणजे मिहरुन्निसाखानाम उर्फ नूरजहाँ. आता ही नूरजहाँ उर्फ अनारकली कोण?तर हिचे मूळ घराणे इराकचे नशीब काढण्यासाठी हीच बाप गियासबेग हा अकबराच्या दरबारात आला. लेखणी आणि वाणी वर प्रभुत्व असणारा गियासबेग अकबराच्या दरबारात लवकरच मोठा  झाला. तेव्हा त्याची लावण्यवती मुलगी नूरजहाँ सुद्धा मोठी  होत होती. जहांगीरची नजर तिच्यावर पडली. पण अकबराला हि गोष्ट आवडली नाही. अखेर नूरजहाँचे लग्न शेर अफगाण या सरदारासोबत लावले. पुढे तिने एक  कन्हेलाही जन्म दिला. सारांश, नूरजहाँ दासीकन्या मुळीच नव्हती. तथापि अजूनही जहांगीरच्या मनात नूरजहाँ कोरली असल्याने पुढे जहांगीर राजा झाल्यावर त्याने एका खोट्या चकमकीत शेर अफगाणला ठार मारून एका मुलीची आई असणार्‍या नूरजहाँला हजचा दिन अशी पदवी देऊन तिच्याशी विवाह केला. काही इतिहासकारांच्या मते सलिमने शेर अफगाणला मारले नाही. तथापि, हे जरी खरे असले तरी या भानगडीत न पडता सलिमने नूरजहाँशी लग्न केले हा इतिहास आहे.  पुढचा इतिहास तर मोगलांच्या इतिहासात नूरजहाँ युग म्हणूनच ओळखला जातो. वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी ती जहांगीरची राणी झाली. तिच्या सौदर्यावर जहांगीर फिदा झाल्याने त्याचे राजकारणात अजिबात लक्ष नव्हते. सारे राज्य नूरजहाँच्या हुकूमावर चालत असे. जहांगीरला म्हणजे सलीमला फक्त रोज एक शेर दारू, एक शेर मांस आणि नूरजहाँ मिळाली कि बाकी त्याची कशावरही वासना होत नसे. दारूच्या अतिरेकामुळे सलीम 7 नोव्हेंबर,1627 रोजी मेला. नूरजहाँने सलीमवर मनापासून प्रेम केले हे खरे,तसेच राज्यकारभारहि  चांगला केला. जहांगीरच्या मृत्यनंतर शहाजहान सत्तेवर मला आणि नूरजहाँच्या नशिबी राजकीय वनवास आला. पुढे ती बरीच वर्ष जगली. पण तो तिचा इतिहास नाही. मरण येत नव्हते म्हणून ती जगली हाच नूरजहाँचा म्हणजे अनारकलीचा उत्तरार्धाचा इतिहास असे असूनही ह्या चित्रपटात काय दाखवले आहे तर अकबराचा त्यांच्या प्रेमाला जाणारा विरोध. ह्या प्रेमापोटी प्रत्यक्ष पित्यावर तलवार चालविणारा सलीम. सलीमला कैदेत टाकून त्याला तोफेच्या तोंडी देणारा बाप. अनारकलीला भिंतीत चिरून मारणारा अकबर. तिला वाचविण्यासाठी आणि त्यांचे प्रेम यशस्वी होण्यासाठी स्वतःचे बलिदान देणारा तो राजपूत सरदार (त्या राजपुताला हिंदू-मुस्लिम ऐक्याचा प्रतिनिधी दाखवला.) आणि कहर म्हणजे भिकार्‍यासारख्या वेशात नूरजहाँची आई अकबराकडे आपल्या मुलीच्या प्राणाची भीक मागते, तेव्हा हृदयाची कालवाकालव झालेला अकबर आणि शेवटी कुठली तरी अंगठी दाखवून आपण मला एकदा काही तरी माग असा वर दिला होता. तेव्हा माझ्या मुलीला भिंतीत चीणू नका. असे दीनवाणी म्हणणारी नूरजहाँची आई आणि अखेरीस एका चोरवाटेने तिची कैदेतून मुक्तता करून अकबर स्वतः जातीनिशी नूरजहाँला तिच्या हवाली करून देश सोडून जाण्यास सांगतो. का?तर सलीमला तू मेली आहेस असे वाटावे म्हणून.  इतिहासाच्या नावाखाली हा काय तमाशा चाललाय? परंतु सिनेमा हे सध्या प्रबोधनाचे माध्यम असल्याने लोकांना तोच इतिहास खरा वाटतो. त्यासाठी खरा इतिहास कळवा म्हणूनच ’तारखेत काय आहे ?’ मध्ये त्याचा समावेश. कलेच्या नावाखाली सिनेमाकर्त्यानी इतिहासाचा खून करू नये.

(सौजन्य ः सहज शिक्षण यू ट्यूब वाहिनी)
 
दिनांक 5 ऑगस्ट 2019 
आजचे इतिहासातील इतर दिनविशेष :
1) 1876- ’आर्यवार्ता’ हे धुळ्याचे   वृत्तपत्र सुरू .
2) 1890- मराठी इतिहासकार, लेखक , पट्टीचे वक्ते महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचा जन्म .
3) 1930) - चंद्रावर पाय ठेवणारा पहिला मानव निल आर्मस्ट्राँग यांचा जन्म .
4) 1960- ’ मुघले आझम’ हा चित्रपट हिंदुस्थानात एकाच वेळी 190 ठिकाणी प्रदर्शित.
5) 1987 - मिझोराम या केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा .

अवश्य वाचा

रस्त्या केला गिळंकृत