श्रावणाचं आगमन तनामनाला नवी ऊर्जा प्रदान करणारं असतं.  अलिकडच्या व्यस्त दिनचर्येत प्रत्येकाला अथवा प्रत्येकीला सगळे सोपस्कार पार पाडून श्रावणातले सगळे सण साजरे करता येत नाहीत. पण या सणांच्या निमित्ताने बदलणार्‍या सामाजिक वातावरणाचा प्रभाव मात्र खात्रीने दिसून येतो. तिन्हीसांजेला एखाद्या घरात धूप लावला तरी संपूर्ण परिसर सुगंधी व्हावा त्याप्रमाणे हा श्रावण आला की सगळीकडे मंगलमय वातावरण पसरतं. 

शलाका, एमबीए झालेली एक उच्चशिक्षित मुलगी. दोन महिन्यांपूर्वीच लग्न झालं तिचं. परवाच दुकानात भेटली. साड्यांची खरेदी सुरू होती तिची. मी म्हटलं, ङ्गअगं नुकतंच तर लग्न झालंय. वॉर्डरोबमध्ये साड्यांचा ढीग असेल तुझ्या. मग आता परत साड्यांची खरेदी कशाला?फ तर म्हणते कशी, ङ्गमावशी, त्या साड्या लग्नासाठी होत्या. आता मंगळागौरीची तयारी चाललीये. लग्नातल्या साड्या सगळ्यांनी बघितल्या आहेत. मग नवीन साड्या नकोत का?फ त्या क्षणी माझ्या मनात तरुण पिढीच्या या खरेदीप्रेमाविषयीचा तिटकारा उफाळून आला. म्हटलं, ङ्गमंगळागौर फक्त नटण्या-मुरडण्यासाठी करायची नसते शलू. ते एक व्रत आहे, निभवावं लागतं.फ त्यावर खांद्यावर हात टाकत ती म्हणाली, ङ्गअगं मावशी, ते का मला माहीत नाही? मी लहानपणापासून अनेक नवविवाहितांना हे व्रत स्वीकारताना पाहिलं आहे. तुला तर माहीत आहे, बाळबोध विचारांनी भरलेल्या घरातच मी जन्मले, वाढले. आई-आजीने सांगितलेल्या गोष्टी ऐकत निजले आणि आजोबांनी पुजेवेळी म्हटलेल्या स्तोत्रांनीच जागी झाले. मला अद्यापही आजी वाचायची त्या श्रावणातल्या कहाण्या आठवतात. किती सुंदर होत्या त्या छोट्या छोट्या कथा! सोशिक बायकांच्या, त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीच्या, समाजाकडून दुखावलेल्यांच्या आणि सरतेशेवटी अमक्या तमक्या व्रताने देव प्रसन्न झाल्याने त्यांची सगळी दु:ख सरल्याच्या... लहानपणी एक गोष्ट म्हणूनच त्याकडे बघितलं. पण आता त्याचा खरा अर्थ कळतोय.

 स्त्रीमुक्तीवाद्यांच्या या जगात अशा व्रतांचा उदोउदो करणारी ही कोण अशा अर्थाने काहीजणी पहात असल्याचं माझ्या नजरेतून सुटलं नव्हतं तेव्हा! पण शलाका पुढे काय सांगतीये याकडे मात्र लक्ष होतं. गप्पांच्या त्याच ओघात ती म्हणाली, ङ्गभाकडकथा म्हणून सोडून द्यावा इतक्या दुर्लक्षण्याजोग्या त्या निश्‍चितच नाहीत. जुन्या काळात या कथांनी प्रापंचिक व्यापतापाने गांजलेल्या स्त्रीमनांना आधार दिला. संयम राखला तर विस्कटलेली घडी बसायला वेळ लागत नाही, असा उपदेश दिला. आता आमच्या पिढीलाही याच संयमाची आणि समुपदेशनाची गरज आहे. आमच्यापुढे सगळी सुखं हात जोडून उभी आहेत. पण त्याचा नेमका उपभोग कसा घ्यायचा, न ऊतता आणि न मातता संपत्तीचा मान कसा राखायचा, कितीही उंच उडालो तरी पाय जमिनीवर कसे ठेवायचे हे जगण्याचे मूलमंत्र या कहाण्यांमधून किती सहजतेने समजतात! तो उपदेश हळूवारपणे मनात झिरपतो. एकदा मन अशा प्रकारे संस्कारित झालं की कहाण्यांचा तो सत्संग कायम अनुभवायला मिळतो. त्यासाठी कुठल्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या क्लासला जावं लागत नाही.फ आता मात्र मी आवाक होऊन शलाकाकडे बघत होते. तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करणारी एक समंजस मुलगी किती विचाराने या आपल्या संपन्न परंपरेकडे पहात होती! माझ्या डोळ्यातून ओसंडून वाहणारं कौतुक तिने हलकेच झेललं आणि पुन्हा एकदा साड्यांच्या ढिगात हरवून गेली. पण या संभाषणामुळे नवीन पिढीकडे ङ्गसब घोडे बारा टक्केफ या न्यायाने पहायचं नाही ही शिकवण मात्र मिळाली.

हा श्रावण अशा अनेक सुंदर रुढी-प्रथा-परंपरांची सुंदर मालाच घेऊन येत असतो.  सृष्टीचा गाभारा हिरवाईने बहरल्यानंतर, जलधारांचं नृत्य ऐन भरात आल्यानंतर, मेघांचं आच्छादन थोडं विरल्यानंतर येतो तो हा श्रावण! सण, उत्सव ही श्रावणाची अविभाज्य अंगं आहेतच. पण या सगळ्यामुळे होणारी वातावरणनिर्मिती अधिक सुंदर आहे असं वाटतं.  अलिकडच्या व्यस्त दिनचर्येत प्रत्येकाला अथवा प्रत्येकीला सगळे सोपस्कार पार पाडून  सगळे सण साजरे करता येतात असं नाही. पण या सणांच्या निमित्ताने बदलणार्‍या सामाजिक वातावरणाचा प्रभाव मात्र खात्रीने दिसून येतो.  तिन्हीसांजेला एखाद्या घरात धूप लावला तरी तो संपूर्ण परिसर सुगंधी होतो. त्याचप्रमाणे हा श्रावण आला की सगळीकडे मंगलमय वातावरण पसरतं. जाई-जुई-चमेली-गुलाब-केवडा आदी फुलांनी सजलेला बाजार बघितला तरी तनामनाला वेगळीच टवटवी येते. केळीचे हिरवेकंच खुंट, विड्यांच्या पानांची गर्द हिरवी छटा, दुर्वांचा तो रसरशीत ताजेपणा, नाजूकशी कमळं, मैलभर अंतरापर्यंत दरवळ पसरवणारा चाफा, पानांनाही झाकून टाकेल अशा प्रकारे बहरलेली जास्वंद, नारळाचे ढीग, टपोर्‍या सुपार्‍यांची मोहक मांडणी आणि या सगळ्या सजावटीत उठून दिसणारी तेवढीच रसरशीत फळं पाहिली की  का कोण जाणे, सगळं कसं मंगलमय भासू लागतं. कुठल्याशा घरातून मंत्रांचे स्वर आणि आरतीचा उच्चारव कानी पडला तरी मनाचा एक कोपरा प्रसन्नतेने भरुन जातो. पंचमीला कुठल्याशा वस्तीबाहेरच्या झाडाला झोका टांगून त्यावर उंचच उंच झोके घेणारी मुलं पाहिली की आपलं मनही आनंदाच्या लाटांवर झुलत असल्यासारखं वाटतं. 

श्रावण असा सर्वव्यापी आहे. कितीही नाही म्हटलं तरी या श्रावणोत्सवात प्रत्येकजण एखाद्या धाग्यासारखा गुंफला जातो. म्हणूनच एरवी क्लिन शेव्ह केल्याशिवाय बाहेर न पडणारा एखादा युवक दाढीचे खुंट वाढवून ङ्गश्रावण पाळतोयफ असं झोकात सांगून जातो. सामिष अन्नाशिवाय ताटाला न शिवणार्‍या एखाद्या घरात श्रावण अगदी श्रद्धेने पाळला जातो. एरवी भूक भूक करणारी मुलं देवबाप्पाला नैवेद्य दाखवल्यानंतर खाऊ देते बरं का, असं म्हणताच हसत होकार देतात. कामाच्या धबडग्यातून वेळ  काढत गृहिणी एखाद्या मंगल समारंभासाठी लगबग करते. एरवी बाहेरचे पदार्थ आणण्याचा आग्रह धरणारी ती आता मात्र वेळात वेळ काढून देवाला पुरणावरणाचा नैवेद्य दाखवण्याचा प्रयत्न करते. घरात सवाष्ण जेवावी, आपल्याकडून अन्नदान व्हावं, जमतील तितके उपवास करावेत असा तिचा मानस असतो. थोडक्यात काय, तर नेहमीच्या धबडग्यातून मिळालेले चार क्षण हीच श्रावणाची खरी खासियत असते. त्यामुळेच श्रावण म्हणजे श्रद्धा आहे, श्रावण म्हणजे आराधना आहे, श्रावण म्हणजे आस्था आहे, श्रावण म्हणजे प्रेमाचा उमाळा आहे, श्रावण म्हणजे ऊन-पावसाचा रम्य खेळ आहे. 

ऊन श्रमवणारं आणि सावली सुखावणारी असली तरी या दोन्हीही स्थिती सतत बदलत असतात ही समज देणारा हा काळ. म्हणूनच तो अधिक रम्य आणि मंगलमय आहे. हा सण कोणाला पूजा-अर्चांमध्ये अडकवून ठेवतो तर कोणाला आनंदाचे रंग उधळण्याची मुक्त सूट देतो. एकीकडे कर्मकांडांचं महत्त्व सांगतानाच तो एकमेकांशी स्नेहबंध सुधारण्याचे मंगलमय मुहूर्तही घेऊन येतो. सजलेल्या निसर्गात जाऊन रममाण होण्याची संधी देणारे अनेक सण आपल्याला नवऊर्जा आणि नवचेतना देऊन जातात. आसक्ती आणि निवृत्तीचं भान देऊन जातात. आनंदालाही आध्यात्माची चौकट हवी, हा विचारही अशा सणांमुळेच जागृत होतो. सुखाचा संयमाने स्वीकार करणं आणि मिळालेल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याची शिकवण अशा संस्कारांमुळेच मिळत जाते. म्हणूनच श्रावण शेतात पेरलेल्या धान्याचं आणि मनातल्या पेरलेल्या सद्विचाराचं पोषण करतो असं म्हणता येईल.

आताही असाच एक श्रावण आला आहे. सणवार साजरे करण्याच्या धांदलीत तो कधी सरेल हे समजणारही नाही. मंगळागौर, नागपंचमी, राखी पौर्णिमा, गोकुळाष्टमी असे सण नेहमीच्या धामधुमीत पार पडतील. नवीन वस्त्रांची सळसळ सुखावेल. बहीण-भावामधल्या नात्याला प्रेमाची आणखी एक गाठ दृढ करेल. देवळाराऊळांमधून कथा-कीर्तनं पार पडतील. कुठलेसे महाराज प्रवचनं सांगतील. वृद्ध महिला आघाडा-दुर्वांचे हार करुन मनोभावे जिवतीची पूजा करतील. तिच्या अंगाखांद्यावर खेळणार्‍या बाळांप्रमाणे आपल्या घरातलं गोकुळही आरोग्यसंपन्न राहो, अशा मंगल कामनेनिशी शुक्रवारी माता आपल्या घरातल्या मुलांचं औक्षण करतील. हे सगळे उपचार पार पाडणं शक्य असेल तर सोन्याहून पिवळं... पण शक्य नसेल तर त्यांचा यथोचित मान राखत मनात मंगलमय विचाराचं आणि शुद्ध आचाराचं व्रत मात्र नक्की अंगिकारावं. कारण मशागत केलेल्या अशा मनातच सुविचारांची रुजवण होईल आणि एक दिवस आयुष्याचाच श्रावण  होऊन जाईल!

 

अवश्य वाचा