दांडगुरी:  श्रीवर्धन तालुक्‍यात काही गावांमध्ये काही प्रमाणात करपा रोगाचा प्रादुर्भाव भात पिकावर आढळून आला आहे. पीकवाढीच्या अवस्थेत बुरशीजन्य करपा रोगाची लागण झाल्यास उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते त्यामुळे या रोगाचे वेळीच नियंत्रण करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी श्री शिवाजी भांडवलकर यांनी केले आहे.सध्याचे ढगाळ वातावरण, अधूनमधून येणारा ऊन पाऊस आणि दमट हवामान करपा आणि कडा करपा रोगांच्या वाढीसाठी अनुकूल आहे. सध्या तालुक्यामध्ये काही ठिकाणी भात पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. पीकवाढीच्या अवस्थेत बुरशीजन्य करपा रोगाची लागण झाल्यास उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते. ज्या भागात या रोगाची लागण झालेली नाही अशा भागातील शेतकऱ्यांनीसुद्धा प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्यात. सध्याच्या काळात करपा रोगाप्रमाणेच कडा करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे या दोन्ही रोगांच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना कराव्यात.

काही वेळेस पोषक हवामान राहिल्यास, करपा, शेंडे करपा, पर्णकोष, करपा, पर्णकोष कूज इत्यादी रोगांची तीव्रता वाढते. अशावेळी तातडीने शिफारशी प्रमाणे बुरशीनाशकांची फवारणी करावी. 

 पानांवर लंबगोल मध्यभागी फुगीर व दोन्ही बाजूंनी निमुळते, मध्य भाग राखाडी व कडा तपकिरी रंगाच्या ठिपके दिसतात ही करपा रोगाची लक्षणे आहेत.तसेच कडा करपा रोगाची लक्षणे  ही पानांच्या कडेपासून मध्य शिरेकडे पाने करपतात. सकाळच्या वेळी पानांच्या खालच्या पृष्ठभागावर दुधाळ रंगाचे दव बिंदू साठलेले दिसतात अश्या स्वरूपात दिसतात.लक्षणांच्या आधारे रोगाचे निदान केल्यानंतर करपा व कडा करपा रोगाच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशकांची फवारणी घेणे आवश्‍यक आहे. करपा रोगसाठी सहा मि.लि. ट्रायसायक्‍लॅझोल किंवा १० ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा २५ ग्रॅम कॉपर ऑक्‍झिक्‍लोराईड प्रति किंवा १० मि.लि. प्रोपीकोनॅझोल प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणी द्रावणासोबत २० मि.लि. चांगल्या दर्जाचा स्टिकर मिसळावा. फवारणी पावसाची उघडीप बघून करावी. रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी एकूण तीन फवारण्या १५ दिवसांच्या अंतराने घ्याव्यात.कडा करपा रोगाच्या नियंत्रणासाठी २५ ग्रॅम कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड + ५ ग्रॅम स्ट्रेप्टोमायसीन सल्फेट प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणी करताना द्रावणात २० मि.लि. स्टिकर मिसळून फवारणी करावी. एकूण तीन फवारण्या १५ दिवसांच्या अंतराने घ्याव्यात. भात खाचरातील पाण्याचा वेळोवेळी निचरा करावा. कडा करपा रोग साधारणपणे ऑगस्ट महिनाअखेर दरम्यान आढळतो. या रोगाची लक्षणे दिसताच पाण्याची पातळी कमी करावी. नत्रयुक्त खतांची मात्रा कमी करावी किंवा विभागून द्यावी.अशी लक्षणे दिसल्यास शेतकरी बांधवांनी त्वरित कृषी विभागाशी किंवा आपल्या गावातील कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन श्री भांडवलकर यांनी केले आहे.तसेच कृषी विभागाकडून कीडरोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी क्रॉपसॅप योजना राबविली जात आहे. यासाठी ८ कृषी सहाय्यक आणि १ कृषी पर्यवेक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे. दर आठवडय़ाला मोबाईल अँपद्वारे पीक परिस्थितीचे सर्वेक्षण केले जात आहे. कीडरोग प्रादुर्भावाची पाहणी करून त्याबाबतचा ऑनलाईन अहवाल सादर केला जात आहे. या अहवालावर कोकण कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांकडून वेळोवेळी सल्ले प्राप्त होत आहेत. कीड रोग प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना शेतक-यांना दिल्या जात आहेत.अशी माहिती श्री भांडवलकर यांनी दिली आहे.

 

 

अवश्य वाचा