खांब-रोहे

     रोहे तालुक्यातील ताज्या भाजी पाल्याच्या पिकासाठी विशेष सुप्रसिद्ध असणाऱ्या बाहे गावा शेजारून वाहणाऱ्या कुंडलिका नदीच्या पुलाचे लोखंडी राँड गंजल्याने अपघाताचा धोकाही वाढला आहे. 

    १९८९ च्या महापूराचा फटका बाहे गावाला बसल्या नंतर शासनाने संपूर्ण गावाचे स्थलांतर देवकान्हे नजीक असणाऱ्या पिंपळवाडी गावाच्या हद्दीतील मोकळ्या जागेत केले. संपूर्ण गावाचे स्थलांतर झाले तरी ग्रामस्थांची शेतीवाडी ही नदीशेजारी असणाऱ्या जुन्या वसाहतीला लागूनच असल्याने नव्या गावातून जुन्या गावात जाण्यासाठी तारेवरची कसरत करून नदीतूनच मार्गक्रमण करावे लागत असे.  पावसाळ्यात तर याही पेक्षा भयंकर अवस्था असायची. अशा परिस्थितीत शासनाकडे पाठपुरावा करून नदीवरील पूलाचे बांधकाम करण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांचा फार मोठा व्याप तर वाचलाच याशिवाय रोजच्या जाचातून सुटकाही झाली. 

      सदर नदीपुलाचे लोखंडी राँड गंजल्याने येथून मार्गक्रमण करणे धोक्याचे झाले आहे. याशिवाय नदी पूलाला आवश्यक उंचीचा संरक्षक कठडा नसल्यानेही अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. 

       गत तीन चार वर्षा पूर्वी या पुलावर दोन बैलांच्या झालेल्या झुंझीत एक बैल थेट नदीपात्रात खाली कोसळल्याने खाली कपडे धुत असणा-या महिलेच्या अंगावर पडल्याने सदर महिलेला आपले प्राण गमवावे लागले होते. भविष्यात पुन्हा अशाप्रकारची घटना घडू नये व अन्य संभाव्य अपघाताचा धोका लक्षात घेता

नदी पुलाचे कठडे व गंजलेले लोखंडी राँड याबाबत योग्य ती उपाययोजना लवकरात लवकर करावी अशाप्रकारची ग्रामस्थांची मागणी आता जोर धरू लागली आहे.

अवश्य वाचा