2 ऑगस्ट 2019 भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा 72 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. या पक्षाच्या जडणघडणीमध्ये रायगड जिल्ह्याचे योगदान फार मोठे आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये राजकीय पक्षांना महत्त्व प्राप्त झाले आहे, असे राजकीय पक्ष आपल्या विचारप्रणालीनुसार आपले कार्य करतात. अशा अनेक राजकीय पक्षांच्या मालेतील शेतकरी कामगार पक्ष हा एक होय. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारतीय राजकारणामध्ये या पक्षाची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. महाराष्ट्रामध्ये या पक्षाला विशेष स्थान आहे. रायगड जिल्ह्यामध्ये आजही हा पक्ष प्रभावी ठरला आहे.

सन 1948 मध्ये स्थापन झालेला हा पक्ष, पुढील काळात संपूर्ण महाराष्ट्रात त्याचा विस्तार वाढला. या कालावधीमध्ये या पक्षाचा प्रवेश रायगडमध्ये झाला व तो येथे रुजला. या पक्षाची उद्दिष्टे ठरली. त्यामध्ये

1) शेतकरी व कामगार यांची लोकशाही प्रस्थापित करणे व त्यांची आर्थिक पिळवणूक थांबविणे.

2) खासगी क्षेत्रावर नियंत्रण आणणे व मूलभूत आणि राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या उद्योगांचे राष्ट्रीयीकरण करणे.

3) ग्रामीण भागातील भूमीहीन शेतमजुरांची वाढती बेकारी व शहरी भागातील कामगारांची वाढती बेकारी कमी करण्याचा प्रयत्न करणे.

4) सहकारी शेती तंत्राचा वापर करुन शेतजमिनीचे विषम वाटप समस्या दूर करणे.

वरील उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून पक्षाच्या नेत्यांनी सन 1952 च्या निवडणुकीत सहभाग घेतला; परंतु या निवडणुकीत त्याला फारसे यश आले नाही. पुढील काळात पक्षाने आपला प्रभाव वाढविण्यास सुरुवात केली. विशेषत: रायगडमध्ये त्याचा जोर दिसतो. नारायण नागू पाटील, भाऊसाहेब राऊत, दत्ता पाटील, दि.बा. पाटील,  प्रभाकर पाटील, वसंत राऊत, गो.स. कातकरी, पा.रा. सानप, कृष्णा मुंढे, सुमंत राऊत, अ.प. शेट्ये, नि.ज. सावंत, दत्तुशेठ पाटील, मोहन पाटील, जयंत पाटील, विवेक पाटील, मीनाक्षी पाटील, धैर्यशील पाटील, पंडित पाटील अशी एक आमदार व खासदार यांची साखळीच निर्माण झाली. वरील नेत्यांच्या नेतृत्वामध्ये रायगडमधून शेतकरी कामगार पक्षाची वाटचाल सुरु झाली. नारायण नागू पाटील जिल्हा बोर्डाचे अध्यक्ष असताना त्यांनी भरीव स्वरुपाचे काम केले. सन 1951-52 च्या निवडणुकांमध्ये अलिबाग तालुक्यातून ना.ना. पाटील यांची उमेदवार म्हणून निवड झाली. मुंबई राज्यात यावेळी पक्षाला 17 जागा मिळाल्या. यामध्ये कुलाबामध्ये पक्षाचा प्रभाव जास्त होता. परंतु, या निवडणुकीनंतर पक्षात मतभेद वाढले. तरीसुद्धा ते सावरण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. पक्षाचे ज्येष्ठ नेते नारायण नागू पाटील यांनी 1959 मध्ये आदिवासींची जाहीर सभा (पेण तालुक्यातील ठाकूर, कातकरी) भरलेली असताना, तिचे अध्यक्षपद भूषविले. आमदार गो.स. कातकरी यांनी आदिवासींच्या मांडलेल्या 11 मागण्यांना पाठिंबा दिला. आपल्या भाषणामध्ये त्यांनी आदिवासींना मार्गदर्शन केले. कुलाबा जिल्ह्यातील खारेपाट भागातील पाणी प्रश्‍नावर आपल्या ‘कृषीवल’ या साप्ताहिकातून त्यांनी लेखाद्वारे सरकारला जाणीव करुन दिली. सन 1957 मध्ये दत्ता पाटील शे.का.प.चे आमदार म्हणून विधानसभेत पोहचले. एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला. त्यांचे कार्य रायगडपुरते मर्यादित न राहता सिंधुदुर्ग, गोव्यापर्यंत पोहचले. रायगड बाजाराच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात सहकार चळवळीची पायाभरणी त्यांनी केली. त्यांची वकिली ही पैसा कमविण्याचे साधन न बनता गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी होती. सन 1957, 1967, 1978, 1980, 1985 व 1990 अशा सहा वेळा विधानसभेवर निवडून येऊन विधानसभा गाजवली. याच काळात त्यांनी शैक्षणिक चळवळ उभारुन तिचा प्रसार ग्रामीण भागापर्यंत केला. विधानसभेमध्ये महत्त्वाच्या विधेयकासंबंधीच्या संयुक्त चिकित्सा समित्यांमध्ये त्यांची निवड झाली होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये शेतकरी कामगार पक्षाने महत्त्वाची भूमिका बजावली. या आंदोलनामध्ये रायगडमधील पक्षाच्या नेत्यांनी योगदान दिले. रायगडमधील शे.का. पक्षाचे एक प्रभावी नेतृत्व म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो; ते म्हणजे, दि.बा. पाटील हे होत. सन 1957, 1962, 1967, 1972, 1980 अशा पाच वेळा विधानसभेवर पनवेल मतदारसंघातून व 1977, 1984 असे दोन वेळा खासदार म्हणून निवडून जाणारे ते होते. आपल्या या कारकीर्दीमध्ये त्यांनी रायगड जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या, प्रकल्पग्रस्तांच्या समस्या व प्रश्‍न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांचे सिडकोविरोधातील प्रकल्पग्रस्तांचे साडेबारा टक्क्यांचा फॉर्म्युला आंदोलन विशेष गाजले. रायगड जिल्ह्यातील बड्या कंपन्यांच्या विरोधात स्थानिक भूमीपुत्रांच्या बाजूने शेतकरी कामगार पक्ष सतत उभा राहिला. पक्षाचे नेते जयंतभाई पाटील यांनी आर.सी.एफ. च्या विरोधात भूमिका घेतली व कामगारांच्या बाजूने त्यांना निर्णय घेण्यास भाग पाडले. आ. विवेक पाटील यांनी विधानसभेत रायगड जिल्ह्यातील ज्वलंत प्रश्‍नावर विचार मांडून ते सोडविण्यासाठी प्रयत्न केले. आ. मोहन पाटील यांनी आपल्या 27 वर्षांच्या काळात खार जमिनीच्या विविध प्रकल्पांबाबतच्या समस्यांवर विधानसभेत आवाज उठवून शेतकर्‍यांना न्याय मिळवून दिला. तसेच आ. मीनाक्षी पाटील यांची मत्स्योद्योग व बंदर विकासमंत्री म्हणून निवड झाली. या काळात त्यांनी खारेपाटातील लोकांचे प्रश्‍न मोठ्या तळमळीने मांडले. रेवस बंदराची योजना आणण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. याप्रमाणेच आजही शेतकरी कामगार पक्षाचे कार्य रायगड जिल्ह्यामध्ये पूर्वीइतकेच प्रभावी आहे. त्यामुळेच तो या जिल्ह्यामध्ये प्रभावी पक्ष म्हणून टिकून राहिलेला आहे.

अवश्य वाचा

पोटनिवडणूक मतमोजणी सोमवारी.