पाली/बेणसे

         सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर गावात ब्रिटिश कालीन छोटे धरण आहे. या धरणाला गळती लागली होती. अनेक वर्षे जुने असल्याने या धरणाच्या ठोस दुरूस्तीची गरज होती. सिद्धेश्वर ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन 14 व्या वित्त आयोगाच्या निधीचा सुयोग्य वापर करून या धरणाची नुकतीच दुरुस्ती केली आहे. त्यामुळे येथील परिसराचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. धरणाची दुरुस्ती केल्यामुळे जलसाठ्यात वाढ होऊन ग्रामस्थांसह मुक्या जनावरांना मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. 

      खूप वर्षे जुने असल्याने वारंवार या धरणाच्या पत्र्याच्या दरवाजांतून पाण्याची गळती होऊन पाणी वाया जात होते. हा धरणाचा दरवाजा सडला होता.   वारंवार दरवाज्याला डांबर लावून सीलबंद करावे लागत असे. मात्र पुन्हा पुन्हा तिथे गळती लागत असे. दगडी भिंतींची देखील दुरवस्था झाली होती. त्यामुळे धरणात पाणी साठत नव्हते. अनेकदा वेगवेगळ्या उपाय योजना करून देखील फारसा उपयोग होत नव्हता. सिद्धेश्वर ग्रामपंचायतीचे तरुण सरपंच उमेश यादव यांनी पुढाकार घेऊन उपसरपंच नथुराम चोरघे व सदस्यांच्या सहकार्याने धरणाच्या ठोस दुरुस्तीचा निर्णय घेतला. धरणाचे दरवाजे नवीन बसवून त्याखाली सिमेंटचे पाईप देखील लावण्यात आले. धरणाच्या मूळ दगडी बांधकामाला धक्का न लावता तुटलेल्या ठिकाणी योग्य प्रकारे दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता या धरणाची गळती थांबून मुबलक पाणी साठणार आहे. व परिसरातील पाण्याचा प्रश्न देखील मार्गी लागणार आहे.

कोट

     धरणाच्या दुरुस्तीमुळे त्याची साठवणूक क्षमता वाढली आहे. यामुळे

खाली गावाला मुबलक पाणी पुरवठा होईल. भूगर्भातील पाणीसाठा देखील वाढणार आहे. ग्रामपंचायत हद्दीतील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी विहीरी दुरुस्ती, तलावातील गाळ काढणे, बंधारे बांधणे, नळपाणी योजना आणणे अशी विविध कामे करत आहोत. दर वर्षी या सर्व उपक्रमांचा चांगला रिझल्ट मिळत आहे.

उमेश यादव, सरपंच, ग्रामपंचायत सिद्धेश्वर

अवश्य वाचा