मुंबई, दि. ११ -

मारूती सुझूकीसह देशातील वाहन उत्पादक कंपन्यांनी

उत्पादनात मोठी कपात केली आहे. मागणी घटल्याने टाटा, होंडा, महिंद्रा या कंपन्यांनीही

उत्पादन कपातीचा मार्ग अवलंबलेला आहे. वाहन उद्योगातील मंदीची ही अवस्था देशासमोरील

मोठ्या आर्थिक संकटाचे निदर्शक आहे, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन

सावंत यांनी मंगळवारी केली.

वाहन उद्योगातील मंदीवर प्रतिक्रिया देताना सावंत म्हणाले की, मागील पाच वर्षांत मोदी

सरकारने अर्थव्यवस्थेसंदर्भात आभासी चित्र उभे केले होते. जीडीपी आणि इतर क्षेत्रासंदर्भात खोटी

आकडेवारी सांगून अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. पण वाहन

उद्योगातील या वास्तविकतेमुळे सरकारचा फुगा फुटलेला आहे. वाहन उद्योगाबरोबरच गृहनिर्माण

क्षेत्रातही मोठ्या मंदीचे चित्र आहे. हजारो घरे विक्रीविना पडून असल्याने या क्षेत्रालाही मोठा

फटका बसलेला आहे. लोकांची क्रयशक्ती कमी झाल्याचे हे द्योतक असून ही स्थिती

अर्थव्यवस्थेसाठी चिंताजनक आहे.

देशासमोरील आर्थिक संकटासंदर्भात काँग्रेसने मागणी केल्यानंतर केंद्र सरकारने आर्थिक स्थिती

उंचावण्यासाठी विशेष गटाची स्थापना केली आहे. ही परिस्थिती सुधारणे सरकारसमोर मोठे

आव्हान आहे. या सर्वांचा परिणाम बेरोजगारीचा उच्चांक होण्यात झाल्याचे दिसत आहे. सरकारने

आतातरी प्रामाणिकपणे आकडेवारी समोर आणावी, असेही ते म्हणाले.

अवश्य वाचा