सात जुनचा मुहूर्त चुकल्यानंतर सोमवार 10 जुनला रात्री हजेरी लावलेल्या पावसामुळे उकाडयाने त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा दिला. मात्र महावितरणच्या खंडीत विज पुरवठयामुळे हे सुख काही क्षणच अनुभवता आले. साडेअकरानंतर खंडीत झालेला विजपुरवठा थेट पहाटे 3 नंतर पुर्ववत झाल्याने प्रचंड उकाडयात जनतेला रात्र काढावी लागली. तर दुसर्‍या दिवशी पुर्वनियोजित शटडाऊनमुळे सात तास वीजेशिवाय दिवस काढावा लागला. याप्रकारामुळे जनता प्रंचड त्रस्त झाल्याने महावितरणच्या नावाने शंख केला जात होता.
अरबी समुद्रातील संभाव्य चक्रीवादळामुळे कोकणातील मान्सूनचे आगमन लांबणीवर पडण्याची शक्यता असतानाच प्रादेशिक हवामान विभागाने 3 दिवसांचा अलर्ट जारी केला होता. त्यानुसार एक दिवस अगोदरच संपूर्ण कोकाणकिनारपट्टीवर जोरदार पहिला पाऊस कोसळला. विजांच्या कडकडाट आणि मेघगर्जनेसह कोसळणार्‍या या पावसामुळे वातावरणातील उकाडा नाहीसा होऊन गारवा निर्माण झाला होता. मात्र महावितरणच्या खंडीत वीजपुरवठयामुळे हा दिलासा काही क्षणच टिकला. पाऊस सुरु होताच रात्री 9 नंतर खंडीत झालेल्या पुरवठा अर्धा तासभरात पुन्हा सुरळीत झाला खरा मात्र पुन्हा सव्वा अकाराच्या दरम्यान खंडीत झालेल्या वीजपुरवठयाने अलिबागकरांसह अर्ध्याअधिक जिल्ह्यातील नागरिकांची रात्र उकाडयात घालवली. गायब झालेलर हा विजपुरवठा तब्बल चार तासांनंतर सुरळीत झाला. 
महाविरणने उपकेंद्र अंतर्गत कामांसाठी मंगळवारी शटडाऊन घेतला होता. त्यानुसार वीजपुरवठा खंडीत करण्यात आला असल्याची माहिती अलिबाग विभागाचे मुख्य अभियंता तपासे यांनी सांगितले. 
अलिबागेत गेल्या पाच ते सहा दिवसापासूनच उन्हाचे तिव्र तडाखे बसू लागले. रविवारी 36.1 अंश तापमान नोंदवले गेले, तर मंगळवारी पारा 34.8 अंशांवर पोहोचला. वाढत्या तापमानापासून सुटका करण्यासाठी पंखे, कुलर्सचा दिलासाही अलिबागकरांना लोडशेडिंगमुळे मिळला नाही. आता तर रात्रीही लाईट लपंडावाचा खेळ सुरू झाल्याने गैरसोय होत आहे.
ग्रामीण भागात तर अत्यंत वाईट स्थिती आहे. दिवसातील काही वेळ लाईट अधून-मधून चकवा देत असल्यामुळे कृषी पंपांना वीजपुरवठा कसा करायचा, असा प्रश्‍न शेतकर्‍यांना पडला आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. 
मंगऴवारी सकाळपासूनच महावितरण विद्युत मंडळाने अलिबाग तालुक्यातील पावसाळा पुर्वीच्या कामांकडे नजर टाकली. रस्त्यालगत वाढलेली झाली, जिर्ण अवस्थेत झालेले पोल बदलून त्याठिकाणी नविन पोल टाकण्यात आले. तसेच पोलवरील जुन्या झालेल्या तारा, नविन ट्रान्सफार्मर हि आज बसविण्यात आले.

किनारपट्टीलगत 14 पर्यंत सतर्कतेचा इशारा
अरबी समुद्रात लक्षदीप बेटाजवळ कमी दाबाचा पट्टा तयार होऊन चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. या वादळाचा केंद्रबिंदु लक्षदिप बेटाच्या उत्तर पश्‍चिम दिशेस 200 किमी दूर आहे. हे वादळ मुंबईपासून 840किमी दूर दक्षिण पिश्‍चिम दिशेने व गुजरातच्या दक्षिण पूर्व दिशेला वेरावल येथून 1020 किती अंतरावर जाणार आहे. वादळ दूर समुद्रात असले तरी या काळात समुद्र खवळलेल्या अवस्थेत राहणार आहे. त्यामूळे महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी लगत सर्व जिल्ह्यात (सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई) येत्या 14 तारखेपर्यंत सतर्कतेचा इशारा देण्यता आला असून मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. तसेच आगामी 72 तासात हे वादळ उत्तर पश्‍चिम दिशेला वळणार असल्याचे भाकीत वेधशाळेने वर्तविले आहे. त्या अनुषंगानेही सतर्कता व खबरदारी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे.

अवश्य वाचा