प्रियकराला कंटाळेल्या प्रेयसीने त्याला विष घातलेला दुधी हलवा देत त्याला ठार मारल्याने अलिबाग तालुक्यातील रांजणपाडा परिसरात खळबळ उडाली होती. 28 मे 2011 रोजी घडलेल्या या घटनेने सोशल मिडीयात सदर प्रकरणाच्या व्हिडीओनेही धुमाकूळ घातला होता. सदर प्रकरणाची आज अलिबाग येथील सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत प्रेयसी निता कुलकर्णी हिला या हत्येप्रकरणी दोषी ठरवित आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली.
छगन टिकारामजी सोळंकी असे या दुदैवी प्रियकराचे नाव असून त्याचे निता कुलकर्णी हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. विवाहाच्या आणाभाकाही त्यांनी घेतल्या होत्या. या प्रेमात निताने छगनकडून वेळोवेळी पैशांची मागणी करुन पैसेही घेतले होते. मात्र कालांतराने तीला तो आवडेनासा झाला. त्यातच छगन तिला वारंवार लग्नाबाबत विचारत असे मात्र ति त्याला नकार देत होती. मात्र छगन काही मागे हटत नव्हता. यामुळे कंटाळलेल्या निताला तो आपली बेअबु्र करेल या भीतीने तीने त्याचा कायमचा काटा काढण्याचे ठरविले. त्यासाठी 28 मे 2011 रोजी छगनला रांजणपाडा येथील साईमंदिरात भेटण्यास बोलावले. यावेळी निताने ड्युनेट नावाच्या विषारी औषध मिसळलेला दुधी हलवा सोबत आणला होता. तिथे गेल्यानंतर तिने त्याला तो दूधी हलवा खाण्यास सांगितले मात्र त्याला वास येत असल्याने छगनने हलवा खाण्यास नकार दिला. त्यावर त्याला ब्लॅकमेल करीत जर तू हलवा खाल्ला नाहीस तर आपले प्रेमसंबंध संपले असे सांगून तो खाण्यास प्रवृत्त केले. त्यानुसार छगनने हलवा खाल्ला. त्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने तो कुणाच्या तरी मदतीने अलिबाग येथील शासकीय रुग्णालयात दाखल झाला. मात्र दोन दिवस उपचारानंतर 31 मे रोजी त्याचा विषबाधेने मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
त्यानुसार आरोप निश्‍चितीनंतर अलिबाग येथील सत्र न्यायालयात याप्रकरणाची सुनावणी सुुर होती. सदर खटल्याचे कामकाज अभियोग पक्षातर्फे अ‍ॅड. अश्‍विनी बांदीवडेकर-पाटील यांनी काम पहात 6 साक्षीदार तपासले होते. तर त्यानंतर सहायक सरकारी वकील अ‍ॅड अमित देशमुख यांनी काम पहात 4 साक्षीदार तपासले. 
अ‍ॅड. अमित देशमुख यांचा युक्तीवाद ग्राह्य धरीत सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर जी अस्मार यांनी कलम 302 खाली निता कुलकर्णी हिला दोषी ठरवित  आजन्म कारावास तसेच 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. त्याचप्रमाणे कलम 328 नुसार  7 वर्षे सश्रम कारावस व 5 हजार रुपये दंडाची शिक्षाही ठोठावली. दंडाची रक्कम 15 हजार रुपये ही मयताच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

तो व्हिडीओचा पुराव महत्वपुर्ण
निताने विष मिसळेला दुधी हलवा खाण्यास दिला असताना तिच्या हेतूविषयी मनात संशय आल्याने छगनने आपल्या मोबाईलमध्ये सदर घटनेचे छायाचित्रिकरण केले होते. सदर छायाचित्रीकरण त्याच्या भावाला मोबाईलमध्ये आढळल्यानंतर त्याने तो पोलिसांकडे सादर केला. तत्पूर्वी सदर छायाचित्रीकरण अनेक ठिकाणी व्हायरल झाला होता. हेच छायाचित्रीकरण या प्रकरणात महत्वाचा पुरावा म्हणून ग्राहय धरण्यात आला.

अवश्य वाचा