अलिबाग,जि. रायगड दि.14   

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे पेण तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात शेतीचे, शेततळ्यांचे, घरांचे, गणपती कारखान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करुन नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासन पुरग्रस्तांच्या खंबीरपणे पाठीशी उभे असल्याचे प्रतिपादन राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड रविंद्र चव्हाण यांनी आज येथे केले. पेण तालुक्यातील रावे,उर्णोली सानखार, दादर,कळवा, अंतोरे, जोहे, तांबडशेत,वाशी, बोर्झे, कणे, वढाव या  पुरग्रस्त गाव पाहणी प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी सिडकोचे अध्यक्ष तथा आ.प्रशांत ठाकूर, माजी  राज्यमंत्री रविशेठ पाटील, उपविभागीय अधिकारी पेण प्रतिमा पुदलवाड, तहसिलदार पेण श्रीम.अरुणा जाधव पेण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रितम पाटील, मुख्याधिकारी श्रीम.अर्चना दिवे,वैकुंठ पाटील  आदि उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री.चव्हाण यांनी पेण तालुक्यातील ग्रामीण भागात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे झालेल्या पुरग्रस्त गावातील नुकसानीचा आढावा घेतला.  अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे, जमिनीचे, बांधबंधिस्तीचे तसेच घरे, गोठ्यांची पडझड  होऊन मोठे नुकसान झाले आहे.    पुरग्रस्त गावातील पंचमाने करण्याची कार्यवाही सुरु असून कुणाचे  पंचनामे होणे बाकी असतील तर गावातील सरपंच, पोलीस पाटील यांनी त्यांच्याकडील यादी संबंधित विभागाकडे सादर करावी.  सदर यादी ग्राह्य धरुन त्यांनाही नुकसान भरपाईचा मोबदला दिला जाईल.   तसेच वाशी विभाग परिसरात ब्रिटीशकालीन असलेला वासखांड दुरुस्तीसाठी शासनाकडून निधी उपलब्ध करुन देण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.  कणे गावच्या खारबंदिस्ती मजबूती करण, पिण्याच्या पाण्याची योजना,रस्ते इत्यादी कामांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल.   खारेपाट विभागात असलेल्या समस्या सोडविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील.    पंडित दिन दयाळ उपाध्याय योजनेंतर्गत रेशन दुकानावर धान्य उपलब्ध करुन देण्यात आले असून गोरगरीब जनतेला यांचा लाभ देण्यात यावा अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.   पुरग्रस्त गावांचे पंचनामे करताना कोणीही पुरग्रस्त नुकसान भरपाई पासून वंचित राहणार नाही हे संबंधित विभागांनी पहावे.   पुरामुळे बाधित झालेल्या व्यक्तींना शासन नियमानुसार योग्य ती मदत दिली जाणार आहे. 

पेण तालुक्यातील आंबेगाव ग्रामपंचायत हद्दीतील धामणी या गावी पेण नगरपरिषदेकडून उभारण्यात आलेल्या घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प व महावीर थिमपार्कचे उद्घाटनही पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचेहस्ते करण्यात आले.  उत्कर्ष नगर पेण येथे कालव्याचे पाणी शिरुन झालेल्या नुकसानीची पाहणीही त्यांनी यावेळी केली.   यावेळी विविध शासकीय विभागाचे शासकीय अधिकारी, कर्मचारी  तसेच पुरग्रस्त गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

अवश्य वाचा