रायगड,

देशाच्या सहकार क्षेत्रातील सर्वात मोठ्या सारस्वत बँकेतर्फे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि इतर सर्व विभागांतील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी १ कोटी रुपयांचा निधी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'स देण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाने घेतला आहे. 

पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि इतर सर्व विभागांत आलेल्या महाभयंकर पुरामुळे अनेक लोक  मृत्युमुखी पडले आहेत. अनेकांचे घरदार-सुखी संसार रस्त्यांवर आले आहेत. पूर ओसरल्यानंतर उद्भवणाऱ्या रोगराईचा सामना करण्यासाठी, पूरग्रस्त महाराष्ट्रातील जनतेला या नैसर्गिक आपत्तीतून बाहेर काढण्यासाठी व त्यांचे पुरामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी शासनातर्फेही विविध योजना राबविल्या जात आहेत. 

सारस्वत बँक ही महाराष्ट्राची हक्काची बँक आहे. बँकेने यापूर्वीही अनेक बिकट परिस्थितीत सर्वतोपरी योगदान दिलेले आहे. २६/११च्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना बँकेत नोकरी देऊन बँकेने आधार दिला होता. समाजाचे आपण नेहमीच देणे लागतो, त्याचे ऋण आपल्याला वेळोवेळी फेडावे लागते, ह्याचे भान सारस्वत बँकेने नेहमीच ठेवले आहे. आपली सामाजिक बांधिलकीची परंपरा जपणाऱ्या सारस्वत बँकेने पुन्हा एकदा एक पाऊल पुढे टाकत पूरग्रस्त बांधवांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत करून, त्यांचे विस्कळीत जीवन पुन्हा एकदा पूर्वपदावर आणण्यासाठी हातभार लावण्याचे ठरविले आहे. महाराष्ट्रावरील या नैसर्गिक आपत्तीला एकजुटीने सामोरे जाऊन पूरपरिस्थितीवर मात करू, असा संदेश सारस्वत बँकेने पुन्हा एकदा समाजाला दिला आहे.  

त्यानुसार बँकेचे अध्यक्ष श्री. गौतम एकनाथ ठाकूर, उपाध्यक्ष श्री. शशिकांत साखळकर, जेष्ठ संचालक श्री. किशोर रांगणेकर, संचालक श्री. हेमंत राठी, कार्यकारी संचालिका श्रीमती स्मिता संधाने व मुख्य महाव्यवस्थापक श्री. अजय कुमार जैन यांनी नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची सह्याद्री येथे भेट घेऊन 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'चा धनादेश त्यांना सुपूर्त केला.  

 

अवश्य वाचा

दीव येथील जमीन घोटाळा